पूर्वी शेती कमी खर्चाची होती. कारण त्या वेळेस शेतकरी स्वयंपूर्ण होता.
बी-बियाण्यापासून सर्व निविष्ठा घरच्याच असायच्या. मजूर उपलब्ध होते, मजुरीचे दरही कमीच होते. त्यामुळे पीक उत्पादनाचा खर्च फारच कमी होता. शेती उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून घेतलेच जात नव्हते. त्यामुळे पिकाची उत्पादकता जेमतेम असली तरी मिळालेल्या उत्पादनात शेतकरी समाधानी होता. हरितक्रांतीनंतर शेतीचे उत्पादन वाढले, देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. शेतकरी मात्र परावलंबी झाला. आज सर्व निविष्ठा शेतकऱ्यांना बाजारातून नगदी पैसे देऊन खरेदी कराव्या लागतात. तीन-चार वर्षांतच निविष्ठांचे दर दुपटीने वाढत आहेत. बियाणे, खते, कीडनाशके या निविष्ठा महाग तर आहेत, शिवाय त्यांचा दर्जाही खालावत आहे. बोगस, भेसळयुक्त निविष्ठांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे.
मजुरीचे दर वाढलेले आहेत. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. मजूरटंचाईने शेतीचे यांत्रिकीकरण वाढत आहे. आता मशागतीसह काही पिकांची काढणी-मळणी यंत्राने होत आहे. परंतु पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने यंत्रे-अवजारांचा उपयोग शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे.
अनेक संकटांवर मात करीत शेतात पिकांची पेरणी केली तर त्यावर नवनव्या रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांचे नियंत्रण कष्टदायक आणि खर्चिक ठरत आहे. कीड रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपर्यंत घट आढळून येत आहे. पिकांची वाणं असो की कीड-रोगांचे नियंत्रण कृषी विद्यापीठांकडून योग्य ते संशोधनाचे पाठवळ शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्तीही वाढलेल्या आहेत. हंगाम खरीप असो की रब्बी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचे काम नैसर्गिक आपत्ती करीत आहेत. शेतीसाठी शासकीय योजना ढीगभर आहेत. परंतु त्या देखील योग्य लाभाध्य्यांर्यंत पोहोचत नाहीत,
पोहोचल्या तर त्यातही गैरप्रकार खूप होतात. अशा संकटातूनही शेतीमाल हाती आला तर बाजारात त्याची माती होते. बहुतांश शेतकरी कर्जबाजारी असल्याने हाती आलेल्या शेतीमालाची त्यास त्वरित विक्री करावीच लागते. अशावेळी बाजारात शेतीमालाचे भाव पडलेले असतात. सध्याचे हमीभाव हे वास्तविक उत्पादन खर्चावर आधारित नाहीत. असे असताना किमान हमीभावाचा तरी आधार त्यांना मिळायला हवा. परंतु बहुतांश शेतीमालाची हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी केली जाते. अशी तोट्याची शेती शेतकरी का करतोय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असणार!
शेतकरी आपल्या कुटुंबाबरोबर जगाची भूक भागविण्यासाठी शेती करतोय. सध्याच्या व्यावसायिक शेतीत त्याचा उत्पादनखर्च भागून दोन पैसे त्यातून उरावेत एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हे साध्य होण्यासाठी त्यास दर्जेदार निविष्ठा माफक दरात मिळायला हव्यात. वीज असो की पाणी शेतीसाठी प्राधान्यक्रमाने उपलब्ध व्हायला हवे. कालसुसंगत तंत्रज्ञानाची जोड त्याच्या शेतीस मिळायला हवी.
शेतीमाल विक्रीचे विविध पर्याय शेतकऱ्यांच्याच भागीदारीतून निर्माण झाले पाहिजेत. विभागनिहाय शेतीमाल उपलब्धतेनुसार मूल्यवर्धन तसेच विक्री साखळ्या विकसित झाल्या पाहिजेत. त्याशिवाय शेतीमालास रास्त दराचा प्रश्न सुटणार नाही. सध्या संशोधन आणि शासन पातळीवर सर्वात दुर्लक्षित शेतकरी आहे. या सर्वांनी आपली भूक भागविणारे अन्न हे शेतातच शेतकऱ्यांकडून पिकविले जाते, ते अजून तरी कारखान्यात तयार करता येत नाही, हे लक्षात ठेवायला हवे.
गोपाल उगले
कृषी महाविद्यालय अकोला
मो- 9503537577
Published on: 01 January 2022, 03:56 IST