Agripedia

जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता, त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस अनन्य साधारण महत्व आहे. पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पूर्वमशागत असे म्हणतात. या पुर्वमशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्ठभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगला स्थितीत आणणे.

Updated on 16 May, 2024 12:34 PM IST

शेती मग ती बागायती असो कोरडवाहू ,चिरस्थायी शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण शेती शाश्वत कशी करता येईल हे पहिले पाहिजे.नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये जमिन, पाणी व हवामान ही महत्वाचे घटक येतात. या तीनही घटकामध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता, त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस अनन्य साधारण महत्व आहे. पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पूर्वमशागत असे म्हणतात. या पुर्वमशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्ठभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगला स्थितीत आणणे.

जमिनीची मशागत अनेक कारणांसाठी करत असतो. बियांचे अंकुरण आणि मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत करणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे तणांचा नायनाट करणे.पुर्वमशागतीमध्ये नांगरट,कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे, सपाटीकरण, खत मिसळणे, जमिन घट्ट करणे, सरी काढणे,जमिनीची बांध बदिस्ती करणे इत्यांदी कामांचा समावेश होतो.

जमिनीची नांगरट केंव्हा करावी?

नांगरटीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो.
रब्बी-उन्हाळी व हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च–एप्रिल मध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात.
हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.
जमिनीची नांगरट कशी करावी? किती खोल करावी ?
नांगरट नेहमी उतारास आडवी करावी. नांगराचे तास उतारास आडवे असल्याने पाणी सावकाश थबकत उताराच्या दिशेने पुढे जाते. त्यामुळे जमिनीत अधिक पाणी मुरायला वेळ मिळतो.येथे काही प्रमाणात पाणी अडवा पाणी जिरवा ही उक्ती साध्य होते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंदावल्याने मातीचे बारीक कण सहजासहजी पाण्याबरोबर वाहून जात नाहीत.अवकाळी आणि वळवाच्या पावसाने होणारी जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
जमिनीची नांगरट ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार,जमिनीचा उतार, तणांचा प्रकार व प्रादुर्भाव, स्थानिक हवामान ,पुढील हंगामात म्हणजे खरीप-रब्बीत घ्यावयाची पिके या सर्व गोष्टींचा विचार करूनच नांगरट किती खोल करावी हे ठरवावे.
खोल जाणाऱ्या पिकांच्या मुळ्या करीता खोल नांगरट व उथळ मुळ्यांच्या पिकांसाठी उथळ नांगरणी करणे जरुरीचे आहे. शिवाय प्रत्येक वर्षी शेतजमीन एकाच खोलीवर नांगरू नये,कारण त्यामुळे ठराविक खोलीवर एक टणक असा घट्ट थर तयार होतो,त्याला तवा धरणे असे म्हणतात.तो तवा फोडला नाही तर पिकाच्या मुळ्या , त्या थरात शिरकाव करत नाहीत अशा थरातून पाणी मुरण्यास आणि निचरा होण्यास वेळ लागतो.
हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यांदी बागायती पिकांसाठी जमिनीची १५ ते २० से.मी खोल नांगरट करणे आवश्यक आहे, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसाठी जमिन १० ते १५ से.मी. खोल नांगरावी
प्रत्येक जमिनीची दर वर्षी नांगरट करावी असे नाही .आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज आहे ,त्याकरिता त्या जमिनीवरील मागील पीक ,पुढे घ्यावयाचे पीक ,जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादीवर अवलंबून असते.
ज्या जमिनीत हरळी,कुंदा वा लव्हाळा यासारख्या खोल मुळे असलेल्या तणांचा उपद्रव नसेल त्या ठिकाणी दर तीन वर्षांनी एकदा नांगरट करावी.तूर,कापूस ,सूर्यफूल यासारख्या पिकांच्या मुळ्या ,धसकटे जमिनीत खोलवर गेल्याने कुळवाच्या पाळीने निघणे शक्य होत नाही अशा ठिकाणी नांगरट अत्यावश्यक ठरते .

कोरडवाहू क्षेत्रातील जमिनीची नांगरट केव्हा करावी?

कोरडवाहू भागातील जमिनी ह्या काळ्या आणि भारी असून बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेल्या आहेत.अशा जमिनीत चिकणमातीचे प्रमाण ६० टक्क्यापेक्षा जास्त असते ,तसेच जमिनीची खोली ६० ते ९० से.मी. पर्यंत असते.
या जमिनीतील ओल कमी होताच,मोठ्या प्रमाणावर त्यास भेगा पडतात आणि कठीण बनतात.या जमिनीची नांगरट प्रत्येक वर्षी केल्याने जमिनीच्या कण रचनेवर विपरीत परिणाम होतो.जमिन प्रमाणापेक्षा जास्त पोकळ राहते.ज्वारी, बाजरी यासारख्या लहान आकाराच्या बियाणे असणाऱ्या पिकांची उगवण शक्ती होत नाही.
कारण बी, माती आणि पाणी यांचा संपर्क तसेच जमिनीतील ओलावा आणि तापमानाचा एकत्रित परिणाम उगवण शक्तीवर होतो,म्हणून अशा भारी काळ्या जमिनीची तीन वर्षातून एकदाच नांगरट करावी.
सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट कारणे फायद्याचे ठरते.कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते,ढेकळे निघत नाहीत,नांगरट खोलवर होते.शेतात नांगर एकसारखाच लागतो. नांगरट कमी वेळात कमी खर्चात आणि कमी ताकदीत चांगली होते.
कोरडवाहू शेतीमध्ये ४५ से.मी. खोली पर्यंतच्या जमिनीत तूर अथवा सूर्यफुलासारखी पिके घेतल्यानंतर पुढील हंगामापर्यंत जमिनी मोकळ्याच असतात,अशा जमिनीची नांगरट ही पिके निघताच जमिनीत ओल असेपर्यंत हिवाळी हंगामात पूर्ण करावी म्हणजे हे काम कमी कष्टाचे व जलद होते,नांगरटीची कामे ही उताराला आडवी करावीत ,जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल आणि वाहून जाणाऱ्या पाण्याबरोबर होणारी जमिनीची/मातीची धूपही थांबेल.

हलक्या जमिनीची नांगरट

हलक्या म्हणजे २५ ते ३० से,मी आणि तांबड्या जमिनी मध्ये खोल नांगरट फायद्याची दिसून येते .कारण जमिनीच्या खालच्या थरातील कठीणपणा कमी केला जातो ,त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचा वेग वाढविला जातो आणि जमिनीत जास्त प्रमाणात पाणी मुरते . हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

नांगरटीचे फायदे

नांगरटीमुळे जमिन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलीताचे पाणी जमिनीत सहज मुरते.
जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो.
थरांची उलथापालथ होते ,जमिन भुसभुशीत होते.
हवा,पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात व जमिनीतील जीवाणूंची वाढ होते.
पिकांची धसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते.
तणांचे बी नांगरटीमध्ये खोल गाड्ल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते.
खोल नांगरटीमुमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता जमिनीस पोषक ठरते.
तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
अशा प्रकारे नांगरटीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.

वखरणी /कुळवणी केंव्हा करावी ?  वखरणी मुळे काय फायदे होतात?

पहिला  पाऊस पडल्यानंतर जमिन भुसभुशीत झाल्यानंतर कुळवाची पाळी उतारास आडवी द्यावी 
नांगरटी नंतर १५ दिवसांनी कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर ८- १० दिवसाच्या अंतराने दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात 
कुळवणीमुळे जमिन भुसभुशीत होते. 
जमिनीत हवा खेळती राहते. 
पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात.
तणांचा नाश होण्यास मदत होते.
शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकल्यास ते जमिनीत चांगले मिसळते. जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
रान/शेत तयार करताना स्वछतेच्या दृष्टीने कोणकोणती कामे करावीत?
रान तयार करत असताना, स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून रानांच्या बांधावर असलेली, मशागतीस व पिकाच्या वाढीला अडथळा करणारी झुडपे तोडावीत.काही वेळा झाडाच्या वसव्यामुळे पिकांची वाढ होत नाही. तरी अशी झाडे काढून टाकावीत. तसेच बांधावरील गवत, काडीकचरा, झुडुपे कापून जाळावीत, त्यामुळे सूक्ष्म अवस्थेतील किडींचा आणि रोगांच्या बीजाणुंचा नाश होतो.
फळझाडांची किंवा शेताच्या बांधावरील झाडांची वाढ आटोपशीर ठेवून रोगट, वाळलेल्या आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
नेहमीच मोठा पाऊस होऊन गेल्यानंतर आपल्याला शेतातील रस्त्यांची दुरवस्था अनुभवायला मिळते. यामुळे अपघातही घडतात. त्यामुळे वेळीच त्यांच्या दुरुस्तीची कामे लोकसहभागाद्वारे करून घ्यावीत

शेणखत जमिनीत मिसळणे

खरीपाच्या पूर्वतयारी मध्ये अत्यंत महत्वाचे! शेणखत किती प्रमाणात ,केंव्हा मिसळावे
तृणधान्य व इतर पिके – ४ ते ५ टन प्रतिएकरी 
फळपिके- १० ते १५ टन प्रति एकरी
भाजीपाला पिके- ८ ते १० टन प्रति एकरी 
पेरणीपूर्वी  ४ ते ६ आठवडे अगोदर शेणखत जमिनीत मिसळून दयावे.

शेणखत मिसळताना काय काळजी घ्यावी

चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
शेणखताचा खड्डा,मे महिन्याच्या सुरुवातीस रिकामा करावा.
शेणखतासोबत हुमणीच्या अळ्या,अंडी,कोष शेतात जाण्याची शक्यता असते,तेंव्हा शेणखत तपासून पहावे. 
शेणखतासोबत आलेले तणाचे बियाणे,गवताचे तुकडे इत्यादी घटक शेतात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
जनावरांच्या इलाज करण्यासाठी वापरलेले साहित्य उदा. सलाईनच्या बाटल्या,इंजेक्शनच्या सुया,प्लास्टिक हातमोजे,पिशव्या, इत्यादी साहित्य निवडून नंतरच शेणखत शेतात मिसळावे.
अर्धवट कुजलेले किंवा बायोगॅस स्लरी जशीच्या तशी शेतात वापरू नये 
शेणखत मिसळण्याचे फायदे ?
पिकास पोषक अन्नघटक मिळतात. 
जमिनीचाभुसभुशीतपणाटिकूनराहण्यासाठी
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते.
जमिनीतील हवा व पाणी यांचा समतोल राहतो.
जमिनीतील कणांची रचना सुधारते.
जमिनीच्या भौतिक,रासायनिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते.  

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी करावयाची कामे.

पाणी म्हणजे कोरडवाहू शेतीचे जीवनच आहे.त्यासाठी उन्हाळी हंगामानंतर पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे करून ठेवावे.म्हणजे पडणारे पावसाचे पाणी या साऱ्यात जास्तीत जास्त मूरविता येईल .हे सारे घालण्यासाठी उलट्या दिन्दाचा उपयोग करता येईल  किंवा बळीराम नांगराचा उपयोग करून हे काम घेता येईल.या साऱ्याचा आकार ६ x ६ मीटर ठेवावा.याशिवाय जमिनीत पाणी मुरविण्याचेप्रमाण वाढविण्यासाठी चार मीटर अंतरावर साधारणपणे ६० से.मी.खोलीचे चर खोदून ठेवल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो.असा चर काढण्याला स्तम्भ आच्छादन म्हणतात.या उपायामुळे कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनात हेक्टरी ४ क्विंटल पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जमिनीत पाणी मुरविण्यासाठी दोन समपातळी बांधाच्या मधल्या जागेत दोन सजिव बांध घालून जमिनीचा उतार आपण कमी करू शकतो.जेणेकरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व धूपही कमी होते.असे सजीव बांध करण्यासाठी सुबाभूळ ,खस,मद्रास अंजन या गवताचा उपयोग होतो.अशी लागवड पावसाळ्यात करता यावी म्हणून पूर्व मशागत करताना समपातळीत सरी वरंबा करून सजीव बांधाची मार्गदर्शक रेषा ठरवून ठेवावी.
आपल्या शेतातून पावसाचे जादा वाहून जाणारे पाणी लवणांच्या जागी शेततळी खोदून आडवून ठेवण्याची योजनाही शेतकऱ्यांनी उन्हाळी पूर्व मशागत करतांना अमलात आणावी.या पाण्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग होतो.याशिवाय नालासरळीकरण नाल्यातील प्रवाहाला दगडाचे अडथळे करणे ही कामेही थोडी मोकळीक असलेल्या उन्हाळी हंगामात शेतकरी बंधूनी करणे हिताचे होईल.

सॉईल सोलरायझेशन( जमिन नांगरून तापू देणे):

खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमिन नांगरून तापू दिली जाते,या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात.पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते.उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले कि १५ से.मी. खोल पर्यंत जमिनीचे तापमान वाढते.अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात.जमिन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते,शिवाय जमिनीची इलेक्ट्रिक कंडकटीविटी वाढते.तसेच जमिनीतील पोटॅश,कॅल्शियम,मॅग्नेशियम यांची  घनता वाढते.आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते.सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी,वनस्पती,मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते.पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते,त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही.पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो,ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते,त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी, मो. ९४०४०३२३८९
English Summary: Why is it necessary to cultivate the land at the right time What are the benefits of doing cultivation on time Know more
Published on: 16 May 2024, 12:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)