1. पशुधन

घोड्यांमधील कोलीक नावाचा आजार; आहाराने करा व्यवस्थापन

कोलीक’ म्हणजे घोड्यांमधील पोटदुखी. पाचन नलिकेचे किंवा पचन संस्थेचे कोणतेही आजार झाल्यास (मुख्यतः मोठे आतडे) ही अवस्था निर्माण होते. सदर अवस्था घोड्यांतील पचन संस्थेच्या शरीरशास्त्रावर आणि मायक्रोफ्लोराशी (पाचन नलिकेच्या विविध भागांत असणारे सूक्ष्मजीव) निगडीत असते.

KJ Staff
KJ Staff


‘कोलीक’ म्हणजे घोड्यांमधील पोटदुखी. पाचन नलिकेचे किंवा पचन संस्थेचे कोणतेही आजार झाल्यास (मुख्यतः मोठे आतडे) ही अवस्था निर्माण होते. सदर अवस्था घोड्यांतील पचन संस्थेच्या शरीरशास्त्रावर आणि मायक्रोफ्लोराशी (पाचन नलिकेच्या विविध भागांत असणारे सूक्ष्मजीव) निगडीत असते. संबंधित मायक्रोफ्लोरा चे संतुलन बिघडल्यामुळे मोठ्या आतड्यातील सा.मु. {pH} बदलतो. जास्त प्रमाणामध्ये आम्लाची निर्मिती झाल्यामुळे आतड्याची ‘एपीथेलीअल लाईनिंग’ कमकुवत होते. परिणामी अल्सर्स तयार होऊन विषारी घटक रक्तामध्ये जातात.

हेही वाचा : शेळ्या-मेंढ्यांमधील मावा आजार, जाणून घ्या ! उपाय

घोडे या अवस्थेला लवकर बळी का पडतात ?

  • घोडे पोटाच्या संरचनेनुसार एकाच वेळेस जास्त खाद्य ग्रहण करू शकत नाहीत. जास्त खाद्य ग्रहण केले असता पचन संस्थेचे विकार बळावतात.
  • घोड्यांमध्ये 'हाईन्ड गट फरमेंटेशन' होते, परिणामी गॅसेस निर्माण होऊन पोट फुगते. तसेच संबंधित मायक्रोफ्लोराचे संतुलन बिघडते.
  • घोड्यांतील लहान आतड्याची लांबी जास्त असते. आतडे स्वतःच्या कक्षेभोवती फिरल्यामुळे तसेच हर्निया निर्माण झाल्यास कोलीकचा धोखा निर्माण होतो.
  • सीकम आणि कोलोन (मोठ्या आतड्यातील भाग) चा आकार पोटाच्या मानाने जास्त असतो. त्यामुळे या भागांत इम्पॅक्शन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • अपचन झालेले खाद्य तसेच विषारी घटक घोडे शरीराबाहेर उलटीद्वारे टाकू शकत नाहीत.
  • पाचन नलिकेत ‘ऍबसॉरप्टिव्ह एरिया’ जास्त प्रमाणात असल्या कारणाने विषारी घटक शरीरात लगेच शोषले जातात.
  • जास्त वेळ पागे मध्ये ठेवल्यामुळे योग्य तो व्यायाम मिळत नाही.

हेही वाचा : गुरांमधील कॉर्गा ताप आहे माणासांसाठी धोकादायक; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

कोलीक होण्याची कारणे :

  • आहारात धान्याचा जास्त समावेश व चाऱ्याचा कमी उपयोग
  • बुरशीजन्य खाद्य
  • खाद्यामधील अचानक बदल
  • परजीवी उपद्रव
  • शरीरामधील पाण्याची कमतरता
  • प्रतिजैविकांचा चा दीर्घकालीन वापर
  • 'फोरेन ऑब्जेक्टस' (पिन, तार इत्यादी) चे नकळतपणे होणारे सेवन
  • ताण तसेच वातावरणातील अचानक झालेला बदल
  • दातांची समस्या

 

‘कोलीक’ व्यवस्थापनातील काही महत्त्वपूर्ण बाबी

  • खाद्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन
  • रसायनांचा किंवा विषारी वनस्पतींचे सेवन
  • घोड्यांना नेहमी पागेत बांधून ठेवणे
  • कामानंतर किंवा व्यायामानंतर थंड पाण्याचे जास्त सेवन
  • आतड्याचे स्वतःभोवती फिरणे (टॉर्शन), हॅर्निया इत्यादी.

कोलीक’ चा आहाराशी असणारा संबंध :

  • धान्याचा आहारात जास्त समावेश केल्यामुळे तसेच चाऱ्याचा कमी प्रमाणात वापर केल्यामुळे पचनासाठी आवश्यक असणारे तंतुमय पदार्थ शरीरात जात नाहीत. यामुळे खाद्य घटकांचे नीट पचन होत नाही.
  • साधारणतः खाद्याची केलेली अयोग्य साठवणूक, साठवणुकीच्या चुकीच्या पद्धती यांच्या एकत्रित परिणामामुळे खाद्यामध्ये बुरशीची वाढ होते. असे खाद्य घोड्यांना दिल्यास पोषण मूल्ये योग्य त्या प्रमाणात शरीराला मिळत नाहीत, तसेच पचन संस्थेवर वाईट परिणाम होतो.
  • खाद्यामध्ये केलेला अचानक बदल तसेच प्रमाणापेक्षा जास्त ग्रहण केलेले खाद्य हे पाचन नलिकेत जमा होते. खाद्य पचन संस्थेत जमा झाल्यामुळे तसेच परजीवींचे प्रमाण वाढल्याने खाद्य आतमध्येच कुजते, ज्यातून विषारी घटक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • विविध परजीवींमुळे {विशेषतः आंत्र परजीवी} खाद्यातील तसेच आहारातील पोषक घटक घोड्यांना उपलब्ध होत नाहीत. परजीवी स्वतःची संख्या वाढविण्यासाठी तसेच उदर निर्वाहासाठी हे घटक आतड्यांतून शोषून घेतात. परिणामी कितीही चांगल्या गुणवत्तेचे खाद्य दिले असता त्यातून मिळणाऱ्या पोषण मूल्यांचे प्रमाण हे खूप कमी असते.
  • शरीरामध्ये पाणी कमी जात असल्या कारणाने, त्याद्वारे मिळणारे इलेक्ट्रोलाइट्स किंवा क्षार योग्य त्या प्रमाणात शरीरात जात नाहीत, तसेच आतड्यांमधून पाणी कमी प्रमाणात शोषले जाते. मुख्यतः व्यायामानंतर किंवा शर्यतींनंतर मोठ्या प्रमाणात शरीरातून क्षार निघून जाते, अशा वेळेस पाण्याचे योग्य सेवन न केल्यास जनावर डिहायड्रेशनमध्ये जाऊन दगावू शकते.
  • वय झालेल्या घोड्यांमध्ये दातांची अवस्था ही बिकट असते, त्यामुळे त्यांना नीट खाद्य ग्रहण करता येत नाही परिणामी आवश्यक असणारी पोषण मूल्ये शरीराला मिळत नाहीत.
  • प्रतिजैविकांचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे शरीरामधील किंबहुना पाचन नलिकेतील माईक्रोफ्लोराचे संतुलन बिघडते. यामुळे कर्बोदकांच्या पचनावर परिणाम होतो.
  • घोड्यांना जास्त काळासाठी पागेत बांधून ठेवले असता कोलीक ही समस्या निर्माण होते. याउलट जे घोडे चरण्यासाठी सोडले जातात, त्यांचा एक प्रकारे व्यायाम होतो. शरीराला पुरेसा व्यायाम मिळत असल्याने तसेच चरण्यातून योग्य त्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाचन नलिकेतील गॅसेस शरीराबाहेर उत्सर्जित केले जातात.
  • शर्यतीनंतर किंवा जास्त व्यायामानंतर शरीरात उष्णता तसेच ‘लॅक्टिक आम्ल’ निर्माण होते. या दोन्ही गोष्टी शरीराबाहेर उत्सर्जित होणे गरजेचे असते. त्यामुळे जोपर्यंत श्वसनाचा दर सामान्य होत नाही किंवा स्थिरावत नाही, तोपर्यंत जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध करून देऊ नये.

 

 

लक्षणे :

  • शरीराचे तापमान वाढते, श्वसनाचा दर तसेच हृदयाचे ठोके वाढतात.
  • अस्वस्थता वाढते.
  • जास्त प्रमाणात घाम.
  • दैनंदिन कामे करता येत नाहीत.
  • जनावर वारंवार पोटाकडे पाहते, उठ बस करते.
  • ‘म्युकस मेम्ब्रेन’ चा रंग बदलतो.
  • पोट नेहमी फुगल्यासारखे राहते, खाणे पिणे कमी होते.
  • मलाची गुणवत्ता खालावते {हगवण किंवा कॉन्स्टिपेशन नुसार}
  • कमी प्रमाणात लघवी किंवा लघवी करताना त्रास.
  • ‘फ्लेहमन रिस्पॉन्स’ {जनावर होठ खाते}
  • आतड्यांतील आवाजाच्या तीव्रतेत बदल.

आहार व्यवस्थापन :

  • बुरशीयुक्त खाद्य देणे कटाक्षाने टाळावे.
  • खाद्याची योग्य साठवणूक करावी.
  • चाऱ्याचा आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश.
  • जास्त प्रमाणात धान्य देऊ नये.
  • मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे.
  • साधारणतः हिवाळ्यामध्ये घोडे कमी पाणी पितात. अशा वेळेस खाद्यामध्ये थोडे कोमट पाणी मिसळले असता पाण्याची पुर्तता आहारमधून करता येते.
  • खाद्यामध्ये अचानक बदल करू नये, करायचा असल्यास टप्प्या टप्प्याने करावा.
  • रसायने किंवा विषारी वनस्पतींचे सेवन न होऊ देणे .
  • खाद्य योग्य त्या प्रमाणात ठराविक अंतराने द्यावे.
  • खाद्य किंवा चारा वाळू मिश्रित नसावा.
  • स्टॉल्स आणि पॅडॉक (चरण्याची जागा) क्षेत्र 'फोरेन ऑब्जेक्टस' पासून मुक्त ठेवा.
  • चांगल्या प्रतीचे खाद्य उपलब्ध करून देणे, चारा निकृष्ट दर्जाचा नसावा.

लेखक - 

 डॉ. अक्षय जगदीश वानखडे

 एम. व्ही. एस. सी. (पशु पोषण व आहार शास्त्र)

 फाईन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई

              

English Summary: Colic disease in horses, diet management Published on: 27 October 2020, 04:17 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters