Agripedia

आपली शेती आणि आपला शेतकरी या संदर्भात मी थोडं स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

Updated on 03 December, 2021 8:47 PM IST

शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत येत आहे. त्याची कारणे शोधण्याचे खूप प्रयत्न झाले. शेतकर्‍यांना उत्पादन खर्च परवडत नाही,सरकारने भाव बांधून दिले पाहिजेत अशा अनेक प्रकारच्या मागण्या पुढे येत गेल्या. त्या काही प्रमाणात पुर्‍या झाल्या.परंतु शेतकरी तोट्यात का येतो, याची खरी कारणमीमांसा करण्यात अर्थतज्ञांना आणि कृषि तज्ञांना अजिबात यश आलेले नाही. अजूनही या तज्ञांच्या मार्गाने कारणमीमांसा करणारे लोक शेतकर्‍यांच्या तोट्याच्या बाबतीत अंधारातच चाचपडत आहेत.अशा काळामध्येच शेतकर्‍यांच्या समस्यांची वेगळीच मीमांसा करायला सुरुवात केली.

हजारो शेतकर्‍यांच्या शेतातील अनेक प्रयोगांच्या अंती शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे खरे कारण सापडले. आपली शेती हा एक जैवतंत्र शास्त्रीय व्यवसाय आहे* आणि तो निसर्गाशी संवाद साधून तसेच निसर्गाने आपल्याला काय दिले आहे याचा विचार करून केला तर तो कीफायतशीर ठरतो या कृषि अर्थशास्त्रीय दृष्टीने हे सिद्ध करून दिलेले आहे की, गांडूळ शेती आणि विचारपूर्वक केलेली निसर्गशेती हीच शेती करण्याची खरी पद्धती आहे.

जमिनीमध्ये हजारो जिवाणू असतात आणि या जिवाणूंची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी जैवतंत्रशास्त्रीय प्रक्रिया वेगवान आणि आपोआप घडत जाईल, म्हणून जमिनीतील विषाणूंची संख्या कशी वाढेल हे पाहिले पाहिजे.आपल्या जुन्या काळच्या पुर्वंजानीं या गोष्टींचा विचार केेलेला होता. परंतु आपले परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आपण विसरून गेलो आहोत

आणि आधुनिकतेच्या नावाखाली 1962-63 च्या दशकात पाश्‍चात्यांची भ्रष्ट नक्कल करून बाहेरून विकत आणलेली रासायनिक खते शेतात घालून जमिनीची नासाडी करत आहोत. तसेच अडचणीत आलो आहे. गांडूळ शेती आणि निसर्ग शेतीच्या प्रयोगाला स्वत:ला वाहून घेतले पाहिजे.शेतकर्‍यांना आलेले अनुभव जगाला सांगितले. रासायनिक शेतीचा पुरस्कार करणार्‍या अनेक कृषि तज्ञांना अजून तरी शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचे कारण सापडलेले नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय शेती, गांडूळ शेती या तंत्रांचा वापर करत आहेत.

सेंद्रीय शेती आणि निसर्ग शेतीच्या प्रसारामध्ये महाराष्ट्रात अतिशय व्यापक प्रयत्न व्हायला हवेत.शेतीची पद्धत बदलून सेंद्रीय शेती करायला सुरुवात झाली पाहिजे. सुरुवातीला दोन ते तीन वर्षे थोडे उत्पन्न कमी होतं पण सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचा कस वाढतो आणि तेव्हापासून उत्पादन वाढायला सुरुवात होते.

असा रोकडा अनुभव आल्यामुळे शेतकर्‍यांना सेंद्रीय शेतीचे प्रात्यक्षिकासह ज्ञान दिल्या गेले पाहिजे. 

निसर्ग शेती हे केवळ शेतीचे तंत्र नाही, ती एक जीवनपद्धती आहे . वेगवेगळे अभिनव अनुभव निसर्ग शेतीमध्ये येत असतात. सुधारित शेतीच्या नावाखाली आपण ज्या ज्या विपरीत गोष्टी केल्या आहेत त्या सर्व टाळून त्या सर्वांना पर्यायी अशी सेंद्रिय शेती विकसित केली पाहिजे आणि त्या सर्वांच्या साह्याने आपल्या गावात अनेक प्रयोग सुद्धा केले गेले पाहिजे. त्यामध्ये पाण्याचा मर्यादित वापर,चराई बंदी, कुर्‍हाड बंदी, पाणलोट क्षेत्र विकास,गोवंश संवर्धन, शाकाहार, जंगल वाढ, प्रदूषण मुक्ती अशा कितीतरी प्रयोगांचा समावेश आहेत.शिवाय पिक्या असलेल्या शेतकरी वर्गाला विक्या बनवणे आणि शेतकरी वर्गाला खर्च नोंद वही (कृषी दैनंदिनी) आणि उत्पादन खर्च काढण्याची पद्धती शिकवणे असे अभिनव उपक्रम/प्रयोग होणे अपेक्षित आहे. शेतकरी टिकला तर जग जगेल सुरूवात नव्या लढ्या ची.

 

 शेतकरी पुत्र

अजय सुनिल जंवजाळ

English Summary: Your farm And farmer.
Published on: 03 December 2021, 08:47 IST