Animal Husbandry

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीबरोबरच कृषीसंलग्न पशुपालन, मत्स्यपालन, फळे, भाजीपाला या क्षेत्रांवर देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. राज्यातील मत्स्य व्यवसायिकांचे हे योगदान लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला होता.

Updated on 12 May, 2025 11:49 AM IST

मुंबई : राज्यातील मच्छिमार मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील मच्छिमार  व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीबरोबरच कृषीसंलग्न पशुपालन, मत्स्यपालन, फळे, भाजीपाला या क्षेत्रांवर देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. राज्यातील मत्स्य व्यवसायिकांचे हे योगदान लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापन, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक तसेच यामध्ये प्रतवारी, आवेष्टन, साठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सोयीसुविधा सवलती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे राज्यातील मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे तसेच स्थानिक पातळीवर मत्स्य व्यवसायाद्वारे रोजगारनिर्मितीत मोठा हातभार लागणार आहे. त्याकरिताच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्राला मिळणाऱ्या विविध सुविधा आणि सवलती या आता मत्स्य व्यवसाय क्षेत्रालाही या शासन निर्णयामुळे मिळणार आहेत.

या निर्णयामुळे मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प यांना कृषी दराने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड याचा लाभ दिला जाणार आहे. बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रानुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभही मत्स्य क्षेत्रात देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सौर ऊर्जा संदर्भात  देण्यात येणारे लाभ यापुढे मत्स्य व्यवसायिकांना देण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

या शासन निर्णयात मच्छिमार, मत्स्यसंवर्धकमत्स्य व्यवसायिक , मत्स्यकास्तकार, मत्स्यबीजमत्स्य बोटुकली संवर्धक, मत्स्य व्यवस्थापन अशा मत्स्य व्यवसायाशी संबंधित संज्ञांच्या प्रथमच सुस्पष्ट व्याख्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मत्स्य उत्पादक त्याचबरोबर मत्स्य व्यावसायिक आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कामगार क्षेत्राला या शासन निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.

English Summary: Government decision issued to grant agricultural status to the fishing sector in the state
Published on: 12 May 2025, 11:49 IST