शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून पशूपालन, कुकुट पालन, करून आपल्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
तसेच बरेच जण परसबागेतील कुकुट पालन करतात. त्यामध्ये गिरीराज, वनराज,सुवर्णधारा, कॅरी इत्यादी जातीच्या पाळल्या जातात.
या जातीमध्ये ग्रामप्रिया ही जात अंडी उत्पादनासाठी ग्रामीण भागासाठी वरदान आहे. या लेखात आपण या जातीची माहिती घेणार आहोत.
1) ग्रामप्रिया कोंबडी:
या कोंबडीची जात मध्यम वजनाची असून तसेच तिचे पाय लांब व मजबूत असतात. ही चांगल्या प्रकारे उत्पादन देते. कोंबडीच्या अंड्याचा रंग हा गुलाबी तपकिरी असतो. या कोंबडीच्या व्यवस्थापनाचा जर विचार केला तर सुरुवातीचे सहा आठवडे ते दीड महिना काळजी घ्यावी लागते. जेव्हा पक्षी लहान असतात तेव्हा थंड वातावरण असेल तर पिल्लांना दोन व्हाट प्रति पिल्लू प्रमाणे ऊब द्यावी. हि देण्यासाठी बल्प चा वापर करावा.
2) लागणारे खाद्य :
सुरुवातीचे दोन दिवस पक्षांना मका भरून द्यावी. बाजारात मिळणारे बॉयलर प्री स्टार्टर दिले तर अधिक फायद्याचे असते. तसेच ज्वारी, बाजरी, तांदळाचा चुरा, सूर्यफूल, शेंगदाण्याची पेंड द्यावी. तसेच क्षार, खनिज, फॉस्फरस, जीवनसत्वे यांचे मिश्रण मिसळून घरी तयार केलेले खाद्य किंवा गावरान स्टार्टर खाद्य दिले तरी चालते. सुरुवातीच्या पाच दिवसांमध्ये शुद्ध पाणी द्यावे. काही औषधे व तणावमुक्त करणारी औषधे सुरुवातीचे पाच दिवस पाण्यातून पुरवठा करावा. एक महिन्यानंतर पक्षांना लसूणघास, शेवग्याचा पत्ता, पालक थोड्या प्रमाणात दिली तर पंखांना चकाकी येते.
3) आरोग्य व्यवस्थापन :
तशी ही जात रोगप्रतिकार शक्ती असलेली आहे. परंतु तरीही भविष्यात मर व इतर रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. एक दिवस वेळ असलेल्या पिल्लांना मर एक्स, एच व्ही टी 0.20 एम एल कातडीखाली द्यावा. तसेच पाच दिवसानंतर राणीखेत नावाची लस लासोटा प्रकार एक थेंब डोळ्यात द्यावी. चौदाव्या दिवसाला गंबरी / आय बिडी जॉर्जिया प्रकारची लस एक थेंब डोळ्यात किंवा तोंडात द्यावे. 21 दिवसानंतर देवि नावाची फाऊल पॉक्स 0.20 एम एल मासात किंवा कातडी द्यावी. ज्या दिवशी लसीकरण करायचे असते त्या दिवशी कोंबड्यांना तणावमुक्त करणारी औषधे पाण्यातून प्यायला द्यावी. लसीकरण हे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा नंतरच करावे. लसीकरण करताना पशुवैद्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.
4) ग्रामप्रिया जातीचे परसातील नियोजन :
जेव्हा पक्षी सहा-सात आठवडे वयाची होतात. व त्यांचे वजन साधारणत: 400 ते 500 ग्राम होते. त्यावेळी त्यांना तणावमुक्त वातावरणात सोडतात. रात्री त्यांना खुराड्यात ठेवावे तसेच त्यांना शुद्ध पाणी प्यायला द्यावे. तसेच ज्वारी, बाजरी, तांदळाचा चुरा खाण्यास द्यावा. तसेच माजी पक्षाचे वजन हे सहा महिन्यात 1.6 ते 1.8 किलोग्रॅम ठेवावे. नर पक्षाची सरासरी विक्री योग्य वजन झाल्यावर कधी पण करता येते. राणीखेत देवी रोगाचे लसीकरण दर सहा महिन्यांनी करावे.
5) ग्रामप्रिया कोंबडी ( संक्षिप्तात ):
1) सहा आठवड्यात 400 ते 500 ग्रॅम होते.
2) तसेच ते वाढत जाऊन सहा ते सात महिन्यात 1600 ते 1800 ग्रॅम होते.
3) या कोंबडी चे पहिले अंडे देण्याचा कालावधी हा 160 ते 165 दिवस असते.
4) दीड वर्षाला अंडी उत्पादन200 ते 230 असते.
5) एका अंड्याचे सरासरी वजन हे 52 ते 58 ग्रॅम असते.
6) अंड्यांचा रंग तपकिरी तसेच गुलाबी असतो.
Published on: 02 April 2022, 03:39 IST