शेतीमध्ये काळानुरूप बदल होत चालले आहेत, आणि हे बदल शेतकऱ्यांसाठी अच्छे आहेत. आधी राजमा हे पीक केवळ उत्तर भारतात लावले जात असे, पण अलीकडील काही वर्षात राजमा पिकाची महाराष्ट्रात लक्षनीय लागवड बघायला मिळत आहे.
राजमा हे पीक कमी कालावधीत येणारे एक प्रमुख भाजीपाला पिकापैकी एक आहे, राजमा उत्पादक शेतकरी सांगतात की, हे पीक केवळ एक महिना आणि दहा दिवसात उत्पादनासाठी तयार होते. त्यामुळे याची लागवड कमी कालावधीत बक्कळ उत्पन्न कमवून देऊ शकते, म्हणुनच की काय महाराष्ट्रातील शेतकरी याच्या लागवडीकडे आकर्षित झालेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम राजमा लागवड पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यातील राजमा क्षेत्र उल्लेखनीय वाढले आहे. आता तर राजमा पिकाची लागवड मराठवाड्यात देखील मोठया प्रमाणात केली जात आहे, मागच्या वर्षापर्यन्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राजमा लागवड हि तूरळक शेतकरी करताना दिसत होते, पण यावर्षी बीड जिल्ह्याने विक्रमी राजमा लागवड केली आहे. बीड जिल्ह्याने वातावरण चांगले नसताना देखील चालू रब्बी हंगामात जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्रात राजमा लागवड केली आहे. महाराष्ट्रातील राजमा क्षेत्र वाढले आहे म्हणुन आज आम्ही शेतकरी मित्रांसाठी राजमा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयींची माहिती घेऊन आलो आहोत, चला तर मग जाणुन घेऊया राजमा पिकाचे व्यवस्थापन.
महाराष्ट्रासाठी विशेषता मराठवाड्यासाठी राजमा हे पीक अद्याप तरी अनोळखी आहे, पण याची लागवड प्रक्रिया हि सोयाबीन पिकाशी मिळतीजुळती असल्याने, व त्याला सोयाबीन पिकासारखे हवामान लागत असल्याने हे पीक मराठवाड्यात चांगले बहरत आहे. जरी हे पीक अनोळखी असले तरी या पिकाची योग्य ती काळजी घेऊन तसेच योग्य ते व्यवस्थापन करून या पिकातून बम्पर उत्पादन घेतले जाऊ शकते. राजमा पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी 75 किलोच्या आसपास बियाणे लागते, एकंदरीत राजमा लागवडीसाठी हेक्टरी 35-38 हजार रुपये खर्च येऊ शकतो. तर यापासून हेक्टरी जवळपास 20 क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळू शकते.
असे करा राजमा पिकाचे व्यवस्थापन
राजमा हे अवघ्या चाळीस दिवसात तयार होणारे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे, याची मुळे हे उथळ असतात. त्यामुळे या पिकाला जास्त पाणी भरण्याची आवश्यकता नसते. जरी या पिकाला कमी पाणी लागत असले तरी फुलोरा अवस्थेत असतांना जमिनीत पुरेसा ओलावा असायला हवा, नाहीतर फळधारणा कमी प्रमाणात होते आणि
परिणामी उत्पादनात विक्रमी घट घडून येऊ शकते. म्हणुन राजमा पिकात पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते, फुल येण्याच्या अगोदर या पिकाला पाणी दिले गेले पाहिजे. तसेच पावसाळ्यात या पिकाची लागवड जर करायची असेल तर पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत याची लागवड करावी असा सल्ला कृषी विशेषज्ञ देतात. पावसाळ्यात सहसा राजमा पिकाला पाणी भरण्याची आवश्यकता नसते, मात्र जेव्हा पावसाळ्यात पाऊस लांबनीवर पडतो तेव्हा पिकाला पाणी द्यावे. उन्हाळ्यात लागवड केल्या जाणाऱ्या राजमा पिकाला दहा दिवसाच्या अंतराने पाणी भरण्याची शिफारस केली जाते.
राजमा पिकावरील किड व्यवस्थापन
मावा - राजमा पिकावर मावा किड प्रामुख्याने दिसते, याचे वेळीच नियंत्रण केले गेले नाही तर फुलगळ होते, परिणामी उत्पादन घटते. मावा किडीवर नियंत्रण करण्यासाठी, सायपरमेथीन (25%) 10 मिली घेऊन 20 लिटर पाण्यात टाकून द्रावण तयार करावे आणि त्याची फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी - राजमा पिकावर हि अळीदेखील मोठया प्रमाणात आढळते. ह्या अळीच्या नियंत्रणासाठी कार्बरील(5%) एका हेक्टरसाठी 20 किलो या प्रमाणात घेऊन फवारावे, यामुळे ह्या किडीवर प्रभावी नियंत्रण प्राप्त केले जाऊ शकते
Published on: 08 December 2021, 02:23 IST