अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः 280-310 अंडी देतात. अंडी उत्पादन क्षमता कोंबड्यांच्या जातीवर अवलंबून असते. सरासरी 310 ही अंडी उत्पादन क्षमता असली, तरी याच्या 90 टक्के एवढेच उत्पादन कोंबड्यांकडून मिळते. संगोपनातील कमतरता, हाताळणी किंवा इतर बाबींमुळे येणारा ताण, जंतांचा प्रादुर्भाव, संक्रमण आजार, या कारणांमुळे कोंबड्यांमधील उत्पादन क्षमता कमी होते. बऱ्याच वेळा जंत व इतर संक्रमण आजारांवर उपचार केल्यानंतर देखील यांच्या उत्पादनात अपेक्षित वाढ लवकर होत नाही.
काही फार्मवर अंडी उत्पादन सर्व उपाय केल्यानंतर देखील 80 ते 85 टक्क्यांच्या पुढे जात नाही. अशा वेळी कुक्कुटपालकांचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन अंडी उत्पादनवाढीसाठी आपण औषधी वनस्पतींचा वापर करून शकतो. साधारणतः कोंबड्यांचे अंडी उत्पादन वयाच्या 17 व्या आठवड्यापासून 72 व्या आठवड्यापर्यंत मिळते. 72 च्या नंतर उत्पादन कमी होत जाते. अंडी उत्पादन काळात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याकरिता औषधी वनस्पतींचा चांगला उपयोग होतो.
हेही वाचा :राज्यात अंडी, मटण, मासळी व फळे विक्री मान्य
अंडी उत्पादन वाढीकरिता उपयुक्त औषधी वनस्पती:
- शतावरी
शतावरी ही सर्वत्र आढळणारी वनस्पती शोभेसाठी कुंडीत लावली जाते. या वनस्पतीचे मूळ औषधीत वापरले जाते. या मुळाची पावडर कोंबड्यांच्या खाद्यातून द्यावी.
मात्रा: कमी झालेले अंडी उत्पादन वाढविण्याकरिता प्रति पक्षी 0.5 ग्रॅम या मात्रेमध्ये शतावरीचा वापर करावा. साधारणतः वयाच्या 10व्या आठवड्यापासून 0.25 ग्रॅम प्रति पक्षी या मात्रेत या वनस्पतीचा वापर केल्यास पक्षाच्या अंडी उत्पादनात वाढ होते. - जिवंती
जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढविणारी आणि कोंबड्यांमध्ये अंडी उत्पादन वाढविणारी ही वनस्पती आहे. संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधीत होतो.
मात्रा: प्रति पक्षी 0.5 ग्रॅम या प्रमाणाक वनस्पतीची मात्रा असावी. - मेथी
मेथी या वनस्पतीच्या "बी' म्हणजेच आपल्या रोजच्या वापरातील मेथ्या. अंडी उत्पादन वाढविण्याकरिता मेथी अत्यंत उपयुक्त आहे.
मात्रा: 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी अशी खाद्यातून नियमित मात्रा द्यावी.
एकञित वापर
वरील सर्व वनस्पतींचा एकत्रित उपयोग अत्यंत गुणकारी ठरतो यासाठी
- शतावरी - 45 ग्रॅम
- जिवंती - 45 ग्रॅम
- मेथी - 10 ग्रॅम
वापर: वरील सर्व घटक एकत्र करून बारीक करावेत
मात्रा: 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी या मात्रेत दररोज पक्ष्यांच्या खाद्यातून द्यावी.
हीच एकत्रित औषधी पक्षाच्या वयाच्या 100 आठवड्यांपासून 10 ग्रॅम प्रति 500 पक्षी या मात्रेत नियमित दिल्यास अशा पक्ष्यांपासून जास्तीत जास्त अंडी उत्पादन मिळते.
अंडी देणाऱ्या कोंबडीची लक्षणे:
- अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.
- डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भडक असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.
- कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.
- कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरडते.
- कोंबडीचा मागील (गुदा/योनी) भाग हा सतत ओलसर आणि हालचाल करणारा असतो.
- कोंबडी एकाजागी खुडूक बसून रहात नाही.
- अंडी देणारी कोंबडी ही नेहमी खाद्य खाण्यास उत्सुक असते. अशी कोंबडी भरपूर पाणी पिते.
लेखक:
डॉ. गणेश यु. काळुसे (विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)
डॉ. सी. पी. जायभाये (कार्यक्रम समन्वयक)
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.
Published on: 07 November 2019, 05:28 IST