बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना 12 महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे हि समस्या ठरू लागली आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. मुळात या तंत्रज्ञानाने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स यंत्र (हरितगृह) चारापिके (मका, गहू, बाजरी इत्यादी), प्लास्टिक ट्रे (साधारण 3x2 फूट) पाणी देण्याची यंत्रणा (मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टम व टाईमर) ची आवश्यकता असते. या पद्धतीत फक्त 7 ते 8 दिवसात (20 ते 25 से. मी. उंचीचा) चारा तयार होतो. साधारण 50 चौ. फूट जागेत एक वर्षात 36 हजार 500 किलो चारा तयार होतो. यासाठी वर्षाला 36 हजार 500 लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट असल्यास खर्च अत्यल्प होऊ शकतो. या तंत्रज्ञानाअंतर्गत चारा निर्मिती करताना कमी मजूर लागतात तसेच मशागतीची आवश्यकता भासत नसल्यामुळे लागवडीवर कमी खर्च होतो. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारापिक घेणे शक्य असल्यामुळे कमी जागेत अशाप्रकारे चारा निर्मिती करणे शक्य होते. यामुळे शेत जमिनीवर इतर नगदी पिक घेणे शक्य होते.
हायड्रोपोनिक्स चारायंत्र हे परदेशी बनावटीचे व महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन सामग्रीचा (बांबू, तट्ट्या, प्लास्टिक ट्रे, 50 टक्के शेडनेट व प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून साधारण 72 चौ. फूट जागेत बसतील अशा 25x10x10 फूट अवघ्या 15 हजार रुपये खर्चात हे सांगाडा यंत्र तयार करता येते. याद्वारे दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते.
हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती प्रक्रिया:
- चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, ज्वारी इत्यादी वापर होतो. या धान्याला सोडीअम हायपोक्लोराईट (0.1 मिली प्रती लिटर) च्या द्रावणात सूक्ष्मजिवानूंपासून संरक्षण होण्याकरिता बीजप्रक्रिया करून घ्यावी. नंतर हे धान्य 12 तास भिजत ठेवून आणि नंतर 24 तास तरटाच्या पोत्यात मोड येण्यासाठी ठेवावे.
- त्यानंतर प्लास्टिक ट्रेमध्ये मोड आलेले धान्य (3x2 फूट x3 इंच उंची) पसरून ठेवावे. प्रती दुभत्या जनावरासाठी 10 ट्रे या प्रमाणे जानावरांच्या संख्येवरून ट्रे ची संख्या ठरवावी.
- प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील 7 ते 8 दिवस ठेवावेत. 1 इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फोंगर सिस्टीम द्वारे प्रत्येक दोन तासाला 5 मिनिटे या प्रमाणे दिवसातून 6 ते 7 वेळा पाणी द्यावे. एकूण 200 लिटर पाणी दिवसभर वापरले जाते.
- हि यंत्रणा स्वयंचलित आहे, पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येते. फक्त पाण्यावरच या चाऱ्याची 7 ते 8 दिवसात 20 ते 25 सें. मी. पर्यंत वाढ होते.
फायदे:
- मातीविरहित चारा निर्मिती.
- कमी खर्चिक (प्रती किलो 1.5 ते 2 रुपये)
- पाण्याची व जागेची बचत.
- प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज नाही.
- कमी कलावधीत उपलब्धता
प्रतिकिलो चार्यामध्ये खालील गुणधर्म आढळून येतात.
- कॅल्शियम- 0.11 %
- विटामीन A- 25.01 %
- विटामीन C- 45.01 %
- विटामीन E- 26.03%
- प्रथिने- 13 ते 20 %
- रायझेस्टिक फायबर- 80.92 % (दुध निर्मितीनासाठी अत्यावश्यक)
डॉ. अमोल कानडे, डॉ. दिलीप ठाकरे, डॉ. इंदरचंद चव्हाण
कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय, नाशिक
Published on: 27 February 2019, 04:22 IST