वाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते, किंवा त्याच्या दर्जा कमी केला जातो. अनेकदा अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे आपल्या शरीराला नुकसान होत असतं. गेल्या काही दिवसांपासून बाजारात विकलं जाणारं दूधही भेसळयुक्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जवळपास दोन वर्षांपर्यंत सतत भेसळयुक्त, नकली दूध पिणाऱ्या लोकांना आतड्यांचे विकार, यकृत आणि किडनीसंबंधी रोग होण्याचा मोठा धोका असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात मोठा खुलासा केला आहे. अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण च्या सर्वेक्षणात एक महत्त्वाचा शोध म्हणजे संशोधनातून आफ्लोटोक्सिन एम 1 मात्राची 8368 पैकी 4322 नमुन्यांमधील मर्यादा 7% पेक्षा जास्त आढळली आहे. भारतात विकलं जाणरं जवळपास 10 टक्के दूध आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. या 10 टक्क्यांमध्ये 40 टक्के प्रमाण हे पिशवीबंद दूधाचं आहे. ज्याचा आपल्या दररोजच्या खाण्यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
दुध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ
दूधामध्ये पाणी मिसळणे ही सामान्य तक्रार असते. यासाठी दुधाचा एक थेंब गुळगुळीत स्वच्छ उभ्या पृष्ठभागावर लावला तर शुध्द दुध तेथेच ठिपक्याप्रमाणे राहते. किंवा खाली ओघळून पांढरा पट्टा दिसतो. मात्र पाणी घातलेले दुध ताबडतोब खाली ओघळते आणि त्याचा ओघळ पांढरा दिसत नाही.
- दुधामध्ये युरीया हे खत मिसळण्याची धास्ती मोठया प्रमाणावर असते. हे तपासण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये पाच मि.ली. दूध घेऊन त्यात ब्रोमोथायमॉल या निळया औषधाचे दोन थेंब टाका. दहा मिनिटांनंतर निळा रंग आल्यास यात युरीया आहे असे समजा.
- दुधामध्ये स्टार्च म्हणजे कांजी घातलेली तपासायची असल्यास दुधात 2-3 थेंब टिंक्चर आयोडिन टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ आहे असे समजावे.
- दुधामधून फॅट (चरबी) काढून घेतली असल्यास लॅक्टोमीटरने 26 च्या वरती रिडिंग येते. पण दुध घट्टच दिसते.
- खव्यामध्ये कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळावा, थंड करावा आणि त्यात आयोडिनचे थेंब टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च आहे (पिठूळ पदार्थ) असे समजावे.
- पनीरमध्येही कधीकधी स्टार्च मिसळलेला असतो. यासाठी अशीच तपासणी करावी.
- तुपामध्ये शिजवलेल्या बटाटयाचा किंवा रताळयाचा गर मिसळला जातो. याची तपासणी खव्याप्रमाणेच आयोडिनचे थेंब टाकून करता येते.
- शुध्द तूप किंवा लोण्यात वनस्पती तूप भेसळ केले जाते. हे तपासण्यासाठी तूप किंवा लोण्याचा एक मोठा चमचाभर नमुना घेऊन तो गरम करा. एका छोटया वाटीत हा नमुना घेऊन त्यावर तेवढेच हायड्रोक्लोरिक आम्ल ओता आणि त्यातच एक चिमूटभर साखर टाका. हे मिश्रण थोडे हलवा आणि 5 मिनिटे स्थिर ठेवा. या मिश्रणात खालच्या बाजूला नारिंगी थर दिसल्यास वनस्पती तूपाची भेसळ आहे असे समजा.
- आईसक्रीममध्ये धुण्याची पावडर मिसळली जाते. अशा आईसक्रीममध्ये लिंबाचे काही थेंब टाकल्यास बुडबुडे येतात. धुण्याची पावडर नसेल तर बुडबुडे येत नाहीत.
- आईसक्रीमध्ये साखरेऐवजी सॅकॅरीन मिसळलेले असल्यास चवीवरून ते कळते. सॅकॅरीनची गोड चव जीभेवर बराच वेळ राहून नंतर एक कडवट चव शिल्लक राहते.
दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती
1. दुधातील पाण्याचे निदान
पद्धत:
एका पॉलिश केलेल्या फरशीवर दुधाचे काही थेंब घाला. दुधात पाणी असेल तर दूध लगेचच पुढे सरकेल व ते कोणतेही डाग सोडणार नाही. या उलट जर दुधात पाणी नसेल तर ते पटकन पुढे किंवा मागे सरकणार नाही व ते सकरले तरी त्याचे पांढरे डाग मागे राहतील.
2. दुधातील पावडरची (डिटर्जंट) तपासणी
पद्धत:
दुधाचा पाच ते 10 मिलि नमुना घ्या. व ते पुर्ण घुसळून घ्या. जर दुधाला फेस किंवा फेसाप्रमाणे जाड थर तयार झाला तर त्यात डिटर्जंट आहे असे समजावे. जर दूध पुर्णपणे
जाडसर राहिले तर त्यात भेसळ नाही असे समजावे.
3. दूध आणि दुधाच्या उत्पादनांमध्ये स्टार्च शोध (खोया, चेना, पनीर)
पद्धत:
- 5 मिली पाण्यात नमुना 2-3 मिली उकळवा.
- आयोडीनच्या मद्याकरिता काही पदार्थ विरघळवून तयार केलेले औषध छान आणि थेंब घाला.
- निळ्या रंगाची रचना स्टार्चची उपस्थिती दर्शवते. (दुधाच्या बाबतीत, पाणी घालणे आणि उकळणे आवश्यक नाही)
4. तूप/लोणीमध्ये मॅश केलेले बटाटे, गोड बटाटे आणि इतर स्टार्चांची तपासणी
पद्धत:
अर्धा चमचा तुप एका पारदर्शक वाटीत घ्या. त्यात दोन ते तीन थेंब टिंचर ऑफ आयोडिन घाला जर तुपाला निळा रंग आला तर त्यात बटाटा, रताळे किंवा अन्य प्रकारचे स्टार्च असण्याची शक्यता आहे.
लेखक:
सुग्रीव शिंदे, ऋषिकेश माने
पीएचडी स्कॉलर, अन्न तंत्र महाविद्यालय वनमकृमी परभणी
8975399491
Published on: 27 January 2020, 02:02 IST