Animal Husbandry

सर्वसाधारणपणे भारतीय देशी गायी वयात येण्यासाठी त्यांचे वय २४ ते ३६ महिने, तर शारीरिक वजन २५० ते २७५ किलो

Updated on 06 April, 2022 5:57 PM IST

सर्वसाधारणपणे भारतीय देशी गायी वयात येण्यासाठी त्यांचे वय २४ ते ३६ महिने, तर शारीरिक वजन २५० ते २७५ किलो, संकरित गायींचे वय १२ ते १८ महिने तर वजन २५० किलो तसेच म्हशींचे वय ३६ ते ४२ महिने तर वजन ३०० ते ३५० किलो असणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारे वय तसेच शारीरिक वजन प्राप्त केल्यावर अशी जनावरे नियमित माजावर येतात.

गाय, म्हैस वयात आल्यानंतर ऋतूकाळ चक्राची सुरवात होते. वयात आलेली कालवड अथवा रेडी दर २१ दिवसांनी माजावर येते. यास ऋतूचक्र असे म्हणतात. गायी, म्हशी व्याल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत माजावर येतात.

माजाची प्रमुख लक्षणे

• माजावर आलेली गाय अस्वस्थ व बैचेन होते, वारंवार हंबरते, कान टवकारते, गोठ्यात फिरण्याचे प्रमाण वाढते.

• खाणे - पिणे, रवंथ करणे यावर लक्ष नसते. त्यांची भूक मंदावते.

• गायी म्हशींच्या दूध उत्पादनात घट होते. अवेळी पाणवते.

• स्पष्ट माजावर आलेली गाई - म्हैस कळपातील वळूकडे आकर्षित होते, त्याच्याजवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न करते.

• माजावर आलेली जनावरे दुसऱ्या जनावरांवर उड्या मारतात तसेच दुसरी जनावरे पाठीमागून उड्या मारत असतील तर माजावर आलेली गाय-म्हैस स्थिर उभी राहाते.

• माजावर आलेल्या गाई-म्हशींचा योनीमार्ग लालसर, ओलसर सुजल्यासारखा दिसतो.

• योनीमार्गातून पारदर्शक, काचेसारखा, स्वच्छ, चिकट स्राव (सोट) बाहेर लोंबकळू लागतो. हा स्राव गायींच्या मागील बाजूस तसेच शेपटीस चिकटून लोंबत असतो.

• ग्रामीण भाषेत याला गाय बळसली अथवा सोट टाकला असे म्हणतात.

• माजावर आलेली गाय - म्हैस शेपटी उंचावून एका बाजूला करते.

• काही संकरित गायींमध्ये तिसऱ्या - चौथ्या दिवशी योनीमार्गातून थोडा रक्तस्राव दिसून येतो.

म्हशींमधील माजाची लक्षणे

• माजाची लक्षणे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे म्हशींच्या माजाला मुका माज असे म्हणतात. काही म्हशी विशिष्ट प्रकारच्या आवाजात हंबरतात.

• म्हैस माजावर आल्यावर वारंवार थोडी - थोडी लघवी करते.

• म्हशींमध्ये सायंकाळनंतर माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते.

• मुख्यत्वे म्हशी विशिष्ट हवामानात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत माजावर येतात.

माज कसा ओळखावा

• साधारणपणे गायी - म्हशींच्या माजाच्या लक्षणावरून माज ओळखण्याची प्रचलित पद्धत आहे. त्यासाठी जनावरातील माजासंबंधीचे तांत्रिक ज्ञान देणे, तसेच गायी - म्हशींमधील माज ओळखण्याच्या विविध पद्धतींची माहिती असणे आवश्‍यक आहे.

• प्रजननाविषयी सर्व नोंदी वेळच्या वेळी केल्यास, पुढील माजाची तारीख तसेच विण्याची तारीख बिनचूक काढता येते.

• गायी, म्हशींच्या कळपामध्ये नियमित माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू सोडून माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.

• गोठ्यातील फिरत्या दूरचित्रवाणी संचाद्वारे (सीसीटीव्ही) माजावर आलेल्या जनावरांची लक्षणे, हालचाली चित्रित करून माजावर आलेली जनावरे अचूक ओळखता येतात.

• काही देशांमध्ये जनावरांचा माज ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या श्‍वानाद्वारे माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.

• तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सहाय्याने अत्याधुनिक अल्ट्रा सोनोग्राफी मशीनचा वापर करून माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.

• कळपातील अनेक जनावरांना एकाचवेळी संप्रेरकाच्या इंजेक्‍शनाद्वारे माजाचे सनियंत्रण करून माजावर आलेल्या सर्व जनावरांना एकाच वेळी कृत्रिम रेतन करता येते.

माजावर आलेल्या गायी - म्हशींमधील कृत्रिम रेतन

• साधारणतः गायीचा माजाचा कालावधी हा १८ ते २४ तास तर म्हशीचा २४ ते ३६ तासांचा असतो.

• गायी - म्हशींमध्ये माजाचा मध्य अथवा उत्तरार्ध म्हणजे स्पष्ट पक्‍क्‍या माजाच्या कालावधीत कृत्रिम रेतन करून घेतल्यास गर्भधारणेची शक्‍यता अधिक असते.

• म्हणजेच ढोबळमानाने सकाळी माजावर आलेल्या गायी - म्हशींना त्याच दिवशी सायंकाळी तर सायंकाळी माजावर आलेल्या गायी - म्हशींना दुसऱ्या दिवशी कृत्रिम रेतन करावे.

• कृत्रिम रेतन केल्याची तारीख काळजीपूर्वक नोंदवून ठेवावी.

• गाय - म्हैस २१ दिवसांनंतर पुन्हा माज दाखवते का ते पहावे. माज व दाखविल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून गर्भतपासणी करून घ्यावी. - तीन वेळा कृत्रिम रेतन करून गाय - म्हैस गाभण न राहिल्यास तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी करून आवश्‍यक औषधोपचार करावा.

 

शेतकरी डिजिटल मॅगझीन

English Summary: Cow and buffalo breeding and do their also management
Published on: 06 April 2022, 05:50 IST