Agripedia

कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूमार्फत विघटन होते आणि कार्बन नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते अशा विघटन झालेल्या सेंद्रिय पदार्थांना कंपोस्ट खत असे म्हणतात.

Updated on 24 February, 2021 4:06 PM IST

कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूमार्फत विघटन होते आणि कार्बन नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते अशा विघटन झालेल्या सेंद्रिय पदार्थांना कंपोस्ट खत असे म्हणतात.

शेतातील व शेतावर आधारित उद्योगातील वाया गेलेल्या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून त्यांना जैविक प्रक्रियेतून अर्धवट कुजवून गांडुळांना खायला घातल्यानंतर त्यापासून जे खत मिळते त्याला व्हर्मिकंपोस्ट असे म्हणतात.

शेतातील, शेतावर आधारित उद्योगातील वाया गेलेले सेंद्रिय पदार्थ, ग्रामीण व शहरी भागात जमा केलेला काडीकचरा यांचे जिवाणूमार्फत विघटन करून कंपोस्ट खत तयार करतात. अशा पद्धतीने तयार झालेल्या कंपोस्ट खतांमधून शेणखताच्या तुलनेने अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ, मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा पुरवठा होतो.

*कंपोस्ट तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी*

शेतामध्ये कितीतरी सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. उदाहरणार्थ गवत, पालापाचोळा,  पिकांचे धाटे जनावरांचे मलमूत्र, पिकांचे धान्यव्यतिरिक्त शेष भाग या सेंद्रिय पदार्थांपैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच शेतात वापरता येतात व काहीना मात्र बरेच दिवस कुजवावे लागते. त्याशिवाय ते शेतात वापरता येत नाहीत.

शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे सेंद्रिय पदार्थ, उसाचे पाचट, गव्हाचे काड हे शेतकरी बहुदा जाळून टाकतात व त्यामुळे त्यापासून मिळणारे अत्यंत मौलिक असे सेंद्रिय खत वाया जाते. उसाचे पाचट एकरी 7 ते 8 टन एवढी असते तर गव्हाचे काढ 2 ते 5 टन एवढे असते व त्यापासून जर कंपोस्ट खत तयार केले तर जवळजवळ तेवढेच ओले कंपोस्ट खत मिळते उसाचे पाचट ,गव्हाचे काड, पिकांची धाटे, पालापाचोळा हे सेंद्रिय पदार्थ जरी कुजण्यासाठी कठीण असले तरी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास कुजण्याची प्रक्रिया जलद होते व अन्नद्रव्यांनी युक्त असे कंपोस्ट खत लवकर उपलब्ध होते. सेंद्रिय पदार्थापासून जलद कंपोस्ट तयार करण्यासाठी नवीन शास्त्रीय पद्धतीमध्ये पाच महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात.

1.जिवाणूंचा वापर:

जिवाणुंमुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे कंपोस्टमध्ये रूपांतर होते हे जिवाणू एक टन काडीकचऱ्याचे कंपोस्ट खड्डे भरताना अर्धा किलो या प्रमाणात वापरावे.

2.पाणी

सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची वाढ होण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक असते. म्हणून कंपोस्ट खड्डे भरताना आणि भरल्यानंतर खड्ड्यातील पालापाचोळा ओला राहील याची दक्षता घ्यावी. खड्ड्यातील सर्व सेंद्रिय पदार्थ साधारणत: 60 टक्के पाणी राहील अशा पद्धतीने पाणी शिंपडावे. मात्र खड्ड्यातील पाणी साठून राहील असे जादा पाणी टाकू नये. आवश्यकतेपेक्षा जादा पाणी किंवा कमी पाणी असल्यामुळे कुजण्याची क्रिया मंदावते.

3.सेंद्रिय पदार्थ:

सोयाबीन, मूग, हरभरा,  उडीद, घेवडा यांचा पालापाचोळा वापरण्यास कुजण्याची क्रिया जलद होती व कंपोस्ट खत लवकर तयार होते त्याचप्रमाणे वरील वाळलेल्या सेंद्रिय पदार्थाबरोबर पाण्यावर वाढणारे वॉटर हायसिंथ अझोला व इतर वनस्पतीचे कोवळे भाग वापरले तरी सुद्धा कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते. काडी कचऱ्यांचे लहान लहान तुकडे हे मोठे तुकडे पेक्षा लवकर कुजतात  म्हणून कुजण्यास कठीण असणाऱ्या पदार्थांचे लहान-लहान तुकडे केल्यास कंपोस्ट लवकर तयार होते.

4.कर्ब नत्र प्रमाण

सेंद्रीय पदार्थतील कर्ब : नत्र प्रमाण जेवढे अधिक तेवढे ते कुजण्यास अधिक वेळ लागतो. अशा प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचे कर्ब:नत्र प्रमाण युरियासारखी नेत्र असणारी रासायनिक खते टाकून कमी करता येते. म्हणून गव्हाचे काड, उसाचे पाचट त्यापासून कंपोस्ट करताना प्रति टनी 1 ते 2 किलो युरिया वापरणे आवश्‍यक आहे. यामुळे सेंद्रिय पदार्थातील नत्राचे प्रमाण वाढते, कुजण्याची प्रक्रिया ही जलद होते व कंपोस्ट खतात नत्राचे प्रमाणही वाढते.

5.स्फुरद खतांचा वापर:

कंपोस्ट खड्डे भरताना 1 ते 2 किलो सुपर फॉस्फेट किंवा 20 किलो रॉक फॉस्फेट प्रति टन सेंद्रिय पदार्थांबरोबर वापरल्यास कंपोस्ट खत लवकर तयार होते व तयार होणाऱ्या कंपोस्ट त्यातील उपलब्ध स्फुरदच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते.

कम्पोस्ट तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत

  1. ढीग पद्धत
  2. खड्डा पद्धत

दोन्ही पद्धतीत काही फायदे काही तोटे आहेत; परंतु ढोबळ मानाने विचार केला असता जास्त पावसाच्या व पाणथळ भागात ढीग पद्धत वापरतात व इतर ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबणे हे जास्त फायद्याचे ठरते.

1.ढीग पद्धत या पद्धतीमध्ये पायात 2.10 मीटर रुंद 2.10 मीटर लांब व 1.5 मीटर उंच असा वरच्या बाजूस निमुळता होत जाणारा ढीग रचला जातो. पृष्ठभागावरील रुंद पायांपेक्षा 0.6 मीटरने कमी होते.ढीग पद्धतीमध्ये अधिक पट्टा पद्धतीने रचला जातो. प्रथम 20 सेंटीमीटर जाडीचा व कर्बयुक्त पदार्थांचा थर व त्यावर 10 सेंटीमीटर जाडीचा नत्रयुक्त पदार्थ या क्रमाने ढीग 1.5 मीटर उंची रचला जातो. प्रत्येक थरावर पाणी शिंपडले जाते. पृष्ठभाग थोडासा खोलगट करून( पाणी साठविण्यासाठी) नंतर हा ढीग सर्व बाजूंनी माती व वाळलेले गवत यांनी झाकून टाकावा. त्यामुळे ढिगातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही. 6 व 12 आठवड्यांनी सर्व थरातील पदार्थ संपूर्णपणे पुन्हा खालवर मिसळल्याने विघटन जलत होते. सुमारे 18 आठवड्यापर्यंत खत तयार होते.

2.खड्डा पद्धत: या पद्धततीत कमी पावसाच्या प्रदेशात वापरतात.खड्डा शक्‍यतो उंच जागी असावा .खड्ड्याची खोली 1 मीटरपेक्षा जास्त नसावी. रुंदी 2 ते 3 मीटर व लांबी सोयीप्रमाणे 3 ते 5 मीटर ठेवावी. संरक्षण म्हणून सभोवताली एक बांध असावा. दोन खड्ड्यात बरेच अंतर असावे.म्हणजेच खत भरतांना वाहतुकीस सोपे जाते. पावसाचे पाणी त्यावर पडत नाही  व त्यासाठी वरती छत असावे. साधारणपणे प्रत्येक खड्डा 7 दिवसात भरला जाणे योग्य ठरते. खड्डा पद्धतीने सेंद्रिय खत उत्तमप्रकारे तयार करता येते.

र्मिकंपोस्ट गांडूळ खत तयार करणे*

गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनिया ही परदेशी जात जगामध्ये सखोल संशोधनाअंती सर्व प्रकारे सर्वोत्तम  अशी आढळून आली आहे. पेरीओनिक्स एक्सकॅहेटस ही गांडूळाची स्थानिक जात सुध्दा गांडूळ खत तयार करण्यास चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या इसिनीया ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठया प्रमाणात वापरात आहे. गांडूळांना वानवे, वाळे ,केचळे, शिदोड, काडू किंवा भूनाग अशा अनेक प्रकारच्या नावाने ओळखले जाते. प्राणीशास्त्रांच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडुळे आणि अनीलिडा या वर्गात मोडतात. जगामध्ये 3000 प्रकारच्या जातीचे गांडूळे आढळून येतात. गांडुळे सेंद्रिय पदार्थांचे तुकडे करून खातात, त्यावेळी घशाच्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे गांडुळे तोंडावाटे अन्न गिझार्डमध्ये ओढून घेतात.

तेथे त्याचे चर्वण होऊन भुग्यात रूपांतर होते. असे अन्नकण पुढे आतड्यात आल्यावर निरनिराळी पाचके व उपयुक्त जिवाणू यांच्यामुळे जैविक, रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे विघटन होते. गांडुळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद - गंधयुक्त काळसर रंगाच्या, वजनास हलके आणि कणीदार दिसणाऱ्या विष्ठेस 'व्हर्मिकंपोस्ट असे म्हणतात. एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्ठा शरीराबाहेर टाकते. त्याच्याशिवाय गांडुळाच्या विष्ठेतून नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम ही मूलद्रव्ये शेजारच्या जमिनीपेक्षा अधिक प्रमाणात पिकांना मिळतात. शिवाय गांडुळाच्या विष्ठेतील सामू शेजारच्या जमिनीपेक्षा अधिक उदासीन असतो.

 

*आवश्यक साहित्य*

(1) कंपोस्ट खतासाठी : पाचट किंवा सेंद्रिय पदार्थ, शेण, सेंद्रिय पदार्थांचे

विघटन करणारे जिवाणू, ड्रम, पाणी, युरिया सुपर फॉस्फेट, इत्यादी.

(2) गांडूळखतासाठी : काडीकचरा, रापलेले खत किंवा स्लरी, गांडुळे, गोमूत्र मिश्रित पाणी, गोणपाट, इत्यादी.

*कार्यपद्धती*

(1) कंपोस्ट खड्डे असे भरा

सर्वसाधारणपणे कंपोस्ट खड्याची रुंदी 1.5 ते 2.5 मीटर, खोली 1 मीटर

व लांबी आवश्यकतेप्रमाणे 6 मीटरपासून 10 मीटरपर्यंत ठेवावी. पाचटाचे किंवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे, काडीकचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत व त्याचा खड्यात 30 सेंमी. जाडीचा थर द्यावा. एका ड्रममध्ये पाणीघेऊन उपलब्ध काडीकचऱ्याच्या10 टक्के जनावरांचे शेण त्यामध्ये मिसळावे. त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन करणारे जिवाणू अर्धा किलो प्रतिटन या प्रमाणात शेणकाल्याच्या ड्रममध्ये टाकून चांगले मिसळून घ्यावे आणि कंपोस्ट खड्डे भरताना थरावर संपूर्ण खड्यास पुरेल अशा पद्धतीने टाकावे. दुसरा एक ड्रम घेऊन त्यात पुरेसे पाणी घ्यावे व त्यामध्ये 1 किलो युरिया व 1 किलो सुपर फॉस्फेट प्रति टन काडी कचऱ्याच्या प्रमाणात घेऊन ड्रममधील पाण्यात विरघळावे व हे द्रावण खड्डे भरताना प्रत्येक थरावर सम प्रमाणात संपूर्ण खड्यास पुरेल अशा बेताने टाकावे.

सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जिवाणू, युरिया व सुपर फॉस्फेटचे द्रावण टाकून नंतर शेणकाला व जिवाणूंचे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावे व नंतर आवश्यकतेनुसार जादा पाणी टाकावे, जेणेकरून एकत्र केलेला काडीकचरा ओला राहील आणि त्यामध्ये 60 टक्के पाणी राहील. अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीच्या वर 30 ते 60 सेंमी. येईल इतका भरावा. संपूर्ण खड्डा मातीने अगर शेणमातीने झाकून घ्यावा म्हणजे खड्ड्यातील पाणी बाष्प होऊन उडून जाणार नाही. एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्याची चाळवणी करावी आणि आवश्यकता वाटल्यास पाणी टाकावे. असे केल्याने कंपोस्ट खत 4  महिन्यांत तयार होईल.कंपोस्ट खत तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी पुढील चाचणी पद्धतीचा अवलंब करावा.

  1. (1) उत्तम कुजलेले कंपोस्ट खत पिसासारखे मऊ दिसते.

  2. (2) उत्तम कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचे आकारमान 65 टक्के कमी व वजन

  3. 30 ते 60 टक्के कमी होते.

  4. (3) कंपोस्ट खताचा रंग तपकिरी व गर्द काळा असतो.

  5. (4) कंपोस्ट खताची विशिष्ट घनता कमी होते.

  6. (5) कंपोस्ट खतास मातकट वास येतो.

  7. (6) खताचे तापमान कमी होते.

  8. (7) कार्बन डायऑक्साईड निघण्याचे प्रमाण कमी होते.

  9. (8) कर्ब:नत्राचे प्रमाण 20 ते 22:1 असे असते.

  10. अशा प्रकारे उत्तम कुजलेल्या कंपोस्ट खतात नत्राचे प्रमाण 1 ते 1.5 टक्के

राहून कर्ब व नत्राचे गुणोत्तर जवळजवळ 20:1 राहते. असे चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत वापरल्याने जमिनीची सुपीकता चांगली राहून पिकांचे उत्पन्न लक्षणीय वाढते.

(2) गांडूळ खतनिर्मिती

(1) गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.

(2) खड्याच्या जवळपास मोठे वृक्ष/झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे

गांडूळखतामधील पोषक घटक शोषून घेतात.

(3) गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे. छप्पर बांधणीची पद्धत ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता 8 फूट उंच, 10 फूट रुंद व 30 ते 40 फूट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमीजास्त चालू शकते. छपरात/शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कुड घालावा.

गांडूळ पालनाची पद्धत

छपरामध्ये दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्याच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळींवर प्रथम उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करून सहा इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडुळांना जाड कचऱ्यात आश्रय मिळेल. दुसरा थर चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा: तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडुळांना खाद्य म्हणून कामी येईल. बीजरूप म्हणून या थरावर साधारणत: 3 x 40 फुटांसाठी 10 हजार गांडुळे समान पसरावीत. त्यावर गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. त्यानंतर शेण व लहान तुकडे केलेल्या काडीकचऱ्याचा 1 फूट जाडीचा थर त्यावर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कचऱ्याचा थर द्यावा. ओल्या पोत्याने/गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.

बेड-थरांची माहिती

(1) जमीन

(2) सावकाश कुजणारा सेंद्रिय पदार्थ 2"-3" जाडीचा थर (नारळाच्या

शेंड्या, पाचट, धसकट, इत्यादी.)

(3) कुजलेले शेणखत/गांडूळखत 2"-3" जाडीचा थर.

(4) गांडुळे

(5) कुजलेले शेणखत/गांडूळखत 2" 3"जाडीचा थर

(6) शेण, पालापाचोळा, वगैरे 12" जाडीचा थर

(7) गोणपाट

 

गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत

गांडूळ खत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचे ढीग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाशी जातील व गांडुळे व गांडूळ खत वेगळे करता येतील. शक्यतो गांडूळखत वेगळे करताना कुदळी,टिकाव, फावडे, खुरपे यांचा वापर करू नये. जेणेकरून गांडुळांना इजा पोहोचणार नाही.

गांडुळांच्या संवर्धनासाठी घ्यावयाची काळजी

(क) एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त 2,000 गांडुळे असावीत.

(ख) बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रूपासून गांडुळांचे संरक्षण करावे.

(ग) संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार

नाही याची काळजी घ्यावी.

(घ) गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा 40 ते 45 टक्के ठेवावा.

(च) गांडुळे हाताळताना किंवा गांडूळखत वेगळे करताना त्यांना इजा होणार

नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडुळे वेगळी करावीत,

जेणेकरून इतर गांडुळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.

 

लेखक

प्रा. अजय डी. शेळके

( सहाय्यक प्राध्यापक)

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा.

प्रा. अजय एस. सोळंकी

( सहाय्यक प्राध्यापक)

कृषी महाविद्यालय कोंघारा, जि. यवतमाळ.

 प्रा. महेश डी. गडाख

  ( सहाय्यक प्राध्यापक)

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा.

English Summary: What is vermicompost? How the creation is done, read the full information
Published on: 30 January 2021, 04:50 IST