भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवल क्रांती घडवून आणली. याच धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करुन क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस आहे, अशी माहीत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात दिली.
दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनावर भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन जात विकसीत आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही शेळी फायद्याची ठरणार आहे. आज आपण या शेळीविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत....
रोममधील जागतिक अन्न आणि शेती संस्थेच्या अहवालानुसार जगातील ४९ टक्के लोक शेळीचे दूध पितात. शेळीचे दूध औषधी आहे. त्यातच सानेन या जातीची शेळी जर घेतली, तर गावठी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या अधिक दूध देतात. २६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे,
शेळीची चारा-पाण्याची गरज ही गाईच्या तुलनेत एक पंचमांश एवढी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे गाईंचा गोठा असेल, तर या गाईंच्या उरलेल्या चाऱ्यावरही शेळीपालन सहज शक्य आहे. त्यासाठी वेगळा पगारी माणूस ठेवण्याची गरज नाही. शिवाय अधिक जागा लागत नाही. शेळी प्रकृतीने काटक असल्याने कोणत्याही हवामानात राहू शकते. रोगराईचे प्रमाण कमी आहे. शिवाय शेळी ही खुराकाचे जास्तीत जास्त दुधात रूपांतर करते.
शेळीचा गाभण काळ फक्त पाच महिन्यांचा असतो. त्यामुळे पाच ते सहा वेते सहज मिळू शकतात. शेळीपासून एका वेतात कधी दोन, तर कधी तीन करडे मिळतात. तीन वेतात पाच करडे मिळू शकतात. इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे या जातीचे प्रमाणही अधिक आहे. या जातीच्या बोकडाच्या मांसाची मागणीही अधिक आहे.
Published on: 23 February 2021, 10:02 IST