आपले सैन्यदल जसे देशाचे संरक्षण करते त्याचं प्रमाणे कापूस वाणांच्या ४५० ग्रॅम बी टी बियांसोबत १२० ग्रॅम नॉन बी टी बियाणे दिले जायचे ते आपल्या कापूस पिकाच्या सभोवताली लावणे गरजेचे होते. परंतु थोड्याशा हव्यासापोटी आपल्या शेतकरी बांधवांनी असं करणं टाळलं; परिणामतः बोंड आळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली आणि या आळ्याचे संकट वाढले.परंतु आता शासनाने प्रमाणित केल्याप्रमाणे सर्व कंपन्यांच्या बीटी पॅकेट्स मध्ये ५% नॉन बीटी मिसळली जाते. (RIB - रेफुजीया इन बॅग).
बोलगार्ड 2 (Cry1Ac + Cry2Ab) हे तंत्रज्ञान हिरवी (अमेरिकन), ठिपक्यांची, गुलाबी (शेंदरी), पाने खाणारी आळी व सेमी लुपर (उंट आळी) या अळ्यांच्या च्या विरोधात लढण्यासाठी बॅसिलस थुरेंजेेसीस प्रथिनं तयार करते, जे खाल्यानंतर आळीला तोंडाचा व गुदद्वाराचा लकवा मारतो, आळीची हालचाल थांबल्याने आळी उपासमार होऊन मरण पावते.या पाच आळ्यापैकी अलीकडच्या काही वर्षात गुलाबी (शेंदरी) बोंडआळी ही कपाशीच्या बोंडातील सरकीचं खात असल्याने व विष्ठा बोंडातच सोडत असल्याने कपाशीची गुणवत्ता (प्रत) खराब होणे, पूर्ण पाकळ्या न उमलने, कवडी कापूस होणे, कापूस हलका भरणे इत्यादी कारणाने डोकेदुखी होऊ पहात आहे.
आता यावर काय #उपाययोजना करायच्या ते पाहू. कापूस डिसेंबर नंतर शेतातून काढून टाकणे, शेताची खोल नांगरट करणे इत्यादी उपाययोजना आपण केल्या असतीलच ज्यामुळे कोषावस्थेतील किडीचे प्रभावी नियंत्रण मिळेल.आता गुलाबी बोंड आळीचे पतंग साधारणपणे कापूस लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी कोषातून बाहेर पडतात व पाते, फुले यावर अंडी घालते. जर गुलाबी बोंडआळी नियंत्रित ठेवायची असेल तर हीच योग्य वेळ आहे.एकदा या अंड्यातून आळया बाहेर पडल्या की त्या बोंडात प्रवेश करून सरकी चे नुकसान करते.एकदा बोंडात घुसली की बाहेरून फवारलेले औषध तेवढे प्रभावी ठरत नाही या साठी साधारणपणे ४५ दिवसांच्या आसपास दोन गोष्टी करणं अत्यावश्यक आहे.
१.शेतात चोहीकडे एकरी ५ ते ७ कामगंध सापळे (Pheromone traps) लावणे: ज्यामध्ये नर पतंग अडकतील आणि प्रजनन कमी होईल.२.पोळ्याच्या आमावस्येच्या आसपास अंडीनाशक औषधी प्रोफेनोफॉस (क्यूराक्रॉन किंवा प्रोफेक्स) फवारणी करणे ज्यामुळे या किडीचा अंड्यातचं नायनाट होईल.बोंडआळीच्या नर मादी प्रजनन हे अंधाऱ्या रात्री सर्वोच्च होते म्हणून ही पोळ्याची अमावस्येची फवारणी गरजेची आहे.पीक ६०-७० दिवसांचे झाल्यावर बोंडआळीची पुढची पिढी पुन्हा जोमाने हल्ला करण्यास तयार होते, त्यावेळीही या औषधींचा दुसरा फवारा करावा. या व्यतिरिक्त बाजारात आळी विरोधात आणखी प्रभावी चोरून उपलब्ध केलेले तंत्रज्ञान आले आहे अशा भूलथापांना आपल्यासारख्या सुज्ञ शेतकऱ्यांनी बळी पडू नये. अशा प्रकारचे कोणतेही शासन प्रमाणित तंत्रज्ञान आज रोजी उपलब्ध नाही.
Published on: 19 June 2022, 05:44 IST