कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त प्रश्न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच "हिट स्ट्रेस!'कोंबड्यांचे शरीर तापमान हे मुळातच जास्त असते. शिवाय मनुष्य व इतर प्राण्याप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रण करण्यासाठी कोंबड्यांना घाम येत नाही. पर्यायाने शरीर तापमान नियंत्रण करण्याकरिता कोंबड्या इतर पद्धतीचा वापर करतात.
ज्यावेळी शरीर तापमान नियंत्रित करणे आवश्यक असते, अशावेळी कोंबड्या पाण्याचे पाइप, पाण्याची भांडी यांना स्पर्श करतात. याद्वारे शरीर थंड होण्यास मदत होते.कोंबड्या शेडमध्ये वापरलेले बेडिंग म्हणजे जमिनीवर अंथरलेले तुस हे बाजूस सरकवून जमिनीवर पंख पसरवून बसतात. याद्वारे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते.साधारणतः 35 अंश सेल्सिअस या तापमानापर्यंत कोंबड्यांना विशेष ताण येत नाही. परंतु, उन्हाळ्यात तापमान यापेक्षा खूप अधिक वाढते. अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्यक असते. छत थंड ठेवण्याकरिता छतावर गवताचे आच्छादन करावे. शक्य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे (फॉगर्स) दिवसातून 3 ते 4 वेळेस द्यावेत.
ज्यावेळेस वरील पद्धतीनेदेखील तापमान नियंत्रित करणे कठीण जाते, त्या वेळी कोंबड्या मोठ्याने श्वास घेतात. कोंबड्या खाद्य कमी व पाणी जास्त पितात. परंतु, हे मोठे श्वास घेतल्यामुळे शरीरात कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून रक्तातील अल्कली वाढतात. यामुळे रक्ताची कॅल्शिअम वहनक्षमता कमी होऊन त्याचा परिणाम हाडांवर व अंडी उत्पादनावर होतो. वरील सर्व बाबींचा विचार करता, या ताणामुळे कोंबड्यांमध्ये मरदेखील मोठ्या प्रमाणात होते. या ताणावर (हिट स्ट्रेस) उपचार करत असताना केवळ औषधोपचार न करता संगोपनात काही बदल करणे आवश्यक आहे.
संगोपनातील बदलखाद्य देण्याच्या वेळा
उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी म्हणजेच थंड वेळेत द्यावे. सकाळच्या वेळी कोंबड्यांच्या शरीरात ऊर्जानिर्मिती 20 ते 70टक्के कमी असते. खाद्याद्वारे निर्माण होणारी ऊर्जा ही थंड वेळेत केवळ दोन तासांपर्यंत परिणाम दर्शविते, तर वातावरणातील तापमान हे 35 अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम 10 तासांपर्यंत असतो म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी आपण ताण बराच कमी करू शकतो.
कोंबड्यांचे घरे
कोंबड्यांची शेड पूर्व-पश्चिम असावी. यामुळे घरात हवा खेळती रहाते. कोंबड्यांना प्रत्यक्ष उन्हापासून संरक्षण मिळते.
पोल्ट्री शेडमध्ये गर्दी टाळावी. आवश्यक तेवढ्या कोंबड्या ठेवाव्यात.
छतावर पाण्याचे फवारे लावावेत. छत झाकून ठेवावे. पोल्ट्री शेडच्या छतावर व भिंती पांढऱ्या (चुन्याने) रंगाने रंगवाव्यात.
औषधोपचार
औषधोपचार करत असताना नंतर उपचार करण्याऐवजी जर कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व "सी' व "ई' यांचा वापर करावा.
व्हिटॅमिन "ई'चा वापर साधारणपणे 250 मि. ग्रॅ. प्रति किलो खाद्य व व्हिटॅमिन "सी'चा वापर 400 मि. ग्रॅम प्रति किलो खाद्य असा असावा. सोबतच इलेक्ट्रोलाइट्स व डेकस्ट्रोजचा वापर अत्यंत आवश्यक आहे.
ताणामध्ये शरीर ऊर्जा एकदम न वाढता ती आवश्यक प्रमाणात सतत असणे आवश्यक आहे. अशावेळी प्रत्यक्ष कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा.
औषधी वनस्पतींचा वापर
ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा.
आवळा : 10-20 ग्रॅम प्रति 100 कोंबड्या.
संत्री/ लिंबू : 30-40 ग्रॅम प्रति 100 कोंबड्या.
लिंबू किंवा संत्र्याची सालदेखील उपयुक्त आहे. यांचादेखील वापर करावा.
याचबरोबरीने अश्वगंधा, तुळस, मंजिष्ठा, शतावरी यांचा वापर करावा.
अश्वगंधा - 4 ग्रॅम
तुळस - 4 ग्रॅम
मंजिष्ठा - 4 ग्रॅम
शतावरी - 5 ग्रॅम
वरील सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून 100 कोंबड्यांसाठी वापराव्यात. पाण्यातून वापर वरील वनस्पतींमध्ये चारपट पाणी टाकून उकळाव्यात. पाणी अर्धे राहिल्यानंतर गाळून घेऊन हा अर्क 10 ते 15 मि.लि. प्रति 100 कोंबड्या या मात्रेत द्यावा.
लेखक :
डॉ. गणेश यु.काळुसे
विषय विशेषज्ञ(पशु संवर्धन व दुग्धव्यवसाय)
व
डॉ .सी .पी .जायभाये , कार्यक्रम समन्वयक
कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा.
Published on: 02 April 2021, 10:29 IST