Agripedia

शेतातून गावातलीच कोणी सुंदर खाशी तरुणी तोंडाने कडब्याची काडी चावत कोणतं तरी ठेक्यातलं गाणं गुणगुणत चालत असते.

Updated on 29 October, 2021 6:40 PM IST

वातावरणही तसं धुंद करणारं असतं. बाजूलाच नांगर ओढुन थकलेले दोन बैल समोर ठेवलेली वैरण खात असतात. आणि अकस्मात वादळ यावं तसं त्यातला आतापर्यंत गरीब वाटणारा बैल एकाएकी उधळतो. गावगुंडासारखा त्या तरुणीच्या मागे लागतो. काय होतंय हे न समजून जीवाच्या आकांताने ती बिचारी पळत सुटते. ठेचकाळते, उठते, परत पळत सुटते. वाटेत आलेल्या एका झाडावर चढते. तो बैल त्या झाडाखालीच येऊन फुरफुरत उभा राहतो. मग समोरून नायक येतो. त्या बैलाची शिंगे धरून त्याला वठणीवर आणतो. नाकात वेसण घालून त्याला जेरबंद करतो. घाबरीघुबरी झालेली नायिका खाली उतरते.

आता तो नायक तिला फैलावर घेतो. लाल लुगडे नेसून बैलासमोर यावं कशाला, असा सवाल तिला करतो तीही लाजेनं आणि रागानं, लालेलाल होत तिथून निघून जाते. मराठी सिनेमात असा प्रसंग हमखास असतो कधी त्यात फरक असलाच तर गरीब नायक लाल रंगाचा सदरा घालून त्या बैलासमोरून जातो. आता तो बैल त्या नायकाच्या पाठी लागतो. या दृश्यांमधून बैल लाल रंगाच्या कापडाला पाहून बिथरतो आणि त्याचा पाठलाग करत राहतो. हाच संदेश दिला जातो आधीच जनमाणसात पसरलेला समज दृढ करतो. पण खरंच का मिळाला लाल रंगाचा वावडं असतं? वास्तविक बैलालाच काय, पण कोणत्याच जनावराला रंगांची दृष्टी असत नाही. विविध रंग ओळखणाऱ्या पेशी त्यांच्या डोळ्यात असत नाहीत.

तेव्हा लाल रंगाचा नेमका वेध घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण मग स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुलफाइटिंगच्या खेळातही तो मातादोर लाल रंगाचा कपडा घेऊन त्या माजलेल्या वळूला का उकसावत असतो? खरं तर त्या हातातल्या कापडाचा लाल रंग हा परंपरेचा भाग आहे त्या लाल रंगाऐवजी त्यानं दुसऱ्या कोणत्याही रंगाचा फलक घेतला तरी काहीही फरक पडणार नाही बैल मुसंडी मारतो तो त्या कापडी फलकाच्या हेलकाव्यामुळे. सुरुवातीला दुरून तो फलक फडफडावून मातादोर बैलाचं लक्ष वेधून घेतो, त्या फलकाच्या हेलकाव्याने त्याला डिवचत राहतो. त्या फलकावर धाऊन जायला त्याला उद्युक्त करतो. मग त्या फलकावर तो धावून आला की ऐन वेळी त्याची जागा बदलत त्या बैलाला दमवुन सोडतो त्यानंतर तो फलक हळुवारपणे जवळून फडकावला तरी बैलाजवळ त्याच्यावर धावून जाण्याइतकी शक्ती राहिलेली नसते.

त्या वेळी तो फलक त्याच्या समोर ठेवला तरी तो त्याच्यावर हमला करत नाही. अगदी डोळ्यांसमोर लाल रंगाचा फलक असूनही तो एका जागीच बसून राहतो. त्यावरूनही त्या लाल रंगाचा आणि त्याच्या उधळण्याचा संबंध नाही हेच स्पष्ट होते.

संकलन : प्रविण सरवदे, कराड

डाॅ.बाळ फोंडके यांच्या किती? या पुस्तकातुन

English Summary: Why does the bull run away when it sees red?
Published on: 29 October 2021, 06:40 IST