Animal Husbandry

महाराष्ट्राला थोड्याफार फरकाने दर वर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागतोय. चालू वर्षी 150 हून अधिक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. येत्या एक दोन महिन्यात टंचाई अधिक त्रीव्र होत जाईल. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होईल. चारा व्यवस्थापन योग्य रीतीने न झाल्यास, दुग्धव्यवसाय तोट्यात जाऊन पशुपालकांना ताजा पैसा देणारा व्यवसाय अडचणीत येवू शकतो. म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून दि. 1 ते 10 जानेवारी महाराष्ट्र भर “चारा साक्षरता अभियान” राबविले गेले.

Updated on 28 February, 2019 1:34 PM IST


महाराष्ट्राला थोड्याफार फरकाने दर वर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागतोय. चालू वर्षी 150 हून अधिक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. येत्या एक दोन महिन्यात टंचाई अधिक त्रीव्र होत जाईल. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होईल. चारा व्यवस्थापन योग्य रीतीने न झाल्यास, दुग्धव्यवसाय तोट्यात जाऊन पशुपालकांना ताजा पैसा देणारा व्यवसाय अडचणीत येवू शकतो. म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून दि. 1 ते 10 जानेवारी महाराष्ट्र भर “चारा साक्षरता अभियान” राबविले गेले.

चारा साक्षरता अभियानाचा मुळ उद्देश “उपलब्ध चारा साठविणे, योग्यरीतीने वापरणे तसेच चाऱ्याची पोषण क्षमता वाढवणे” साठी पशुपालाकांना साक्षर करणे हा आहे. अभियानात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रति तालुका दोन ठिकाणी चारा साक्षरता अभियानाचे नियोजन करण्यात आले होते. अश्या प्रकारे ७०० हून अधिक कार्यक्रमातून स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध चाऱ्याची साठवणूक, योग्य रीतीने वापर व चाऱ्यातील पोषक घटक वाढवून ते जनावराच्या रक्तात कसे पोहचतील याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

दुग्धव्यवसायात सर्वात जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावर होत असतो. टंचाई परिस्थितीत चारा उपलब्ध न झाल्यास, जनावरांना पिकांच्या अवशेषांवर किंवा निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर गुजराण करावे लागते. योग्य पोषण मुल्ये न मिळाल्यामुळे दुग्धोत्पादन व प्रजनन दोन्हीही बाधित होते. त्यामुळे दोन महिन्यानंतर उद्भवणाऱ्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच नियोजनास सुरवात केली पाहिजे.

यासाठी चारा साठवणुकीचे विविध तंत्रज्ञान जसे मुरघास बनविणे, उपलब्ध चाऱ्याचा योग्य रीतीने वापर करण्यासाठी कुट्टी करण्यासारख्या एकदम साध्या गोष्टीपासून ते विविध जीवाणू किंवा एन्ज़ाईम्सच्या वापरापर्यंत तसेच चाऱ्याची पौष्टीकता वाढविण्यासाठी वाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया, वाढयावर चुन्याच्या निवळीची प्रक्रिया किंवा वाढयाचा विशिष्ठ जीवाणू वापरून मुरघास बनविणे यासारख्या तंत्रज्ञानांचा वापर पशुपालकांनी करणे गरजेचे आहे.  

हे सर्व तंत्रज्ञानाविषयी माहिती घेण्या अगोदर जनावरांच्या पचन संस्थेचे व पचन क्रियेबद्दल माहिती पशुपालकाला करून देणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्या प्रक्रियेने जनावराच्या पोषणात काय फरक पडणार आहे हे कळेल. गाई म्हैशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत. म्हणजे हे प्राणी आधी चारा पूर्णपणे न चावता, खाऊन घेतात व नंतर निवांत बसून पोटात भिजलेला चारा पुन्हा तोंडात काढून चावून पुन्हा गिळतात. जनावरांची पचन संस्था तोंडापासून सुरु होते. अन्ननलिका हा एक नळी सारखा अवयव असतो जो पोटाला तोंडाशी जोडतो. जनावरांना रुमेन, रेटीकुलम, ओम्याझम व अबोमाझम असे चार कप्प्यांचे पोट असते. पुढे लहान आतडे व मोठे आतडे असतात.

रुमेन मध्ये चारा साठविला जातो तेथे तो भिजून किण्वन प्रक्रिया होते. किण्वन प्रक्रियेत पोटात असलेले विविध जीवाणू, बुरशी व प्रोटोझुआ हे चाऱ्याचे वेगवेगळ्या घटकात रुपांतर करतात, त्यातील काही घटक जनावरच्या शरीरात शोषले जातात तर काही जीवाणूंची वाढ होण्यासाठी वापरले जातात. यामध्ये पिष्टमय पदार्थ व लिग्निन, सेल्लुलोज व हेमिसेल्लुलोज सारख्या कर्बोदकांचे रुपांतर तीन प्रकारच्या व्होलाटाइल फॅटीअँसीड मध्ये होते. व्होलाटाइल फॅटीअँसीड मधून जनावरांना उर्जा मिळते तसेच त्यांच्या प्रमाणावर दुधातील स्निग्धांशाचे (फॅटचे) प्रमाण ठरते. तसेच बरेचश्या प्रथिनांचे सुद्धा किण्वन प्रक्रियेत अमिनो एसिडस, अमोनिया व इतर घटकांत रुपांतर होते. त्याचबरोबर चाऱ्यातील इतर नत्र घटक जसे युरिया, अमोनियम साल्ट आणि नायट्रेट  ह्यांचा वापर करून जीवाणू स्वतःच्या वाढीला लागणारे प्रथिनांची निर्मिती करतात. हे जीवाणू पुढे अबोमाझम मध्ये गेल्यानंतर तेथील एन्ज़ाइम्स मुळे पचविले जातात व त्यांचे पासून जनावरांना प्रथिने मिळतात. रुमेन मधील जीवाणू ‘ब जीवनसत्वे’ व ‘क जीवनसत्व’ तयार करतात. स्निग्ध पदार्थ मोठ्या आतड्यात पचवली जातात.

म्हणजेच येथे जनावरांपेक्षा त्यांच्या पोटातील किण्वन करणाऱ्या जीवाणू, बुरशी व प्रोटोझुआ यांना खाऊ घातल्यास जनावरांचे योग्य पोषण होते. त्यासाठी ज्या गोष्टी ह्या जीवाणूकडून पचविल्या जाऊ शकत नाही त्यावर अगोदरच प्रक्रिया करणे तसेच त्यांना आवश्यक त्या घटकांची उपलब्धता करून दिल्यास जनावरांना दिलेल्या चाऱ्याची पौष्टिकता वाढून टंचाईच्या काळात जनावरे जगवण्याबरोबरच दुग्धोत्पादन सुद्धा टिकून राहू शकते.

डॉ. सचिन रहाणे, डॉ. शरद लोंढे, डॉ. संतोष वाकचौरे आणि डॉ. दीपक औताडे
पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य “चारा साक्षरता अभियान” समन्वय समिती
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

English Summary: Fodder Literacy Mission
Published on: 27 February 2019, 04:51 IST