दुग्धोव्यवसायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होते. जगभरातील दूध उत्पादक देशांच्या तुलनेने भारतात १९ टक्के दुग्ध उत्पादन होत असते. तर राज्यात दुधाचे संकलन दरदिवशी सव्वा कोटी लिटरच्या आसपास होते. पण मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात दुधाची विक्री दोन कोटी ३० लाख लिटरच्या आसपास होते असा ढोबळ अंदाज आहे. दरम्यान दुधाच्या व्यवसायात आपल्याला अधिक नफा हवा असेल तर म्हैशींचे पालन केलेले चांगले असते कारण शिवाय निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे, उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असते. यासह अधिक दूध देणाऱ्या म्हैशी हव्या जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल. आज आपण राज्यातील काही म्हैशींच्या जातीविषयी आपण जाणून घेणार आहोत.
म्हशींच्या जाती
मुऱ्हा - या जातीच्या म्हैशी महाराष्ट्रासह उत्तर भारतातही आढळतात. या जातीच्या म्हैशी एका वेतात १८०० ते २००० लिटर दूध देत असतात. या म्हैशींची शरीरबांधणी मोठी, भारदस्त व कणखर असते.
मेहसाणा - ही जात सुरती आणि मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली आहे. या जातीच्या म्हैशींची शरीर बांधणीही मुऱ्हा जातीच्या म्हैशींसारखी असते. या म्हैशी एका वेतात सरासरी ३ हजार लिटरपर्यंत दूध देतात.
पंढरपुरी - या म्हैशी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम; पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देते.
सुरत - या जातीच्या म्हैशीचा शरीर बांधा हा मध्यम असतो. या म्हैशींचे शिंगे ही रुंद असतात. एका वेतात या म्हैशी १८०० लिटर दूध देत असतात.
Published on: 08 May 2020, 05:00 IST