कुकूटपालन व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात केला जात असून त्याला एक व्यावसायिक स्वरूप आले आहे. बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगाराचे उत्तम साधन म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय उदयास येत आहे. हा व्यवसाय तुम्हाला चांगल्या नियोजनाने आणि कमी खर्चात वर्षभर चांगल्या उत्पन्नाची हमी देऊ शकतो.
परंतु यामध्ये कोंबड्यांच्या जातीची निवड देखील तेवढीच महत्त्वाची ठरते. या लेखात आपण गिरीराज या जातीच्या कोंबडीची माहिती घेणार असून कुकुट पालकांसाठी खूप वरदान ठरू शकते.
गिरीराज कोंबडीचे वैशिष्ट्ये
1- ही कोंबडी देशी कोंबड्या प्रमाणे विविध प्रकारच्या रंगांमध्ये दिसून येते.
2- ही कोंबडी कोणत्याही वातावरणात एकरूप होते व तग धरू शकते.
3- गिरीराज कोंबडीचे रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली असते.
4- मांस आणि अंडी जास्त प्रमाणात देते. या कोंबडीचे आठवड्यात वजन एक किलो होते.
5- वर्षाकाठी 160 ते 180 अंडी मिळतात. या कोंबडीचे मांस खायला चविष्ट असते.जवळजवळ 74% मांस मिळते.
6- या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवस असून अंड्याच्या माध्यमातून सशक्त पिले जन्माला घालते.
7- या कोंबडीच्या सफल अंड्यांचे प्रमाण 87 टक्के असून एक किलो वजनासाठी या कोंबडीला 2.6 किलो खाद्य द्यावे लागते.
नक्की वाचा:Loan: 10 शेळ्यांच्या पालनासाठी मिळणाऱ्या कर्जाची सविस्तर माहिती,वाचा अर्ज करण्याची पद्धत
चांगल्या उत्पादनासाठी असे करावे व्यवस्थापन
या कोंबडीचे सुरुवातीपासून खाद्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या टप्प्यापर्यंत चांगले व्यवस्थापन केले तर चांगला नफा या माध्यमातून मिळू शकतो.
जेव्हा आपण या कोंबडीची एक दिवसाची पिल्ले वाहतूक करून शेडपर्यंत आणतो त्यामुळे पिलांना एक प्रकारचा ताण येतो. तो ताण कमी करण्यासाठी पिल्लांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. तसेच दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून अँटिबायोटिक द्यावे.
यामुळे पिल्लांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रोगापासून संरक्षण मिळते. त्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी. पिल्लांवर लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स परत द्यावे.
त्यासोबतच 14 ते 15 व्या दिवशी गंबोरा लस द्यावी. परत त्याच्या दुसर्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे. पिल्ले 25 ते 30 दिवसांचे झाल्यानंतर व 40 ते 50 दिवसांचे झाल्यावर लिव्हर टॉनिक 20 मिली प्रति 100 पक्ष्यांना द्यावे.
खाद्य व्यवस्थापन
सुरुवातीला एक ते दोन दिवस भरडलेला मका द्यावा व त्यानंतर चार आठवडे स्टार्टर खाद्य द्यावे. नंतरचे चार आठवडे फिनिशर खाद्य द्यावे. सरासरी एका पक्षाला मोठे होईपर्यंत अडीच किलो खाद्य द्यावे.
गिरीराज कोंबडीसाठी शेड
जर आपण प्रतिपक्षाचा विचार केला तर एक दिवसाच्या पिल्लापासून ते दोन महिने म्हणजे बाजारपेठेत देण्यापर्यंत एक चौरस फूट जागा लागते.
त्यामुळे या हिशोबाने 100 पक्ष्यांना दहा बाय दहा चौरस फूट क्षेत्रफळाची खोली बांधावी. कोंबडीचे शेड बांधण्यासाठी पूर्व-पश्चिम बांधावे. जागाही उंचवट्यावर असावी. पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी व शेड मध्ये हवा खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.
Published on: 12 September 2022, 01:11 IST