पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं.
तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.
नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही;
पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो आपल्याला सहज ऐकू येतो पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.
प्रसारक : दिपक तरवडे
संकलन : प्रविण सरवदे, कराड
Published on: 14 October 2021, 07:49 IST