मुंबई येथे मंत्रालयात इस्राईल कौन्सिल जनरल याकोव्ह फिंके ल्स्टीन यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेतली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दूध उत्पादनात वाढ कशी करता येईल याबाबत चर्चा झाली.
यावेळी झालेल्या चर्चेला पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहसचिव माणिक गुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, अवर सचिव शैलेश केंडे तसेच इस्राईलचे पशुसंवर्धन व दुग्धविकास क्षेत्रातले तज्ञ मार्गदर्शक श्री. डन अलुफ आणि श्रीमती मिशेल जोसेफ यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली. महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन या विभागात तिच्या तंत्रज्ञान वापरून क्षेत्राचा विकास व्हावा आणि त्या अनुषंगाने या क्षेत्रात असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने इस्राईल कौन्सिल जनरल यकोव्ह फिंग ल्स्टीन यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
दुग्धविकास व पशुसंवर्धन या क्षेत्रात जे व्यक्ती काम करतात त्यांच्यासाठी वर्किंग ग्रुप स्थापन करण्याची व त्यासंबंधीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
या ऑनलाईन चर्चेमध्ये भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांच्या दरम्यान झालेल्या कराराच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य आणि इस्राईल यांच्यामध्ये सहकार्य होऊ शकते या बाबत विचार विनिमय करण्यात आला.
या चर्चेदरम्यान इस्राईलचे प्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होऊन या क्षेत्रात पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विषयी त्यांनी सखोल माहिती दिली. यावेळी प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी या क्षेत्रात कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत याची माहिती दिली. प्रधान सचिव अनुप कुमार यांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा अनुभव नमूद करून पशुसंवर्धन क्षेत्र पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले
Published on: 20 June 2021, 07:19 IST