वातावरणातील बदलाचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर पाहायला मिळतो. पावसाळ्यात घटसर्प ह्या रोगाचा प्रादुर्भाव हा जनावरांमध्ये आढळून येतो. त्यालाच हेमोरॅजिक सेप्टिसिमिया असेही म्हणतात. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वेळीच लसीकणरण करुन घेणे गरजेचे आहे.या रोगाची लक्षणे विशेषत: गाई आणि म्हशीमध्ये आढळतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने लवकर पसरतो.
रोगाचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो -
पाणी साचलेल्या,जनावरांचा गोठा अस्वच्छ असलेल्या किंवा अतिकाम करून थकलेल्या प्राण्यांना या आजाराचा संसर्ग होतो. आजारी जनावरांचा चारा, धान्य आणि पाणी यांचे इतर जनावरांनी सेवन केल्यास किंवा संपर्कात आली तर हा आजार होतोच. तसेच गाईच्या दुधानेही घटसर्प रोगाचा प्रसार होतो.
घटसर्प रोगाची लक्षणे-
- जनावरांना तीव्र ताप येतो, जवळपास 105 ते 106 डिग्री फॅ. ताप जावु शकतो
- जनावरांचे डोळे लाल आणि सुजलेले दिसायला लागतात.
- नाक,डोळे आणि तोंडातूनस्त्राव होतो.
- मान,डोके आणि पायांना सूज येते.
- श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून प्राण्याचा मृत्यू होवु शकतो .
संसर्ग झालेल्या प्राण्यांची काळजी कशी घ्याल -
या आजारामध्ये जनावरांना अधिक प्रमाणात ताप येतो. श्वास घेण्यास त्रास होवून घशा भोवती सूज येवून जनावरे मृत्युमुखी देखील पडतात. जनावरांच्या शरीरामध्ये घटसर्पाचे जंतू असतात, परंतू वातावरणात झालेला बदलांमुळे व उन्हाळ्यात पौष्टिक चारा न मिळाल्याने शरीरावर ताण येऊन जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होवु लागते.या आजारावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.घटसर्पची लक्षणे आढळून आल्यास पशूवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य तो सल्ला घ्यावा. दरवर्षी मान्सूनपूर्व या आजाराची लस पशुवैद्यक संस्थेकडून घेणे आवश्यक आहे.त्याचबरोबर हे लसीकरण पावसळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. जनावरांना घटसर्प आजाराची लक्षणे दिसताच संसर्ग झालेल्या प्राण्याला इतर निरोगी प्राण्यांपासून जनावर वेगळे करावे.तसेच संसर्ग झालेल्या प्राण्याला नदी, तलाव, तलाव इत्यादी ठिकाणी पाणी पिऊ देऊ नये.
Published on: 30 September 2023, 04:13 IST