शरीरात तयार होणारे अनावश्यक घटक तसेच अपायकारक द्रव्य रक्तातून बाहेर काढणे आणि ते मूत्राद्वारे विसर्जन करण्याचे काम हे मूत्रसंस्थेचे असतं. परंतु मूत्रसंस्थेच्या या कामात काही कारणास्तव अडथळा आला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात व या अडथळ्यांना मुतखडा असे म्हणतात.
मुतखडा मानवाप्रमाणे पशूंमध्ये देखील आढळतो. पशूंमध्ये हा आजार प्रामुख्याने खात्यामध्ये असलेल्या ऑक्सीलेट, इस्ट्रोजन आणि सिलिका मुळे होऊ शकतो. याशिवाय पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार देखील आजारात कारणीभूत ठरतात. जनावरांमध्ये या आजाराचे तीव्रता वाढल्यानंतर जनावरे मूत्रविसर्जन योग्य प्रकारे करत नाहीत व शेवटी शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो.
जनावरातील मुतखड्यावर असलेल्या उपयुक्त औषधी वनस्पती
- हाडवणी:
ही वनस्पती मुतखडा आजारावर उपयुक्त आहे. हाडवणी मध्ये जीवाणू विरोधी गुण असल्याने या वनस्पतीची साल औषधात वापरतात. सालीचे चूर्ण किंवा रस उपचारासाठी वापरतात.
- पाषाणभेद:
ही वनस्पती सर्वत्र आढळते. मुतखडा भेदण्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे.
- सेगमकटी:
ही वनस्पती मूत्रसंस्थेच्या बहुतेक आजारांमध्ये उपयुक्त आहे. ही वनस्पती प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळत असून या वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.
- गोरख गांजा:
सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण किंवा रस औषधी मध्ये वापरतात.
- गोखरु:
गोखरू ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीच्या फळाला सराटे असे म्हणतात व ते औषधी मध्ये वापरतात. याचा वापर करत असताना सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत. कारण हे काटे अन्ननलिका किंवा पोटामध्ये इजा करू शकतात.
टीप-( जनावरांवर कुठलाही उपचार करताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा)
माहिती स्त्रोत - ॲग्रोवन
Published on: 12 July 2021, 10:50 IST