ज्वारीचे "किरळ" लागू नये यासाठी ज्वारी पिकांची कापणी पीक फुलोऱ्यात आल्यानंतरच करावी. तसेच ज्वारीचा कडबा व मूरघास यामध्ये हायड्रोसायनिक आम्ल नसल्यामुळे त्यांचा जनावरांना चारा म्हणून वापरण्यास काहीही हरकत नाही .
खबरदारी आणि उपाययोजना
ज्वारी उगवल्यानंतर ४० दिवसांपर्यंत तसेच कापणीनंतर फुटवे वाढीच्या वेळी हायड्रोसायनिक आम्लाची निर्मिती होत असते. हे रसायन जहाल विषारी असल्यामुळे कोवळे फुटवे किंवा चारा ४० दिवसांपर्यंत जनावरांना खाण्यास अयोग्य असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ४० दिवसांपूर्वी ज्वारीची कापणी करू नये.
कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारीला जरुरीप्रमाणे पाणी देल्यास पिकांची वाढ जोमदार होते आणि पर्यायाने हायड्रोसायनिक आम्लाचे प्रमाण कमी होते. ज्वारी पिकाची चाऱ्यासाठी कापणी करावयाची झाल्यास ज्वारी फुलोऱ्यात असल्यानंतरच करावी. जनावरास "किरळ" लागल्यास ताबडतोब मोलॅसिअसचे दोन डोस तोंडावाटे द्यावेत. यामुळे विषबाधा झालेल्या जनावरांना अधिक शक्ती मिळते आणि जनावर काही तास जगू शकतो. त्यानंतर ताबडतोब पशुवैद्याकडून जनावरास सोडियम थायोसल्फेटचे इंजेक्शन द्यावेत. यामुळे विषबाधा झालेल्या जनावराच्या शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होतो व जनावरांचे प्राण वाचतात.
विषबाधेची कारणे
ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक अॅसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक अॅसिड ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.
लक्षणे
जनावरांनी पोंगे कमी प्रमाणात खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होऊन श्वासोश्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात
जनावरांनी ज्वारीचे कोवळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो.
जनावरे थरथर कापते व बेशुद्ध पडते, हृदय बंद पडल्याने शेवटी जनावर दगावते.
घ्यावयाची काळजी
ज्वारीची कोवळे पोंगे जनावरे खाणार नाहीत याची पशु पालकांनी काळजी घ्यावी .
ज्वारीचे पीक कापल्यानंतर, शेतात पाणी सोडल्यानंतर, पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात अशा शेतात जनावरे चरावयास सोडू नयेत.
लेखक - ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ८४११८५२१६४
डॉ. आदिनाथ ताकटे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. मो. ९४०४०३२३८९
Published on: 03 November 2023, 03:58 IST