रोगाची लक्षणे:-
या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास साधारणत: ४-६ दिवसांत जनावरास खूप ताप येतो.चारा खाणे व रवंथ करणे बंद होते.दुधाळ जनावरात दूध बंद अथवा कमी होते.जनावर सुस्त बसते.दोन ते तीन दिवसात ताप कमी होतो.तोंडात, जिभेवर, टाळूवर,गालाच्या व ओठाच्या आतील बाजूस छोटे पुरळ येतात. नंतर ते मोठे होतात व फुटतात. तोंडातील जखमांमुळे वेदना झाल्याने जनावर चारा खाऊ शकत नाही.तोंडातून लाळ गळते तसेच एक किंवा चारही खुरांच्या आत पुरळ येऊन फुटतात.जनावर लंगडते, खंगत जाते.कासेवर पुरळ येतात त्यामुळे काही वेळा कासदाह होतो.गाभण काळात या रोगाची लागण झाल्यास कधी कधी जनावरात गर्भपात होतो.शेळ्या मेंढ्यात लक्षणे कमी तीव्रतेची असतात.शेळ्या मेंढ्यात तोंडात पुरळ हे शक्यतो टाळूवर येतात तसेच तोंडापेक्षा पायात जास्त प्रमाणात पुरळ येतात.
दुष्परिणाम:-
हा रोग बरा होण्यास जास्त कालावधी लागतो.खुरांची जखम चिघळली किंवा त्यात आळ्या पडल्या तर बऱ्याच वेळा पूर्ण खूर गळून जाते व जनावराला कायमचा लंगडेपणा येतो.जनावरे उष्णता सहन न झाल्याने धापा टाकतात.त्वचा शुष्क व खडबडीत होते व त्यावर खूप केस वाढतात. हृदयाचे कार्य कमकुवत होते किंवा रक्तक्षय होतो.
रोगाचा प्रसार कसा होतो:-
हा विषाणू प्रखर सूर्य प्रकाशात अकार्यकक्षम होतो आणि आम्ल व अल्कलीमुळे नष्ट होतात. हा विषाणू थंड वातावरणात अधिक काळ जिवंत राहतो. रोगट हवामानात एक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो आणि जनावरांच्या चाऱ्यामध्ये अडीच ते तीन महिने जिवंत राहतो.
रोगाचा प्रसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतो.जनावरांच्या लाळ व मल-मूत्राने दूषित झालेला चारा,पाणी यांमुळे प्रसार होतो.दूषित हवा,रोगी जनावरांच्या संपर्कात आलेल्या माणसांद्वारे सुद्धा या रोगाचा प्रसार होतो.सर्व जनावरे एकाच ठिकाणी पाणी पीत असतील,चारा खात असतील तर रोगी जनावरापासून इतर जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होतो.
प्रतिबंधक उपाय:-
या रोगाचे दूरगामी गंभीर परिणाम होत असल्याने व त्यावर योग्य उपचारपद्धती नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत
आजारी जनावरांना वेगळे बांधावे.
आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये.
जनावरांचा गोठा ४ टक्के धुण्याच्या सोड्याच्या द्रावणाने धुऊन घ्यावा.
जनावराचा गोठा स्वच्छ व कोरडा राहील याची काळजी घ्यावी.
रोगाची साथ आलेल्या गावाच्या नजीकच्या गावात आल्यास,आपल्या जनावरास लस दिली नसेल तर ती देऊन घ्यावी.
या रोगावरील लस सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात देऊन घ्यावी.
ही लस चार महिने किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या वासरास देता येते.
लसीकरण केल्यानंतर एक ते दोन आठवड्यात जनावरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व ती जवळपास ६ महिने टिकते
या रोगाची लस सर्व सरकारी पशुवैद्यक दवाखान्यात मिळते.
उपचार पद्धती:-
हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर निश्चित रामबाण उपचार नाही. उपचार हे फक्त तोंडातील व पायातील जखमा वाढून या रोगाची गुंतागुंत वाढणार नाही यासाठी केले जातात.
पशुवैद्यकाकडून खालील उपचार करावेत
प्रथम या आजारात तोंड व पाय २-४ टक्के खाण्याचा सोड्याने (साधारण २५ ग्रॅम सोडा प्रतिलिटर पाण्यात) धुऊन घ्यावेत.
पायातील खुरावर जखमांवर पातळ डांबर बसवावे.
पशुवैदयकाकडून पायातील जखमेत अळ्या पडल्या असतील तर थोडेसे टर्पेनटाईन तेल टाकून अळ्या काढाव्यात व नंतर जंतुनाशक मलम लावावे.
पायातील व तोडातील जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी पशुवैद्यकाकडून प्रतिजैविकाचे व व्हिटॅमिनचे इंजेक्शन देऊन घ्यावीत.
आजारी बैलांना आराम द्यावा.
वाळलेल्या कडब्या ऐवजी मऊ हिरवा चारा खाऊ घालावा.
खुराक कोरडा न देता भिजवून द्यावा.
स्रोत:-
डॉ.गिरीश यादव
मुंबई पशु वैद्यक महाविद्यालय परळ,मुंबई
संकलन - IPM school
Published on: 11 October 2021, 06:04 IST