पशुसंर्वधन व्यवसायातील जास्तीत जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावरच होत असतो त्यामुळे पशुआहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनुवंशिकदृष्ट्या गाय किंवा म्हैस कितीही उच्च वंशावळीची असली तरी तीचे अनुवंशिक गुण प्रत्यक्ष दूध उत्पादनामध्ये उतरविण्याकरीता त्यांना संतुलित आहार पुरविणे गरजेचे आहे. संतुलित आहार म्हणजे ज्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिन्ने, स्निग्ध व तंतुमय पदार्थ व पाणी हे अन्नघटक, विविध जिवनसत्वे व खनिजे योग्य प्रमाणात पुरविली जातात. ज्यातून जनावरांना विविध शारिरीक कार्य करणे व उत्पादन देणे यासाठी पर्याप्त ऊर्जा मिळेल. असा उत्तम प्रतिचा व सकस आहार जनावरांना त्यांच्या वजनाच्या व दूग्ध उत्पादनाच्या प्रमाणात द्यावा. या आहारामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा, खूराक आणि खनिज मिश्रणे या सर्वांचा अंतर्भात असावा. तसेच चाऱ्यामध्ये एकदल व द्विदल अशी दोन्ही चारा पिके असावीत.
सर्वसाधारण 400 किलो वजन व 18 ते 20 लिटर दूग्ध उत्पादन असणाऱ्यासाठी गायीसाठी खालीलप्रमाणे आहार देणे गरजेचे आहे.
- हिरवा चारा : 20 ते 25 किलो.
- वाळलेला चारा : 4 ते 6 किलो.
- खनिज मिश्रणे : 40 ते 50 ग्रॅम.
- शुद्ध पाणी : 60 ते 70 लि.
कोरडवाहु शेतीमध्ये अवेळी व अपुर्या पडणार्या पावसामुळे आणि हलक्या व उथळ जमिनित लागवड केल्याने उत्पादनात घट होत आहे. केवळ पारंपारिक पिकांच्या उत्पादनावर कोरडवाहु शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकणार नाही. अशा जमिनित गवते किंवा चारा पिके घेणे फायदेशिर राहील. चराऊ रानाची योग्य जोपासना व नुतणीकरण केल्यास निश्चित चार्याचे उत्पादन घेता येऊ शकते. या पडीक जमिनिवर निकृष्ट प्रतिचे गवत येते. या ठिकाणी गवताच्या सुधारित वाणांची नियोजनबद्ध लागवड केल्यास चांगला चारा मिळू शकतो.
त्यावर शेळीपालन, मेंढीपालन व दूग्धव्यवसाय किफायतशीर होऊ शकेल. तसेच गवतामुळे जमिनीची धूप थांबुन मृद संधारण व जलसंधारण होवून जमिनिचा पोत सुधारेल. दरवर्षी 750 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस व उथळ जमिन असणार्या भागामध्ये डोंगरी गवत, दिनानाथ, अंजन गवत घेणे किफायशिर ठरेल. तसेच दरवर्षी 750 मिलीमिटर पेक्षा कमी पाऊस व 22.5 से.मी. पेक्षा अधिक खोलीच्या जमिनिमध्ये मारवेल 8, निलगवत, मोशी, अंजनगवत घेता येते. स्टालयो, रानमुग, सुबाभुळ, दशरथ, शेवगा, शेवरी यासारखी द्विदल पिके घेतल्यास जनावरांना प्रथिने, खनिजे, क्षार आणि जीवनसत्वेसुद्धा मिळतील.
मुरघास:
आपल्याकडील जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चार्याचे योग्य नियोजन केल्यास जनावरांना वर्षभर हिरवा व वाळलेला चारा पुरविता येईल. हिरवा चारा ज्यावेळी अतिरिक्त प्रमाणात उपलब्ध असेल तो मुरवून ठेवून टंचाई सदृष्य काळामध्ये हिरवा चारा उपलब्ध नसताना गरजेनुसार वापरता येऊ शकतो. असा खरीपात व रब्बी हंगामात ज्यादा असलेला व विशिष्ट पद्धतीने मुरवून साठा करून ठेवलेल्या चाऱ्यास मुरघास असे म्हणतात.
मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, हत्ती गवत, लसुण घास, ऊसाचे वाडे या पिकांच्या वापर करता येतो. मोठ्या प्रमाणातील मुरघास खड्ड्यामध्ये बनविला जातो. त्यासाठी जमिनीमध्ये गरजेनुसार खड्डा काढला जातो. या खड्ड्यातील चाऱ्यामध्ये पाणी किंवा ओलावा जाऊ नये यासाठी खड्ड्याच्या भिंतीत सिमेंटने बांधून घ्याव्या लागतात. किंवा खड्डयामध्ये प्लास्टिक कागद टाकता येतो. जनावरांची संख्या कमी असल्यास मुरघास खड्ड्यामध्ये बनविण्यासाठी जमिनित गरजेनुसार खड्डा काढणे, खड्ड्याच्या भिंती सिमेंटने बांधुन घेण्यास लागणार खर्च खुप जास्त होतो तो वाचविण्यासाठी असा मुरघास प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये देखील बनविता येतो. खास मुरघासासाठी प्लास्टिकच्या पिशव्या बनविल्या जातात. चारा चाराकुट्टी यंत्राच्या सहाय्याने बारिक करून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरावा. दाब देऊन थरावरथर लावावेत व पिशवी पुर्ण भरल्यानंतर हवाबंद करुन ठेवावी.
शेतीतील दुय्यम पदार्थाचा पशुखाद्यासाठी उपयोग:
टंचाईसदृश काळामध्ये शेतीतील दुय्यम उत्पादनांचा पशुआहारासाठी उपयोग करता येतो. जसे की गहु किंवा भाताचे काड. गहु/भात पिकाच्या काढणीनंतर काड जनावरांना चारा म्हणुन वापरता येते. हा चारा अधिक रूचकर व पौष्टीक करण्यासाठी त्यावर युरिया, मिठ व गुळ यांचे द्रावण शिंपडावे. 100 किलो गव्हाच्या काडावर अशी प्रक्रिया करण्यासाठी 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 किलो युरिया, 3 ते 4 किलो गुळ, 1 किलो मिठ व 1 किलो खनिज मिश्रण विरघळवून द्रावण वापरावे.
गव्हाचे काड
गहु पिकाच्या काढणीनंतर गव्हाचे काड जनावरांना चारा म्हणून वापरता येते. हा चारा अधिक रूचकर व पौष्टीक करण्यासाठी त्यावर 1% युरिया, मिठ व गुळ यांचे द्रावण शिंपडावे.
गहू व हरभारा भुस्सा
गव्हाच्या मळणीनंतर मिळणारा भुस्सा पेटवून दिला जातो. त्यास प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे खाद्य म्हणून वापरता येते. युरियातील अमोनिया शोषला जाऊन भुस्स्यात 6 ते 7 टक्के प्रथिनांमध्ये वाढ होते.
प्रक्रिया
- सावलीमध्ये भुस्स्याचा 4 इंच थर पसरावा.
- 50 लिटर पाण्यात प्रथम युरिया विरघळल्यानंतर त्यात ऊसाची मळी, मिठ व क्षार टाकून मिसळावे.
- 4 इंच थरावर 25 लि. द्रावण शिंपडावे. द्रावण शिंपडलेल्या थराला पलटी करावे. पुन्हा उरलेले 25 लिटर द्रावण शिंपडावे व भुस्सा गोळा करून ढिग करावा.
- पोत्याचे तळवट किंवा प्लास्टिक कागदाच्या अवरणाखाली ढिग हवाबंद करावा.
- 2 ते 3 आठवड्यांनी प्रति जनावरास 3 ते 4 किलो प्रमाणे खाऊ घालावे.
- दुसर्या प्रक्रियेमध्ये ऊसाच्या मळीऐवजी 5 किलो खराब गुळ वापरला जातो व असा प्रक्रिया केलेला भुस्सा जनावरांना खाद्य म्हणून लगेच वापरता येतो.
हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती:
जनावरांना वर्षभर हिरवा व वाळलेला चार पुरविने गरजेचे असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात व टंचाईसदृश्य काळामध्ये हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा जनावरांना पुरविता येतो. जमिनीमधुन हिरवा चारा उत्पादनासाठी लागणार्या पाण्यापेक्षा किती तरी पटीने कमी पाण्यामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती केली जाते. या तंत्रज्ञानाद्वारे वेळ, पाणी आणि विज यांचा कार्यक्षम वापर केला जातो. तसेच कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये हिरवा चारा निर्माण केला जातो. जमिनीमधुन हिरवा चारा उत्पादनासाठी नांगरणी, पेरणी, कापणी यासाठी मजूरांची संख्याही जास्त लागते. तसेच मुबलक रासानिक व सेंद्रिय खतांचा पुरवठा करावा लागतो. तरिही वर्षभर समप्रमाणात व एकसारखा चारा उपलब्ध होत नाही कारण नैसर्गिक संकटांमुळे नुकसान होऊ शकते.
हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे चारा निर्मितीसाठी 6 ते 8 टप्प्यांचा सांगाडा बनवला जातो ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यांवर प्लास्टिकचे ट्रे ठेवले जातात प्रत्येक 1.5×1 फुट आकाराच्या ट्रेमध्ये 1 किलो बियाणे ठेवता येते. फॉगर्सच्या सहाय्याने टायमरद्वारे प्रत्येक दोन तासांनी 45 सेकंद पाणी शिंपडले जाते. अशाप्रकारे एक किलो बियाणांपासून साधारणत: 8 दिवसात 7 ते 8 किलो चार मिळतो.
प्रकिया
- 85% पेक्षा जास्त उगवन क्षमता असणार्या चांगल्या प्रतिच्या बियाण्याची निवड करणे.
- स्वच्छ पाण्याने बियाणे धुणे व 1 टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करणे.
- 12 ते 18 तास बियाणे पाण्यामध्ये भिजवण
- बियाणे ट्रेमध्ये पसरवून ठेवण
- गरजेनुसार एक दोन दिवसांच्या अंतराने ट्रे ठेवणे.
- 8 दिवस फॉगर्सच्या सहाय्याने पाणी देणे.
प्रा. सागर सकटे (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)
प्रा. मोहन शिर्के (कार्यक्रम समन्वयक)
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा
Published on: 27 February 2019, 03:59 IST