Animal Husbandry

ज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत, त्यांना लाळ्या खुरकुताचा आजार होतो. आजार होतो हा आजार संसर्गजन्य आहे. हा आजार पिंकोर्ना जातीच्या विषाणूंमुळे होतो.

Updated on 25 October, 2021 10:39 PM IST

प्रतिकार क्षमतेनुसार त्याचे वेगवेगळे सात उपप्रकार आहेत. विषाणूचा प्रसार हवा, दूषित खाद्य, पाणी, प्राण्यांच्या संपर्काद्वारे होतो. मौखिक मार्गापेक्षा श्‍वसन मार्गाने जनावरे अत्यंत संवेदनशील असतात.

१) आजाराचा संक्रमण काळ २ ते १२ दिवसांचा आहे. शरीरात विषाणूच्या प्रवेशानंतर ४८ तासांच्या आत जनावरांना संसर्ग होतो.

२) आजारामुळे जनावरांचे खाणे-पिणे बंद होते, जनावरास ताप येतो, दूध उत्पादनात घट येते काही वेळेस उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते.

लक्षणे

१) जनावरांच्या जिभेवर, टाळूवर, तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.

२) पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात जनावरास मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

३) जनावरांमध्ये वंधत्व येते, जनावराचा गर्भपात होतो, लंगडेपणा येतो. दुय्यम जिवाणू संसर्गामुळे न्यूमोनिया, कासदाह, स्टेमाटायटिस आणि जखमा होऊ शकतात.

प्रतिबंध, नियंत्रण, जैव सुरक्षा उपाय

१) उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक महत्त्वाचा आहे लसीकरण हा महत्त्वाचा उपचार आहे. यासाठी वर्षातून दोन वेळेस (सप्टेंबर, मार्च) लस टोचून घ्यावी एकदा लसीकरण केल्यानंतर ९ महिन्यांपर्यंत शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

२) आजारी जनावरांना त्वरित वेगळ्या ठिकाणी बांधावे.

३)लसीकरण न केलेली जनावरे प्रदर्शन व बाजारामध्ये नेऊ नयेत.

४) ऊसतोड करणाऱ्या कामगारांची जनावरे बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतो. त्यामुळे अशा जनावरांना जाणीवपूर्वक लसीकरण महत्त्वाचे आहे.

५)फक्त लसीकरण केलेली जनावरे गावामध्ये येऊ देण्याचे सर्व पशुपालकांनी ग्रामसभेमध्ये ठरवावे.

६) साथ असल्यास जनावरांना मुक्त पद्धतीने चरू देऊ नये.

७) जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजण्याऐवजी वैयक्तिक ठिकाणी पाणी पाजल्यास रोगाचा प्रसार कमी होऊ शकतो.

८) नवजात वासरांना लाळ्या खुरकूतग्रस्त मातेपासून दूर ठेवावे त्या गाईचे दूध पिण्यास प्रतिबंध करावा.

९) संक्रमणाच्या केंद्रस्थानाच्या १० किमीच्या परिघात असलेल्या जनावरांच्या बाजारपेठा बंद ठेवाव्यात.

१०) बाधित कर्मचारी, परिसर आणि दूषित वातावरणाची संपूर्ण स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे. चुना पावडर संक्रमित गोठा आणि परिसरात शिंपडावी.

११) जनावरांच्या गोठ्यामध्ये आणि जनावरांना संसर्ग झालेल्या क्षेत्रातील लोकांनी स्वच्छता पाळावी.

१२) रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सर्व सावधगिरीची स्वच्छता उपाययोजना करावी.

१३) बाधित वळूकडून रेतन करू नये.

 

उपचार

१) आजारी जनावरांना थेट सूर्यप्रकाश टाळून गोठ्यामध्ये वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

२) बाधित जनावरावर लक्षणात्मक उपचार करावेत. दुय्यम जिवाणू संसर्ग तपासण्यासाठी ५-७ दिवस प्रतिजैविकांचा समावेश करावा.

३)आवश्यकतेनुसार औषधांचा वापर करावा.

४) तोंडाच्या व्रणावर १ -२ टक्के तुरटी लोशन, २ ते ४ टक्के सोडिअम बायकार्बोनेट द्रावण, ४ टक्के पोटॅशिअम परमॅंगनेट द्रावण, बोरो ग्लिसरीन दिवसातून २-३ वेळा लावावे.

५) पायातील जखमा जंतुनाशक द्रावणाने धुवाव्यात. त्यानंतर जंतुनाशक मलम लावावे.६) आजारी जनावरांना द्रव आहार, मऊ चारा द्यावा.

लसीकरण

१) मार्गदर्शक तत्त्वांनुसार (वर्षातून दोनदा सहा महिन्यांच्या अंतराने) वेळेवर लसीकरण निर्धारित वेळेत काटेकोरपणे पाळावे लसीची शीत साखळी कायम ठेवावी. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जनावरांना लसीकरण करावे.२) पशुसंवर्धन विभागाच्या सूचनेनुसार बूस्टर डोस द्यावा. बाधित जनावरांना लस देऊ नये.

३) लसीकरणाच्या २१ दिवस आधी जंतनाशक घ्यावे.

- प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Increasing prevalence of salivary gland disease
Published on: 25 October 2021, 10:39 IST