भारतात शेतकरी शेतीला फायदेशीर जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. दूध उत्पादनात भारताचा मोठा वाटा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुपालनाचा मोठा वाटा आहे, तसेच आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील बेरोजगार युवक अनेक महिला बचत गट यांनीसुद्धा दुग्ध व्यवसायात उतरत आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु या व्यवसायाचे महत्त्वाचे गमक आहे ते म्हणजे दुधाळ जनावरांचे व्यवस्थित संगोपन करून त्यांना समतोल आहार देऊन दूध उत्पादनात वाढ करणे हे होय. या आहारात ऍझोलाचा समावेशे केल्यास दुभत्या जनावरांसाठी हे उपयुक्त ठरू शकते. ऍझोला ही एक वनस्पती आहे.
सध्याच्या परिस्थितीत पावसाची अनिश्चितता, पशुखाद्याच्या प्रचंड किमती, हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेत असणारी कमतरता अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या सध्या पशुपालकांमध्ये आहेत. म्हणून अशा परिस्थितीत व्यवस्थित व्यवस्थापन करून कमी खर्चात अधिक दूध उत्पादन करणे अवघड आहे. म्हणून ऍझोला हे स्वस्त खाद्य च्या रूपाने पशुपालकांना समोर आले आहे. महागड्या पशुखाद्य ऐवजी ऍझोलाचा खाद्यात वापर केला तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढण्यास मदत होते.
काय आहे ऍझोला
उच्च प्रथिन युक्त ऍझोला हे जनावरांना पचण्यासाठी सुलभ असते. कोणत्याही प्रकारच्या घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना खायला देता येते. कमी खर्चात येणाऱ्या ऍझोलाचे उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनही करता येतो. दुधाळ जनावरांना दररोज दीड ते दोन किलो ऍझोला खाद्यात दिला तर दिवसाला दोन लिटरपर्यंत दुधात वाढ होऊ शकते. ऍझोलामध्ये क्षार तत्वे मुबलक प्रमाणात असतात. तसेच प्रथिनांचे प्रमाण 25%, टक्के खनिजे व 10 ते 12 टक्क्यांपर्यंत असते. ऍझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प असते. या वनस्पतीमध्ये प्रथिने व तंतुमय पदार्थ तसेच लिमिनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ही वनस्पती कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, जस्त व बीटा कॅरोटीन या घटकांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत वाढ होते.
ऍझोला खाद्याचे फायदे
- आपण जे महागडे पशुखाद्य जनावरांना खाऊ घालतो त्या पशुखाद्याच्या खर्चामध्ये दहा ते 15 टक्के बचत होते.
- जनावरांचे गुणवत्ता वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढते व आरोग्य सुधारून आयुष्य वाढते.
- ऍझोलामुळे दूध, दुधाची फॅट, वजन यामध्ये वाढ होते.
- पक्षी खाद्यात ऍझोलाचे मिश्रण रूपात खाद्य म्हणून वापर केला तर मांसल कोंबड्यांच्या वजनात वाढ होते. तसेच त्यांच्या अंडी देण्याच्या प्रमाणातही वाढ होते.
- अझोलाच्या वाफ्यातून काढण्यात आलेले पाणी हे नत्रयुक्त व खनिज युक्त असल्यामुळे पिकांसाठी पोषक म्हणून याचा उपयोग होऊ शकतो.
ऍझोलाच्या वाफ्याचे व्यवस्थापन
- दर दहा ते पंधरा दिवसांनी अझोलाच्या वाफ्या मधील 25 टक्के पाणी बदलून त्यात स्वच्छ पाणी ओतावे आणि दर दोन महिन्यानंतर वाफ्यातील 50 टक्के माती बदलून नवीन चांगली काळी माती टाकावी.
- ऍझोलाची वाढ चांगली ठेवण्यासाठी दर आठ दिवसांनी कमीत कमी एक किलो ताजे शेण, 50 ग्रॅम खनिज मिश्रण, व 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव करून टाकत राहावे.
- दर सहा महिन्यांनी अझोलासाठी तयार करण्यात आलेल्या वाफा स्वच्छ करावा. याप्रमाणे काळजी घेतली तर ऍझोलाचे चांगले उत्पादन मिळते.
- वाफ्यातील पाण्याची पातळी चार ते पाच इंच ठेवावी.
- वाफ्यातून अझोला दररोज काढावे नाहीतर त्याचे एकावर एक थर तयार होऊन किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
टीप - या पुढील लेखात ऍझोलाची लागवड व उत्पादन कसे घेता त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.
Published on: 13 August 2020, 10:32 IST