Animal Husbandry

आदिकाळापासून भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र, वाढत्या मत्स्य उत्पादनामुळे भारताला आता एक नवीन ओळख मिळत आहे. २०२३-२४ मध्ये देशाने सुमारे ३२८८ लाख टन अन्नधान्याचे उत्पादन केले, तरीही लोकसंख्येचा वेगाने वाढता दर आणि हवामान बदलामुळे भविष्यात अन्नटंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रथिनयुक्त, सुलभ आणि पोषक अन्नाचा पर्याय शोधणे अत्यावश्यक बनले आहे. शेतीसाठी लागणारी जमीन, पाणी, कुरणे यांचा तुटवडा, तसेच शेतीवरील प्रतिकूल हवामानाचा परिणाम लक्षात घेतल्यास, मासे हा अन्नाचा एक शाश्वत व फायदेशीर पर्याय ठरतो.

Updated on 25 August, 2025 6:21 PM IST

आदिकाळापासून भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र, वाढत्या मत्स्य उत्पादनामुळे भारताला आता एक नवीन ओळख मिळत आहे. २०२३-२४ मध्ये देशाने सुमारे ३२८८ लाख टन अन्नधान्याचे उत्पादन केले, तरीही लोकसंख्येचा वेगाने वाढता दर आणि हवामान बदलामुळे भविष्यात अन्नटंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रथिनयुक्त, सुलभ आणि पोषक अन्नाचा पर्याय शोधणे अत्यावश्यक बनले आहे. शेतीसाठी लागणारी जमीन, पाणी, कुरणे यांचा तुटवडा, तसेच शेतीवरील प्रतिकूल हवामानाचा परिणाम लक्षात घेतल्यास, मासे हा अन्नाचा एक शाश्वत व फायदेशीर पर्याय ठरतो.

मासे हे आरोग्यास अत्यंत लाभदायक असून, भारतातील विशेषतः कोकण, बंगाल, केरळ आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात माशांना आहारात महत्त्वाचे स्थान आहे. २०२२ मध्ये भारताचे मत्स्य उत्पादन १६२ लाख टनांपर्यंत पोहोचले, आणि त्याचबरोबर मासे हे स्वस्त व भरपूर प्रथिने देणारे अन्न म्हणून अधिक लोकांना आकर्षित करू लागले. सामान्यतः माणसाच्या प्रथिनाच्या गरजेपैकी १५–१८% भाग मासे भागवतात, तर जपान, मलेशिया, थायलंडसारख्या देशांत हे प्रमाण ५०% पर्यंत पोहोचते. भारतात हरित क्रांतीमुळे अन्नधान्याची कमतरता कमी झाली असली, तरी प्रथिनयुक्त अन्नाची कमतरता अजूनही भासत आहे. डाळी, दूध, मटण यांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना त्या सहज परवडत नाहीत. अंडी व चिकनच्या तुलनेत माशांची चव विविधतेने भरलेली असल्याने ते अधिक पसंतीस उतरतात. शिवाय मासे श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांनाच परवडणारे असल्याने त्यांचा आहारातील सहभाग वाढवणे गरजेचे आहे.

माशांचे अन्न-गुण :

माशांमध् ७० ये ते ८०% पाणी असते व उरलेले ३० ते २०% पोषण द्रव्ये असतात. या पोषण द्रव्यात प्रथिने (१८-२५%), स्निग्धपदार्थ (१-१५%) आणि ०.८ ते २% क्षार व खनिजे असतात. कर्बोदकांचे (पिष्टमय पदार्थ) प्रमाण अतिशय कमी असते, म्हणून मधुमेहीना मासे भरपूर खाण्याची असते. अर्थात हे मासे तळून खाणे योग्य नाही, कारण त्यामुळे अतिरिक्त प्रमाणात स्निग्धपदार्थ आहारात जातात. माशांतील पोषणमूल्ये ऋतुमानाप्रमाणे, त्यांच्या जातीनुसार, भौगोलिक स्थानाप्रमाणे, त्यांच्या लिंगानुसार व पुनरुत्पादनाच्या शारीरिक क्रियांनुसार बदलत असतात.

प्रथिने :

दूध, अंडी आणि मांस यांच्याप्रमाणेच, मासे खाल्ल्यानेही शरीरास पोषक आणि उच्च दर्जाची प्रथिने मिळतात. विशेषतः माशांतील प्रथिने पचनास हलकी असतात आणि त्यांचे शोषण ९०%हून अधिक प्रमाणात होते, त्यामुळे मासे खाल्ल्यावर मटण किंवा चिकनप्रमाणे जडपणा जाणवत नाही. माशांमध्ये एकूण दहा अमिनो आम्ले आढळतात, जे शरीरासाठी अत्यावश्यक असतात. धान्ये व कडधान्यांमध्ये सर्व अत्यावश्यक अमिनो आम्ले आढळत नाहीत, त्यामुळे शाकाहारी व्यक्तींना ही पोषकतत्त्वे आहारातून मिळणे कठीण जाते. माणसाच्या वाढीसाठी महत्त्वाची असलेली लायसीन आणि मिथिओनिन  ही अमिनो आम्ले माशांमध्ये मुबलक प्रमाणात असतात, आणि त्यांचे प्रमाण कडधान्यांतील अमिनो आम्लांपेक्षा अधिक असते. विशेष म्हणजे, माणसाच्या वाढीस पोषक असे अमिनो आम्लांचे संतुलित मिश्रण केवळ माशांमध्येच आढळते.

स्निग्ध-पदार्थ :

मासे हा ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा अत्यंत समृद्ध स्रोत आहे, जो मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतो. शरीरात ओमेगा-३ फॅटी असिड तयार होत नसल्याने तो अन्नातून मिळवावा लागतो, आणि दररोज सुमारे 500 मिग्रॅम एवढी त्याची गरज असते. याचे सेवन अपुरे झाल्यास अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. माशांच्या तेलात ‘ओमेगा-३ पॉली-अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स’ (PUFA) असतात, जे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत आणि सूक्ष्म रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवून रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. माशांमध्ये आढळणाऱ्या इकोसा-पेंटेनोईक-आम् (EPA)  आणि डोकॉसो-हेक्सेनॉईक-आम् (DHA) मुळे रक्तातील गुठळ्या होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे नियमित मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी असते. तसेच, मासे खाणाऱ्या लहान मुलांना अस्थमा होण्याचे प्रमाण कमी असते आणि मत्स्याहारी मातेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूची वाढ चांगली होते. संशोधनानुसार तारलीसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी असिड भरपूर प्रमाणात असते, आणि इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत माशांतील चरबी ही ‘हेल्दी फॅट’ मानली जाते.

जीवनसत्त्वे :

माशांच्या चरबीत अथवा तेलात ‘अ’ आणि ‘ड’ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे या जीवनसत्त्वांची कमतरता असलेल्या रुग्णांना आणि लहान मुलांना खास करून मत्स्यतेलाच्या (जसे की कॉड लिव्हर ऑइल किंवा शार्क ऑइल) गोळ्या दिल्या जातात. ही दोन्ही जीवनसत्त्वे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात.

क्षार व खनिजे :

माशांमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सल्फर यांसारखी क्षारद्रव्ये तर असतातच, शिवाय आयोडीन, झिंक, सेलेनियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम आणि लोह (आयर्न) ही सूक्ष्मखनिजे देखील आढळतात. ही क्षारद्रव्ये आणि सूक्ष्मखनिजे शरीरातील अनेक आवश्यक जैविक क्रियांसाठी उपयुक्त ठरतात. सर्व सागरी अन्नपदार्थांमध्ये आयोडीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे थायरॉइड ग्रंथीचे विकार होण्याची शक्यता कमी होते. विशेषतः कालवांमध्ये झिंकचे प्रमाण सर्वाधिक आढळते, जे इन्सुलिन घेणाऱ्या मधुमेहींसाठी अत्यावश्यक मानले जाते.

माशांप्रमाणेच खेकडे, कोळंबी, कालवे (ऑइस्टर), शेवंडी (लॉबस्टर), नळे (स्क्विड), माकली जवळा आणि झिंगे यांसारखे विविध समुद्री जीवही आहाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. यांचे सेवन केल्याने शरीरास आवश्यक असे अनेक पोषक घटक मिळतात. उदा. खेकड्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात. यामध्ये क्रोमियम असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, जे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते. तसेच खेकड्यांतील विटॅमिन B12 आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स मुळे नवीन रक्तपेशींची निर्मिती होते आणि रक्ताभिसरण सुधारते. त्वचा विकार जसे की मुरुम, रॅशेस, डँड्रफ यावरही खेकडे खाल्ल्याने फायदा होतो. यातील झिंक शरीरातील तेल निर्मिती नियंत्रणात ठेवते, तर सांधेदुखी कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत होते. कोळंबीचे सेवन हे देखील आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यात मुबलक प्रमाणात सेलेनियम असते, जे पेशींच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढते. यामधील झिंक मुळे रोगप्रतिकारक शक्ती तसेच प्रजनन क्षमताही सुधारते. या समुद्री अन्नघटकांचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी आणि सशक्त राहते, विशेषतः ज्यांना कुपोषण किंवा आजारपणाने त्रास होतो त्यांच्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे.

मासे अन्न: भारतातील उपासमारी कमी करण्यासाठी महत्त्वाचे साधन

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश असून, आजही येथे लाखो लोक उपासमारीच्या समस्येने ग्रस्त आहेत. २०२४ च्या ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) नुसार, गणना करण्यात आलेल्या १२७ देशांमध्ये भारत १०५ व्या क्रमांकावर आहे आणि त्याचा स्कोअर २७.३ असून, ही स्थिती ‘गंभीर’ मानली जाते. भारतात अन्नधान्याचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असले तरी प्रत्येक व्यक्तीला पुरेसे आणि पोषक अन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत मासे अन्न म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मासे हे तुलनेने स्वस्त, सहज उपलब्ध आणि प्रथिनयुक्त अन्न आहे, जे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषतः भारतातील अनेक राज्यांमध्ये लहान मुले आणि गरोदर महिलांमध्ये दिसणारे कुपोषण दूर करण्यात माशांतील जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय, भारताच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांमुळे आणि मोठ्या नद्या-तलावांमुळे मत्स्य व्यवसायात मोठी क्षमता आहे. मत्स्य उत्पादन वाढवून स्थानिक अन्नपुरवठा सुधारता येतो, ज्यामुळे अधिक लोकांना पौष्टिक अन्न मिळू शकते. याशिवाय, मत्स्य व्यवसायाच्या वाढीमुळे ग्रामीण भागात लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो, जे अन्नसुरक्षेला हातभार लावते. योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास, मत्स्यपालन हे शाश्वत, पर्यावरणपूरक, आणि दीर्घकालीन अन्नस्रोत ठरू शकते. त्यामुळे उपासमारी आणि कुपोषण कमी करण्यासाठी माशांना अन्न धोरणाचा केंद्रबिंदू मानणे आवश्यक ठरते.

English Summary: Eat fish and be cool
Published on: 25 August 2025, 06:21 IST