Animal Husbandry

भारत हा खरोखरच विरोधाभासांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त दुभती जनावर भारतात आहेत. दूधाची सगळ्यात जास्त मागणी आणि उत्पादनही भारतात होते. 1970 च्या दशकात आपण ’ऑपरेशन फ्लड’ हाती घेतलं. त्यामुळे देशातील सकल दुग्धोत्पादनात मोठी वाढ झाली. पण असे असूनही देशातील दरडोई दुधाची उपलब्धता 250 मिलीही नाही. म्हणजेच आजही देशातील करोडो घरांत मुलांना एक ग्लासभर दूध देणेही परवडत नाही. आणखी एक विरोधाभास म्हणजे देशातील सर्वसाधारण गाय 5-7 लिटर दूध देते. अगदी दुभत्या गाईही 20-25 लिटर दूध देतात.

Updated on 28 February, 2019 3:04 PM IST


भारत हा खरोखरच विरोधाभासांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त दुभती जनावर भारतात आहेत. दूधाची सगळ्यात जास्त मागणी आणि उत्पादनही भारतात होते. 1970 च्या दशकात आपण ’ऑपरेशन फ्लड’ हाती घेतलं. त्यामुळे देशातील सकल दुग्धोत्पादनात मोठी वाढ झाली. पण असे असूनही देशातील दरडोई दुधाची उपलब्धता 250 मिलीही नाही. म्हणजेच आजही देशातील करोडो घरांत मुलांना एक ग्लासभर दूध देणेही परवडत नाही. आणखी एक विरोधाभास म्हणजे देशातील सर्वसाधारण गाय 5-7 लिटर दूध देते. अगदी दुभत्या गाईही 20-25 लिटर दूध देतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात इस्राईलमध्ये ’गिवात हाइम’ येथे एससीआर कंपनीच्या (http://youtu.be/cAmhzxzTqVg) दिवसाला 42-45 लिटर दूध देणाऱ्या गाई आणि त्यांचे हायटेक गोठे बघून स्वतःला चिमटा काढला.

इस्राईलमध्ये डेअरी उद्योगाकडे अतिशय शास्त्रोक्त आणि व्यावसायिक दृष्टीने बघितले जाते. त्यात पावला-पावलावर माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. डेअरी फार्म उघडायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करून जागा निश्चित केली जाते. तापमान साधारणतः 20-26 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान हवे. जमिनीला उतार किती हवा; वाऱ्याची दिशा कुठली असावी; पाण्याची आणि चाऱ्याची उपलब्धता कुठे असावी या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या जातात. असे केल्यामुळे कृत्रिमरित्या हवा थंड करणे आणि वाताभिसरण यावर होणारा वीजेचा खर्च कमी केला जातो. देशातील अर्धा भूभाग वाळवंटी असल्यामुळे एकही गाय उघड्यावर चरत नाही.

गायींच्या जेनेटिक स्कोरला अतिशय महत्त्व दिले जाते. इस्रायलमधील प्रत्येक गायीची गेल्या 70 वर्षांपासूनच्या इतिहासाची नोंद आहे. देशातील गायींची संख्या किती असावी यावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे ज्या दुभत्या गायी आहेत त्या सर्वोत्तम असाव्या याची दक्षता घेतली जाते. इस्राईलने होलस्टिन फ्रिसिअन गायींचे उष्ण वातावरणात चांगले दूध देणाऱ्या सिरियन गायींशी संकर करून भक्कम पाय, मध्यम आकारांचे सड आणि इस्राईलमधील हवामानात भरपूर दूध देणाऱ्या गायींचा वण तयार केला आणि त्यात अधिकाधिक सुधारणा केली आहे.

आधुनिक डेअरी व्यवसायात गायीकडे दूध देणारे यंत्र म्हणून बघितले जाते. गाईवर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ नये याची खबरदारी घेतली जाते. गोठ्यातील तापमान नियंत्रित राखणे, गाईंना सतत पौष्टिक चारा आणि पाणी उपलब्ध असणे, संकरित गाईंचे वजन जास्त असल्यामुळे त्याचा त्यांच्या पायांवर ताण पडू नये म्हणून जमिनीवर शेण किंवा रबराचे मॅटिंग करणे... एवढेच काय तर गोठ्यात थोडी अस्वच्छता असेल, शेण आणि चारा आजूबाजूला पसरला असेल तर गाईंना अधिक "आरामदायक" वाटून त्या अधिक दूध देतात हे लक्षात आल्यानंतर गोठ्याचा परिसर तशा प्रकारे ठेवला जातो.

इस्राईलमध्ये आम्ही बघितलेल्या 400 गायींचे डेअरी फार्म फक्त 5 लोकं चालवतात. म्हणजेच सुमारे 80 गायींसाठी एक माणूस. पण हे सहजशक्य होते कारण डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर केला जातो. प्रत्येक गायीच्या गळ्यात एक चिप अडकवलेली असते. या चिपद्वारे गायींच्या शारिरीक हालचालींवर तसेच तोंडाच्या हालचालींकडे (रवंथ करण्याकडे) 24x7 लक्ष पुरवले जाते. चिपमध्ये गायीच्या अंगातून बाहेर पडणारी उष्णता मापन करणारे सेंसर (हीट टॅग) असतात. त्याद्वारे गाय पुरेसे खात आहे की नाही... पुरेसा रवंथ करत आहे की नाही यासह तिच्या नाडीचा दर, रक्तदाब इ. गोष्टींची माहिती सतत घेतली जाऊन ती नियंत्रण कक्षातील संगणकाला पुरवली जाते. प्रत्येक गायीचे दिवसातून तीन वेळा दूध काढले जाते.

गायींच्या सडाला दूध ओढणारी मशीन लावत असताना काही उनाड गायी लाथा मारतात. अशा गाईंच्या पाठीवरती एक यु-आकाराचा बार बसवला जातो. त्यामुळे गायीला वेदना होत नाहीत... पण तिला लाथाही झाडता येत नाहीत. हल्ली भारतातही अनेक ठिकाणी दूध काढणारी मशिन्स आली आहेत. पण त्यात ऑटोमेशन आणून दूधाचा प्रवाह कमी झाला की दूध काढण्याचे थांबणे, दूधाचा प्रवाह नसेल तर सडाजवळ त्याच मशीनद्वारे मसाज करून गायींना पान्हा फुटण्यास उद्युक्त करणे अशा गोष्टी गेल्या जातात. दूध काढले जात असताना कंट्रोल रूममध्ये किती दूध निघते आहे हे कंट्रोल रूममध्ये तसेच मिल्किंग पार्लरमध्ये बसवलेल्या डिस्प्ले बोर्डवर रिअल टाइम बघता येते. एखादी गाय अपेक्षेएवढे दूध देत नसेल तर अ‍ॅलर्ट सिग्नल दिला जातो आणि दूध काढून झाल्या झाल्या त्या गायीला कळपापासून वेगळे काढले जाते. असे केल्याने, साथीचे आजार पसरण्यास अटकाव होतो. अशा वेगळ्या काढलेल्या गायींना डॉक्टर तपासतात आणि जेव्हा त्यांची तब्येत ठीक असल्याचे समजते, तेव्हाच त्यांना इतर गायींच्यात सोडले जाते.


आपल्याकडे सहकारी डेअरीत गाडी 50 किमीच्या पंचक्रोशीत घरोघर जाऊन दूध गोळा करते. त्यामुळे दूध काढल्यानंतर 2/4 तासांनंतर त्याचे पाश्चरायझेशन केले जाते. या काळात त्यात भेसळ होऊ शकते, उन्हामुळे तसेच अस्वच्छ गाड्यांमुळे त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात आणि दूधाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळे आपल्याकडे एक-दोन प्रकारचेच चीज मिळते. इस्राईली डेअरीमध्ये दूध काढल्यानंतर काही सेकंदातच त्याचे पाश्चरायझेशन केले जाते. त्यामुळे तिथे 30-40 प्रकारचे चीज तसेच फ्लेवर्ड दही आणि अन्य उच्च दर्जाचे दुग्धोत्पादित पदार्थ मिळतात. ही गोष्टं इस्राईलची असली तरी अशाच प्रकारचा दृष्टीकोन डेन्मार्क, नेदरलॅंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. अनेक देशात बघायला मिळतो. तेथील गाईसुद्धा सुमारे 32-38 लिटर दूध देतात.

डेअरी क्षेत्रातील जेनेटिक्समध्येही आता खूप प्रगती होत असून उष्णता मापन सेंसरमुळे गाय गर्भार रहाण्यासाठी कधी सर्वात चांगली संधी आहे हे समजते. त्यामुळे अन्य पाश्चिमात्य देशांप्रमाणे गायींना गर्भार रहाण्यासाठी महागडे आणि आरोग्याला अपायकारक “हार्मोन्स” द्यायची फारशी गरज पडत नाही. याशिवाय कृत्रिम गर्भधारणा करताना त्यातून गायींचे प्रमाण अधिक रहावे याचेही तंत्रज्ञान विकसित होत आहे. कंट्रोल रूममध्ये बसून तुम्ही गोठ्यातील प्रत्येक गायीवर लक्ष ठेऊ शकता... अगदी मिल्किंग पार्लरमध्ये असलेल्या गायींचे किती दूध निघते आहे याची ’लाइव्ह’ माहिती क्षणाक्षणाला अपडेट होत असते. गायींच्या आरोग्याचा तसेच दूध देण्याचा अनेक वर्षांची माहिती (डेटा) तुम्ही संकलित करून कुठल्या गायी बदलून नवीन गायी आणायच्या याचा निर्णय घेऊ शकता. हे सॉफ्टवेअर जगातील अनेक भाषांत उपलब्ध असून त्याची हिंदी आवृत्तीही पुढील एखाद-दोन महिन्यात येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रं आणि अ‍ॅनिमेशनमुळे फारसं न शिकलेल्या लोकांनाही ते व्यवस्थितपणे वापरता येऊ शकते.

या आधी मी ऐकले होते की, असे हायटेक गोठे बांधायचे तर किमान 500 गायी असाव्या लागतात. किंवा मग एका परिसरात (तालुक्यात) 50 गायींचे 10 गोठे बांधून त्यांचे एकत्रितरित्या व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी सुमारे 3 कोटी रूपयांचा खर्च येतो. पण या भेटीत असे कळले की, 40-50 गायींचे स्वतंत्र डेअरी फार्म उभे करणेही आता शक्य आहे. मनातील शंकेखोरपणा उपस्थित करते मी एससीआर कंपनीच्या (http://www.scrdairy.com/) व्यवस्थापकांना म्हणालो की, “तुम्ही गायींचे अगदी मशीनच करून टाकले की हो राव.” आमच्याकडे शेतकरी अशा गोष्टींना शेतकरी कसे तयार होणार? यात तुम्हाला क्रौर्य नाही का वाटत? तर त्याने मला प्रतिप्रश्न केला. भारतात तुम्ही गायींना देवासमान मानता. पण दुसरीकडे लाखो गायी रस्त्यावर फिरतात. कचरापेटीत तोंड खुपसून लोकांनी फेकून दिलेल्या गोष्टी खातात. त्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाही. आमच्याकडे गायींची संख्या किती असावी ते सरकार ठरवते पण डेअरीमधील सर्व गायींना पौष्टिक आहार आणि तातडीने वैद्यकीय सेवा मिळतात. त्यांचाही मुद्दा रास्त होता.

गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातही अशा हायटेक डेअरी येऊ लागल्या आहेत. बारामतीची डायनामिक्स असो वा मंचरची गोवर्धन... या डेअऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन होते. पण भारतात अशा प्रकारचा डेअरी उद्योग रुजेल का? मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता हा अडथळा आहे... पण तो सोडवता येऊ शकतो. अशा गोठ्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मनुष्यबळ लागत असल्यामुळे ते भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि बेरोजगारी असणाऱ्या देशात सोयीचे आहेत का? यावरही एक तर्क आहे. पशुसंवर्धन हा वर्षाचे 365 दिवस काबाडकष्ट लागणारा धंदा आहे. त्यामुळे बेरोजगारी असूनही गोठ्यांमध्ये काम करायला माणसं मिळत नाही. अहमदनगर सारख्या दुष्काळी जिल्ह्यात अन्य पर्याय नसल्यामुळे हा उद्योग यशस्वी होतो पण कोकण आणि विदर्भात वर्षभर हिरवा चारा असून मुख्यत्त्वे मनुष्यबळाच्या अभावी खूप मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय नाही.

हायटेक डेअरीमध्ये माणसं कमी लागत असली तरी त्यांना चारा पुरवणे तसेच दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 125 कोटी लोकांचे मार्केट आपल्याकडे आहे आणि जगातील अनेक विकसित तसेच विकसनशील देशात दरडोई दूधाचे सेवन, भारताच्या 5 पट अधिक आहे. या सगळ्याचा विचार केल्यास आधुनिक डेअरींच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि शेतकऱ्यांमध्ये संपन्नता आणता येऊ शकेल असा विश्वास वाटतो. एक गाव-एक डेअरी फार्म हे मॉडेल यशस्वी होऊ शकेल. प्रत्येक कुटुंबाने घरात, मनाच्या समाधानासाठी एक गाय ठेवावी. पण दूध देणाऱ्या गायींसाठी सामुदायिक व्यवस्था असावी.

शासन आणि खाजगी क्षेत्राच्या भागिदारीतून अशा डेअऱ्यांना विविध सेवा आणि सवलती देण्यात याव्या. साखर कारखाने आणि सूत गिरण्यांत जसा सहकाराचा स्वाहाकार झाला तसा नव्या प्रकारच्या सहकारी डेअऱ्यांमध्ये होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. 1970 च्या दशकात आपण ऑपरेशन फ्लड द्वारे दुधाचा पूर आणला. आज 125 कोटी लोकसंख्येच्या भारताला दुधाच्या महापूराची आवश्यकता आहे.

श्री. अनय जोगळेकर 
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

English Summary: Hi Tech Milk Flood
Published on: 28 February 2019, 02:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)