पशुपालना मध्ये चांगला नफा मिळवायचा झाल्यास जनावरांना वर्षभर चांगल्या प्रतीचा व पुरेशा प्रमाणात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असणे फार गरजेचे आहे. जनावरांना कोणत्या प्रकारची गरज आहे त्यानुसार चारा पिकांची लागवड केल्यास वर्षभर हिरवा चारा पुरवत येतो.
हिरवा चार याचा विचार केला तर संतुलित आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जनावरांच्या आहारातील चाऱ्याचा भाग 65 ते 70 टक्के, तर तीस ते पस्तीस टक्के भाग हा पशुखाद्याचा असतो. जनावरांच्या हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल व द्विदल त्यासोबतच वाळलेला अशा दोन प्रकारचा चारा लागतो. वाळलेला चारा पीक अवशेष साठवून ठेवून किंवा कोणत्याही हंगामात विकत घेऊन वापरता येतो. परंतु हिरव्या चाऱ्यासाठी चारा पिकांची लागवड आवश्यक असते.
जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्व
- जनावरांचे आरोग्य व पुनरुत्पादन क्रिया चांगली राहण्यास मदत करतो.
- चाऱ्यात पाण्याचे, प्रथिनांचे तसेच जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते.
- हिरवा चारा रुचकर असून जनावरांना सहज पोचतो तसेच सौम्य रेचक म्हणून उपयुक्त आहे.
- हिरव्या चाऱ्यातील विविध अन्नघटक हे नैसर्गिक अवस्थेत जनावरांना उपलब्ध होतात.
- हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे खाद्याचा कार्यक्षमपणे वापर होतो तसेच विविध अवयवांवर तान येत नाही.
- जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिरव्या चाऱ्यामुळे जनावरांच्या आयुष्यमान तसेच उत्पादनात वाढ होते.
हिरवा चारा उत्पादनातील महत्त्वाचे घटक
हिरवा चारा लागवड करताना हंगाम,पाण्याची उपलब्धता,जनावरांची संख्या, दररोज लागणाऱ्या चाऱ्याची गरज, एकूण लागणारा चारा आणि हंगामात उपलब्ध होणारा चारा तसेच हंगामानुसार चारा पिकांच्या सुधारित जातींची लागवड आणि कापणीच्या काळाचे माहिती असणे गरजेचे आहे.
हंगामनिहाय चारापिके
- खरीपहंगाम- कालावधी- जून ते सप्टेंबर- ज्वारी, बाजरी, मका, चवळी, संकरित नेपियर गवत( फुले जयवंत, संपूर्णा, सिओ4)
- रब्बी हंगाम- कालावधी- ऑक्टोबर ते जानेवारी- बरसीम,लुसर्ण, मका, ज्वारी, बाजरी, चवळी
- उन्हाळी हंगाम- कालावधी- फेब्रुवारी ते मे- ज्वारी, बाजरी, मका, चवळी, संकरित नेपियर गवत
जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची गरज
जनावरांना त्यांच्या वजनाच्या आधारे चारा देण्याची पद्धत आहे. गाईला तिच्या वजनाच्या दोन ते अडीच टक्के, म्हशीला तिच्या वजनाच्या 2-2.5-3 टक्के कोरड्या प्रमाणात आहार द्यावा लागतो. एका गाई, म्हशीला सर्वसाधारणपणे एका दिवसाला 20 किलो हिरवा, पाच किलो वाळलेला चारा लागतो. दहा जनावरांसाठी एका दिवसाला 200 किलो हिरवा आणि 50 किलो वाळलेला चारा लागतो. चार महिन्याच्या एका हंगामात दहा जनावरांसाठी 24000 किलो हिरवा आणि सहा हजार किलो वाळलेला चारा लागतो. दुभत्या जनावरांत कडून अपेक्षित दूध उत्पादन घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा आणि चांगल्या प्रतीचा हिरवा चारा द्यावा.
हा चारा वर्षभर बाजारातून विकत घेऊन पुरवणे परवडत नाही. त्यासाठी पशुपालकांनी स्वतःच्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याची लागवड करावी. जेणेकरून चांगल्या प्रतीचा, योग्य प्रमाणात, आवश्यकतेनुसार व कमी खर्चात जनावरांना हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होऊ शकतो.
Published on: 08 March 2022, 02:45 IST