Agripedia

ईशान्य कडील भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंट

Updated on 31 March, 2022 6:09 PM IST

लीक हे कांदा कुळातील पीक आहे. याचे शास्त्रीय नाव ‘अलियम पोरम’ आहे. रोपाचा खाली असलेला पांढरा भाग आणि हिरवी गडद रंगाची पाने खाण्यासाठी वापरतात. पाने बारीक कापून सॅलेडमध्ये वापरतात. ज्या लोकांना ओल्या पातीच्या कांद्याचा किंवा साध्या कांद्याचा उग्र वास आवडत नाही, त्यांना लीकमधून अल्हादकारक स्वाद व चव मिळू शकते. लीक हे युरोपमधील मुख्य भाजी आहे. भारतात जम्मू-काश्‍मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, दक्षिणेकडील राज्यात या भाजीची लागवड होते. महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांतील काही शेतकरी थोड्या थोड्या क्षेत्रावर या भाजीची लागवड करतात.  

पोषक द्रव्ये :

या भाजीमध्ये साखर, कार्बोहायड्रेट्‌स, स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे पुरेशा प्रमाणात असतात.

हवामान :

राज्यातील हवामानात वर्षभर या पिकाची लागवड करता येते.  

१० अंश सेल्सिअस खालील तापमानात बियाण्याची चांगली उगवण होत नाही. १३ ते १८ अंश सेल्सिअस तापमानात बियाण्याची उगवण चांगली होते. बियाणे उगवणीसाठी ८ ते १२ दिवस लागतात.

हरितगृहामध्येसुद्धा या भाजीची लागवड फायदेशीर ठरते. पुणे, सातारा, सांगली, नगर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वर्षभर या भाजीची लागवड फायदेशीर ठरते. इतर जिल्ह्यात कडक उन्हाळा सोडून खरीप आणि रब्बी हंगामात या भाजीची लागवड करावी.

हरितगृहात रोपांची वाढ होत असताना रात्रीचे तापमान १५ अंश सेल्सिअस व दिवसाचे तापमान २१ अंश सेल्सिअस नियंत्रित करावे. पांढऱ्या भागाची वाढ होण्यासाठी रात्रीच्या वेळेस तापमान १८ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ७० टक्के नियंत्रित करावी.

जमीन

हे पीक हलक्‍या ते मध्यम भारी जमिनीत चांगले येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी सेंद्रिय खतांनीयुक्त जमीन अतिशय चांगली असते. 

उभी-आडवी नांगरट करून कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीचा सामू ६ ते ६.५ ठेवावा.

पावसाळी हंगामात हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. दिवाळी, पुढील हंगामासाठी जमिनीत या पिकाची लागवड करावी.जमिनीची पूर्वतयारी झाल्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी ६० सें.मी. रुंद, ३० सें.मी. उंच आणि अंदाजे १० मीटर लांब गादी वाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. 

पारंपारिक लागवड ३० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून करावी. रोपांची जोमदार वाढ आणि उत्कृष्ट प्रत मिळण्यासाठी गादी वाफ्यावर लागवड फायदेशीर ठरते.

हरितगृहातील लागवडीसाठी शिफारसीप्रमाणे खत-मातीचे मिश्रण तयार करावे. मिश्रण निर्जंतुक करून गादी वाफे लागवडीसाठी तयार ठेवावेत.

जातींची निवड : 

संकरीत जातींच्या लागवडीपासून १५ ते २५ सें.मी. लांबीचे लीक मिळतात. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.

रोपे तयार करणे : 

गादीवाफ्यावर बी पेरून रोपे तयार करावीत. एक मीटर रुंद, तीन मीटर लांब आणि ३० सें.मी. उंच आकाराचे गादीवाफे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. त्यानंतर वरील आकाराचे गादीवाफे तयार करावेत. 

प्रत्येक गादीवाफ्यामध्ये दहा किलो चांगले कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम कार्बेन्डाझिम पावडर मातीत मिसळावी.

वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ५ सें.मी. अंतरावर २ सें.मी. खोल रेषा आखून त्यात अतिशय पातळ प्रमाणात बिया पेरून बारीक शेणखताने झाकाव्यात.

झारीच्या साहाय्याने हलके पाणी द्यावे. पेरणी झालेले सर्व वाफे प्लॅस्टिक पेपरने झाकावेत. 

एकरी संकरीत जातीचे १७५ ग्रॅम बियाणे पुरेसे होते. बियांची उगवण सात दिवसांत होते. 

रोपवाटिकेत बियांच्या उगवणीच्या काळात रात्रीचे तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस असावे, म्हणजे रोपांची उगवण आणि वाढ व्यवस्थित होईल. 

अंकूर दिसू लागल्यानंतर वाफ्यावर झाकलेला प्लॅस्टिक कागद काढून टाकावा. 

प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट माध्यम भरून बी टोकून रोपे तयार करता येतात. रोपांना पाणी देताना प्रत्येक वेळी १.५ ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट आणि २ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रती लिटर पाण्यात मिसळून द्यावे. त्याचप्रमाणे रोपांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर १०-१२ दिवसांचे अंतराने शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी. 

२५ ते २८ दिवसांत रोपे पुनर्लागवडीस तयार होतात.

रोपांची पुनर्लागवड : 

गादी वाफ्यावर दोन ओळीत ३० सें.मी. व प्रत्येक रोपांमध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून रोपांची पुनर्लागवड दुपारनंतर करावी. लागवड करण्यापूर्वी गादीवाफे आदल्या दिवशी पाण्याने ओलवून दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर रोपांची लागवड करावी.

एकरी ५९ हजार रोपांची लागवड होते. गादी वाफ्यावर लागवड केल्यास रोपांना ठिपकसिंचन द्वारा पाणी आणि खतांच्या मात्रा देणे सोईस्कर होते.पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर ३० सें.मी. अंतरावर सऱ्या वरंबे तयार करून रोपांची लागवड सरीच्या वरच्या बाजूवर दोन रोपांमध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून करावी.रोपाच्या खालील बाजूस असलेल्या पांढऱ्या कांद्याच्या वरील भाग जास्त उंचीपर्यंत पांढरा व तंतूविरहित राहण्यासाठी लागवड पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. 

गादीवाफ्यावर दोन ओळींत ३० सें.मी. अंतर ठेवून सरळ ८ ते १० सें.मी. खोलीचे चर तयार घ्यावेत. या चरामध्ये १५ सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. जसे जसे रोप उंच वाढेल त्या प्रमाणात चरामध्ये माती टाकावी. वाफ्याच्या वर रोपांची वाढ झाल्यावर शिल्लक राहिलेली चरातील जागेत माती टाकून चर बुजवून घ्यावेत. या प्रक्रियेस ब्लॅंचिंग म्हणतात. 

रोपाच्या खोडाला जास्त उंचीपर्यंत माती असल्यामुळे या जागेवर सूर्यप्रकाश न पोचता खोड पांढरे रंगाचे राहते; अन्यथा ते हिरव्या रंगाचे होते. जेवढ्या उंचीचा कांद्यावरील खोडावरील भागाचा रंग पांढरा असेल त्या भाजीस चांगला दर मिळतो.

हरितगृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित करून वर्षभर लीक पिकाची लागवड करता येते.

 

विजय भुतेकर सवणा

English Summary: You know about lik crop introduction know about in detail
Published on: 31 March 2022, 06:02 IST