Animal Husbandry

शेतकरी शेतीसह जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालनातून शेतकऱ्यांना दूध , शेणखत मिळते आणि त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. चांगल्या उत्पन्नासाठी पशुंची काळजी घेतली गेली पाहिजे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये जनावरांची काळजी त्यांची निगा व्यवस्थित ठेवली पाहिजे. सध्या पावसाळा चालू आहे, यादिवसात जनावरांची विशेष काळजी घ्यायला हवी.

Updated on 03 July, 2020 4:54 PM IST


शेतकरी शेतीसह जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालनातून शेतकऱ्यांना दूध , शेणखत मिळते आणि त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.  चांगल्या उत्पन्नासाठी पशुंची काळजी घेतली गेली पाहिजे, वेगवेगळ्या ऋतूमध्ये जनावरांची काळजी त्यांची निगा व्यवस्थित ठेवली पाहिजे. सध्या पावसाळा चालू आहे, यादिवसात जनावरांची विशेष काळजी घेतली हवी.  पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आणि जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी.   पावसाळ्यात जनावरांमध्ये विशेष करून खालील समस्या आढळून येतात. याविषयी आपण आजच्या लेखात माहिती घेणार आहोत, त्या समस्याचे निराकरण कसे करावे याचीही माहिती या लेखात देण्यात आली आहे.

1) पोट फुगणे -
 हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते. 
 कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडची डावी बाजू फुग्यासारखी दिसते. 
पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो. अशा वेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही. 
 फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्‍यता असते. 
उपाय -
पोटफुगी टाळण्याकरिता जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते व पोटफुगीची समस्या टाळता येते. 
 जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते. 
पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरावर वेळीच उपचार करता येतील. 

 पोटफुगी आजारावर प्रथमोपचार म्हणून अर्धा लिटर गोडेतेलात 30 मि.लि. टर्पेंटाईन, 100 ग्रॅम सोडा व 5 ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावराला ठसका न लागता हळूहळू पाजावे. 
2) खुरातील जखमा चिघळणे व त्यात किडे पडणे
 पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे खुरांमध्ये जखमा होतात. 
सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात. 
असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगडते. परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दुग्धोत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होतो. 
 शेळ्या-मेंढ्यामध्ये अशा जखमा झाल्यास त्यांना धनुर्वात होतो. 
उपाय-
जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. 
जखम पोटॅशिअम परमॅगनेटने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.

3) पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार -
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. 
दमट वातावरणात घटसर्पासारखे श्‍वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. 
 या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालच्या जबड्याखाली सूज येते, श्‍वासोच्छ्वास करायला त्रास होतो, जनावरास 104 ते 105 अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी 90 टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात. 
उपाय -
 पावसाळ्याच्या सुरवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी. त्याचप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे.

4) गढूळ पाण्यामुळे होणारे आजार -
पावसाळ्यात पाणी गढूळ होण्याची शक्‍यता अधिक असते. गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. 
उपाय -
खाद्याच्या गव्हाणी व पाण्याच्या टाक्‍यांना चुना लावावा. 
 पाणी शुद्ध होण्याकरिता पाण्यात 1 टक्का पोटॅशियम परमॅंगनेट मिसळावे.

5) गोचीड, गोमाश्‍यांचा प्रादुर्भाव -
 पावसाळ्याच्या सुरवातीला जनावरांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात गोचीड, गोमाश्‍यांचा प्रादुर्भाव होतो. 
 गोचिडांची लागण जास्त झाल्यास जनावरांच्या लघवीमध्ये रक्त येते व त्यामुळे मूत्राचा रंग कॉफीसारखा दिसतो. 
 गोचीड जनावराच्या त्वचेला चिटकून बसतात त्यामुळे त्वचेला खाज सुटते. जनावर अंग भिंतीवर घासते किंवा पायाने खाजवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जनावराच्या अंगावर जखमा होतात. 
 जखमांवर वेळीच उपचार न केल्यास त्यावर माश्‍या बसतात आणि त्यामध्ये किडे पडण्याची शक्‍यता निर्माण होते. अशा जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यास बराच वेळ लागतो. 
 गोचिडांमुळे जनावरांना विषमज्वर आजार होतो. या आजारात जनावर स्वतःभोवती चक्कर घेते, डोके आपटते. हा आजार संकरित जनावरात जास्त प्रमाणात दिसून येतो. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते व जनावरांना श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो. 
उपाय -
जनावरांच्या अंगावर व गोठ्यात गोचीड, गोमाशा प्रतिबंधक औषधांची शिफारशीनुसार फवारणी करावी. 
 गोठ्यातील शेण, मलमुत्राची वेळोवेळी साफसफाई करुन गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावा.


6)
व्यायला आलेल्या जनावरांची काळजी
 पावसाळ्यात जनावर व्यायल्यानंतर जनावर आजाराला बळी पडू शकते. 
-या काळात व्यायल्यानंतर वार न पडणे, मायांग बाहेर येणे, थंडीताप, दुग्धज्वर अशा प्रकारच्या समस्या जनावरांमध्ये आढळून येतात. 
 जनावरांमध्ये वरील समस्या आढळल्यास पशुवैद्यकाकडून वेळीच उपचार करून घ्यावेत.

7) दुभत्या जनावरांमध्ये होणारा स्तनदाह
 जनावर व्यायल्यानंतर 50 ते 60 दिवसापर्यंत दुग्धोत्पादनाचे प्रमाण वाढत असते. 
 अशी जनावरे गोठ्यामध्ये शेण, मलमूत्र असलेल्या ठिकाणी बसल्यास कासेच्या छिद्रांतून रोगजंतू कासेमध्ये प्रवेश करतात व स्तनदाह होण्याची शक्‍यता वाढते. 
उपाय -
 स्तनदाह टाळण्यासाठी दुधाळ जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. 
 जनावरांची कास जंतुनाशक औषधांनी धुऊन घ्यावी. 
 दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत. 
 आजारी जनावरांचे दूध शेवटी काढावे. 
 स्तनावर जखम झाली असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करावेत.

8) पावसाळ्यात वासरांचे संगोपन -
 पावसाळ्यात नवजात वासरे मोठ्या प्रमाणात आजाराला बळी पडू शकतात. 
 जन्मलेल्या वासराला लवकरात लवकर मातेचा चीक पाजावा. कारण चिकामुळे वासाराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
 वासराची नाळ कापून त्यावर टिंक्‍चर आयोडिन लावावे. जखम लवकर सुकेल याची काळजी घ्यावी. 
 वासरांना हगवणीसारखे आजार होऊ नये याकरिता गोठ्यात स्वच्छता राखावी. 
वासरांना सकस आहार पुरवावा. रोगांची लागण टाळण्याकरिता वेळेवर रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात.

आजार टाळण्यासाठी गोठा ठेवा स्वच्छ, कोरडा

पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार  आढळतात. हे आजार विविध माध्यमांतून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान लाभल्यास असे विषाणू विविध अवयवांत प्रादुर्भाव करतात. त्यासाठी गोठा स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर भर द्यावा.

जसजशी वातावरणातील उष्णता कमी व्हायला सुरुवात होते व पावसाळ्याची चाहूल लागते, तसे जनावरांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात. त्यासाठी जनावरांच्या व्यवस्थापनात योग्य बदल करणे अवश्यक असते. यामध्ये गोठ्याची स्वच्छता, जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण, पाण्याच्या निचऱ्याची सोय, जनावरांचे उपचार व खाद्याचे नियोजन इ. गोष्टींचा समावेश होतो.

 


बुळकांडी -
हा एक विषाणूजन्य अजार असून पॅरामिक्सो नावाच्या विषाणूमुळे होतो. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे संसर्गाचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. दुर्गंधीयुक्त जुलाब, जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर बारीक पुटकुळ्यांसारखे फोड येतात. ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून पाणी वाहते. डोळे लालसर होतात. तोंड येते, पातळ- चिकट- दुर्गंधीयुक्त शेण पडते, बऱ्याच वेळी दोन्हीमिश्रित शेणही पडते. शरीरातील पाणी कमी होऊन जनावरांना तीव्र अशक्तपणा येतो व ४ ते ८ दिवसांत जनावर दगावणे इ. लक्षणे दिसून येतात. शरीराचे तापमान शेवटी थंड पडणे, नाडी व श्‍वासोच्छ्‍वास कमी होणे किंवा अगदी मंद होणे हा या रोगाचा शेवटचा टप्पा मानला जातो.
_उपचार -
प्रतिबंधात्मक उपचारामध्ये या आजाराविरुद्ध लसीकरण करणे व गोठ्यांची नियमित स्वच्छता करणे, तसेच लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे बांधणे इ. गोष्टींचा समावेश होतो. 
आजारी जनावरांची विष्ठा गोठ्यापासून दूर ठेवून खोल पुरणे फायद्याचे ठरते. प्रतिजैविकांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात वापर करावा.

अतिसार (हगवण)
पावसाळ्यातील प्रमुख आजारांव्यतिरिक्त अतिसार हा कायम दिसून येणारा आजार आहे. यामुळे पाण्यासारखे पातळ जुलाब होणे, शरीराच्या तापमानात कमालीची घट येणे, श्वासोच्छ्‍वास मंदावणे, अशक्तपणा येणे यासारखी प्रमुख लक्षणे दिसून येतात. 
या रोगाची लागण मुख्यतः गढूळ व दूषित पाणी, आहारातील समतोल ढासळल्यामुळे, अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे होते. काही प्रमाणात पोटातील जंत किंवा कृमीदेखील या आजारास कारणीभूत ठरतात. 
पावसाळ्यात बऱ्याचदा जनावरांना गढूळ पाणी प्यावे लागते, त्यामुळे या आजाराचा संसर्ग होऊन जनावरे अतिसारास बळी पडतात.
प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये जनावरांची वैयक्तिक, तसेच गोठ्याची स्वच्छता राखणे, तसेच जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे. निरोगी जनावरांना आजारी जनावरांपासून दूर ठेवावे. 
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

सर्दी- पडसे -
हा आजार मुख्यत्वे पावसाळ्यात बऱ्याच जनावरांमध्ये दिसून येतो. वातावारणातील बदल, अति थंडी किंवा पावसात भिजल्याने जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. 
नाकातून सारखे पाणी वाहणे, ताप येणे, तसेच शिंका येऊन नाकातून चिकट द्रव बाहेर पडतो व त्यामुळे नाकातील भाग लालसर होतो. काही प्रमाणात तापही दिसून येतो. यामुळे जनावरांचे खाण्याकडे दुर्लक्ष होते व जनावर अशक्त होते. 
प्रतिबंधात्मक उपचारामध्ये पावसाळ्यात कृत्रिम ऊब उपलब्ध करून देण्यासाठी गोणपाटाचा वापर करावा. 
गोठा स्वच्छ, कोरडा ठेवावा. जनावरांचे नाक, पोटॅशच्या पाण्याने स्वच्छ धुवावे.
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची मात्रा द्यावी.

 

     लेखक :-

  डॉ .गणेश उत्तमराव काळुसे .

  विषय विशेषज्ञ(पशुसंवर्धन व दुग्ध्शास्त्र )

  डॉ .सी .पी .जायभाये.      

(कार्यक्रम समन्वयक) कृषि विज्ञान केंद्र बुलढाण.

English Summary: In rainy season animals get life threatening diseases, read the full treatment here
Published on: 03 July 2020, 04:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)