Animal Husbandry

शेळी-मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. जेथे शेळी-मेंढीपालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केले जातो, तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. शेळी-मेंढीपालन व्यवसायिकांना शेळ्या-मेंढ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहित असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.

Updated on 09 February, 2024 3:22 PM IST

डॉ. झिने प्रविण लहाणू, डॉ. गजेंद्र कों. लोंढे, प्रा. हेमंत नाना पाटील

शेळी-मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. जेथे शेळी-मेंढीपालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केले जातो, तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. शेळी-मेंढीपालन व्यवसायिकांना शेळ्या-मेंढ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहित असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. हिवाळ्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांना प्रामुख्याने आंत्र विषरक्तता (ET), संसर्गजन्य न्यूमोनिया, मवा (Contageous Ecthyma) फुट रॉट, सांसर्गिक गर्भपात, बाह्यकृमी, करडांची हगवण, इन्फेक्शस केरॅटायटीस (पिंक आय) असे विविध प्रकारचे आजार होतात. आता आपण प्रत्येक आजाराची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी समजून घेऊया.

अ) आंत्र विषरक्तता या रोगास एन्ट्रोटॉक्सीमिया व काही ठिकाणी भूल देखील म्हणतात. हा आजार विषाणूमुळे (Clastradium pusfringens type — C' and 'D') होतो. अचानक खाण्यात होणाऱ्या बदलामुळे किंवा तणावामुळे हा रोग उद्भवतो.


लक्षणे- शेळीचे पोट दुखते यामुळे शेळी वारंवार उट- बस करते. क्वचितप्रसंगी जमिनीवर कोलांट्यादेखील मारते. पोटावर लाथ झाडते. पाटीचा कणा धनुष्याकृती होतो व कधी कधी हगवण देखील सुरू होते. या आजाराची रोगबाधा ही प्रमुख तीन ठळक स्वरूपात आळळून येते.

१) अतितीव्र स्वरूप: सामान्यतः करडात आढळून येते. रोगाचा कालावधी हा २४ तासापेक्षा देखील कमी असतो आणि पुष्कळदा लक्षात देखील येत नाही व ते दगावते.
२) तीव्र स्वरूप: सामान्यतः लक्षणे ही सारख्याच स्वरूपाची आढळतात, परंतू तिव्रता कमी असते. रोगाचा कालावधी हा ३ ते ४ दिवसांचा असतो. उपचाराअभावी काही जनावरे मरण पावतात. रोगबाधा साधारणतः प्रौढ जनावरांत आढळून येते. रोगबाधेचा प्रादुर्भाव लसीकरण झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपातदेखील आढळून येतो.
३) दिर्घकालीन बाधा वारंवार कळपातील शेळ्या-मेंढ्या आजारी पडताना आढळतात. साधारणतः प्रौढ शेळ्या बळी पडतात. आजारी शेळ्या मलून मरणासन्न दिसतात. हगवण वारंवार होत असल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या वजनात घट होते. हा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाय व काळजी घेतली पाहिजे. करडू ४ ते ६ आठवड्याचे झाल्यावर लसीची पहिली मात्रा टोचून घ्यावी. बुस्टर लस १५ दिवसांनी लावावी व त्यानंतर ६ महिन्यांनी लसीकरण आवश्य करून घ्यावे. कळपात रोगबाधेची नोंद झाली असल्यास लसीकरण दर ४ महिन्यांनी करून घ्यावे.

फार्मवर नवीन शेळ्या आढळल्यास त्यांना विनाविलंब लसीकरण करून घ्यावे. त्यानंतरच शेळ्या कळपात सोडाव्यात. शक्यतो लसीकरण कार्यक्रम असा आयाजित करावा की शेळ्या-मेंढ्या विण्यापूर्वी २ ते ३ आठवडे लस टोचणीची वेळ राहील, जेणेकरून नवजात पिल्ल्यांना आईकडून रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होईल. शेळ्या-मेंढ्यात होणारा दुसरा महत्वाचा आजार म्हणजे मवा (Contageous Ecthyma) होय. हा एक विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. रोगाचा प्रसार शेळ्या-मेंढ्यांच्या कळपात अतिशय झपाट्याने होत असतो. रोगप्रसारात पिडीत जनावरांचा संपर्क अथवा प्रक्षेत्रावरील अवजारे मदत करतात. या रोगाची विशिष्ट लक्षणे म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या त्वचेवर पिटिका आणि पुटिका आढळतात.

क्वचितप्रसंगी नाकपुड्या व डोळ्यात देखील दिसतात. त्यानंतर याचे रूपांतर पुटिकांत होते व त्यावर जाड खपली धरली जाते. आजारी कोकरांना दूध ओढता येत नाही व चारा देखील खाता येत नाही. खाता न आल्याने अशी कोकरे व शेळ्या-मेंढ्या झपाट्याने कमजोर होतात व वजनात घट होते. हा आजार झाल्यास लागण झालेल्या शेळ्या-मेंढ्या तात्काळ कळपातून वेगळ्या कराव्यात व इतर आजारी जनावरांचा उपचार सुरू करावा, जेणेकरून कळपातील इतर निरोगी शेळ्या-मेंढ्यांना या रोगाची लागण होणार नाही.

ब) संसर्गजन्य न्यूमोनिया

रोगाचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत आढळत असला तरी हवामान थंड झाल्यावर रोगाचे प्रमाण वाढलेले आढळते.

लक्षणे

रोगपिडीत शेळी मलून दिसते. शारीरिक तापमान वाढलेले असते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि शारीरिक वजन घटल्यास नाकाव्दारे सतत विसर्ग वाहतो. जनावर वरचेवर खोकते आणि झपाट्याने कमजोर होत जाते. हा आजार शेळ्या-मेंढ्यांना झाल्यास आजारी जनावरांना कळपातून वेगळे करावे व तज्ज्ञपशुवैद्यकाकडून औषधोपचार करून घ्यावा.

क) सांसर्गिक गर्भपात शेळ्या-मेंढ्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने Conpyloducter, Leptosprosis, disteria मुळे होतो. सांसर्गिक गर्भपात कमी करण्याकरीता शेळ्या-मेंढ्यांच्या कळपासाठी पुरेशी जागा असायला हवी. कळपाचे विभाजन करून ठेवल्यास हिवाळ्यामध्ये हे आजार कमी प्रमाणात पसरतात. शक्यतो दुषित खाद्य, पाणी आणि चारा शेळ्या-मेंढ्यांना देणे टाळावे.

ड) इन्फेक्शस केरॅटायटीस (पिंक आय) यालाच डोळे येणे असेही म्हणतात. जिवाणूमुळे (Momella bewa) हा आजार होतो. रोगाचा पूर्वकाळ सामान्यतः २ ते ३ दिवसांचा असतो. डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी वाहणे, उन्हात डोळ्यांना त्रास होतो म्हणून जनावरे डोळे बंद ठेवतात. शारीरिक तापमानात सौम्य प्रमाणात वाढ होते. एक ते दोन दिवसात डोळ्याच्या मध्यभागी पांढरा पडदा दिसू लागतो. डोळ्याचा पांढरापणा वाढत जाऊन एक किंवा दोनही डोळे पांढरे होतात. काहीवेळा डोळा फुटून जातो व अंधत्व येते. परंतू २ ते ३ आठवड्यात दृष्टी पूर्ववत होते. आजार कमी करण्यासाठी लागण झालेल्या शेळ्या-मेंढ्यांना तात्काळ वेगळे करावे व पुशुवैद्यकांच्या साहाय्याने उपचार सुरू करावेत.

इ) करड्यांची हगवण- प्रक्षेत्रावरील करडात आढळून येणारा हा सामान्य आजार असून त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे अतिसार आणि जंतूरक्तता ही होत. करडांचे मृत्यु होत असल्याने रोगाचे आर्थिक महत्व खूप आहे. अणूजिवांचे उगमस्थान म्हणजे पिडीत जनावरांची विष्ठा तसेच करडांना अणूजिवांचा संसर्ग हा गादी म्हणून टाकलेले गवत दुषित होऊन होतो. दुधाची भांडी अस्वच्छ असणे, कळपातील रोगपिडीत करडे, शेळ्यांची कास व बाह्य भाग चाटल्याने हा संसर्ग संभवतो. या आजाराच्या लक्षणात प्रामुख्याने पहिल्या ४ दिवसात सामान्यतः जंतूरक्तता अतिसार आढळून येत असतो. बाधा तीव्र स्वरूपाची असते व अतिसार २४ ते ९६ तास टिकतो. पिडीत करडू मलूल व अशक्त भासते. सुरूवातीस शारीरिक तापमान वाढलेले असले तरी करडू मरणासन्न झाल्यावर शारीरिक तापमान असाधारण होते. काही करडांत अतिसार किंवा रक्तमिश्रीत हगवण दिसते. रोगमुक्त करडात जंतूचे स्थानिकरण सांध्यात होते आणि यामुळे गुडघे सुजतात. करडांना चालता येत नाही व त्यातच त्यांचा मृत्यू ओढवतो.

रोगप्रतिबंधक उपाय

रोगबाधेची कारणे शोधत न बसता कळपात हगवण आढळल्याबरोबर पिडीत करडू तात्काळ वेगळे काढावे व तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत. शक्य असल्यास संपर्कात असलेली पिल्ले कळपातून वेगळी करून स्वच्छ ठिकाणी स्थानांतरीत केल्यास हगवणीचा त्रास असणाऱ्या कळपाचे बेड निर्जंतुक करता येतील. बंदिस्त पध्दतीने ठेवलेल्या करडात रोगबाधेचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. पिल्लांचा जन्म स्वच्छ जागेवर व्हावा, नवजात पिल्ले थंड पडणार नाहीत याकडे लक्ष पुरवावे. पिल्ले जन्मताच ६ तासांच्या आत त्यांना आईचा चीक पिण्यास मिळणे आवश्यक आहे. पिल्लांचे सारख्या वयाचे गट पाडावेत. गादी म्हणून पसरविलेले गवत स्वच्छ आणि कोरडे असावे. दुध काढण्याची भांडी, दुध पाजण्याची भांडी दरवेळेस स्वच्छ व निर्जंतुक असावीत. नवजात पिल्लांना गवत चघळू द्यावे आणि २ आठवड्यानंतर धान्यपदार्थ द्यावेत.

डॉ. झिने प्रविण लहाणू, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यलय सोनई, मो.न. ८५५०९०२६६०
डॉ. गजेंद्र कों. लोंढे, विभाग प्रमुख, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय, वनामकृवी परभणी मो.न. ९८९०५०५६४९
प्रा. हेमंत नाना पाटील, पाटील अँड सन्स गोट फार्म, वनकोठे ता. एरंडोल जि.जळगाव, मो.न. ८९७५५३३८४५

English Summary: Animal Care Diseases of goats and sheep in winter and care to be taken
Published on: 09 February 2024, 03:22 IST