शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हरियाणा या राज्याने पशू किसान क्रेडिट कार्डाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत ६० हजारांहून अधिक लाभार्थी निवडले गेले आहेत. आतापर्यंत यासाठी विविध बँकांमध्ये सुमारे ४ लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हरियाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने ८ लाख पशूपालकांना या कार्डाद्वारे सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. पशू क्रेडिट कार्डासाठीच्या अटी केंद्र सरकारने लागू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेप्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत.
देशात हरियाणा हे एकमेव असे राज्य आहे की ज्यांच्यावतीने पशू क्रेडिट कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. याद्वारे ८ लाख शेतकऱ्यांना फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे. याबाबत कृषी मंत्री दलाल यांनी सांगितले की, शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी संबंधित क्षेत्रांमध्ये पशूपालन हे एक प्रमुख क्षेत्र आहे. पशूधन क्रेडिटच्या अंतर्गत पशूपालकांना आपल्या जनावरांच्या देखभालीसाठी कर्जाच्या माध्यमातून मदत केली जाईल. यासाठीची मर्यादा ३ लाख रुपये आहे. यापैकी १ लाख ६० हजार रुपयांच्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या जामिनाची गरज नाही. या योजनेत, जनावरांच्या संख्येप्रमाणे कार्डवरील मर्यादा ठरणार आहे. यासाठी बँकर्स कमिटीने सरकारला सहयोगाची तयारी दाखवली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना पशू किसान क्रेडिट कार्डाचा लाभ दिला जाईल असे आश्वासन बँकिंग क्षेत्रातील घटकांनी दिले आहे. बँकिंग क्षेत्राच्या सहकार्याशिवाय हे उद्दीष्ट पूर्ण होणे कठिण असल्याचे दलाल यांनी सांगितले. या योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी बँकांच्यावतीने शिबिरांचेही आयोजन केले जाणार आहे. पशू वैद्यकीय अधिकारी, जनावरांसाठीच्या दवाखान्यांमध्ये खास होर्डिंग लावून योजनेची माहिती देतील. हरियाणामध्ये जवळपास १६ लाख परिवारांकडे दुधाळ जनावरे आहेत. त्यांच्या टॅगिंगचे काम सध्या सुरू आहे.
गाय, म्हशीसाठी किती पैसे मिळणार ?
- गायीसाठी 40,783 रुपये देण्याची तरतुद करण्यात आली आहे.
- म्हशीसाठी 60,249 रुपये देण्यात येतील. प्रत्येक म्हशीसाठी ही किंमत निश्चिती करण्यात आली आहे.
- शेळी, मेंढ्यांसाठी 4063 रुपये दिले जाणार आहेत.
- अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी प्रत्येकी 720 रुपये कर्ज मिळेल.
क्रेडिट कार्डसाठी पात्रतेचे निकष
- अर्जदार हा हरियाणा राज्यातील स्थानिक रहिवासी असला पाहिजे.
- अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र
- मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो.
अशी असेल अर्ज प्रक्रिया
- हरियाणा राज्यातील जे इच्छूक लाभार्थी या योजनेंतर्गत पशू क्रेडिट कार्ड घेऊ इच्छितात, त्यांना आपल्या जवळच्या बँकेत जावून अर्ज करावा लागेल.
- अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन बँकेमध्ये जावे लागेल. तेथे अर्ज भरावा लागेल.
- अर्ज भरल्यानंतर अर्जदाराला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- केवायसीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो द्यावा लागेल.
- पशूधन क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी बँकेच्यावतीने केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर एक महिन्यात प्रक्रिया केली जाईल. शेतकऱ्यांना एका महिन्यात पशूधन क्रेडिट कार्ड मिळेल.
Published on: 16 October 2020, 11:29 IST