पशु पालन करणे हे फार अवघड काम असतं. तिन्ही ऋतूंमध्ये जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते.कडक उन्हाळ्यामध्ये पशुधनाची काळजी घेणे आवश्यक असते. अतिउष्णतेमुळे जनावरांना सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो.
रक्तस्रावाचा प्रकार संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावराच्या नाकातुन लाल व गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे.जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. उन्हाळ्यात हिरव्या वैरणीचे टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई असे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थीतीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते.या आजार झाल्यावर काय उपाय करावेत, या बद्दलची सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
नाकातून रक्तस्राव
अतिउष्णतेमुळे माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.जनावरांच्या नाकातून लाल व गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी घालावे.
जनावरांना भरपूर पाणी प्यायला द्यावे. हिरवा चारा द्यावा. तसेच जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत. रक्तस्राव थांबत नसेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क आहारातून किंवा औषधांच्या माध्यमातून द्यावे.
विषबाधा
उन्हाळ्यात हिरव्या वैरणीचा कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खात असतात. यामुळे विषारी वनस्पती घाणेरी, गुंज, धोतराआणि बेशर्मखाण्यात आल्यामुळे जनावरांना विषबाधा होते. जनावरे गुंगल्या सारखी करतात, खात नाही,खाली बसतात व उठत नाही. त्यानंतर पाय सोडून ताबडतोब मरतात.विषबाधेची लक्षणे दिसतात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावे.
उष्माघात
हा आजार अधिक प्रखर सूर्याच्या किरणांमुळेआणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. उष्माघातामुळे जनावरांच्या शरीराची कातडी कोरडी पडते,जनावरे थकल्यासारखी होतात,भूक मंदावते, दूध देणे कमी होते.
यावर उपाय म्हणून जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे किंवा ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे व वारंवार पाणी मारावे. अशा जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे.भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी व चारा द्यावा.शक्य असल्यास पाण्यात मीठ व साखर टाकावी.
कडव्या
हा आजार अधिक प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला होतो. हा आजार प्रामुख्याने ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो. त्या जनावरांत त्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीननावाचा घटक कमी प्रमाणात असतो. तसेच पाण्याच्या अभावामुळे भुकेपोटी जनावरे गाजर गवत खात असतात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता आजार होतो. या गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो. उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावे. भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे व उपचारासाठी पशुवैद्यकांच्या मार्गदर्शन घ्यावे.
Published on: 04 December 2021, 03:23 IST