1. कृषीपीडिया

काय असतं पिकांमधील लोहाचे कार्य, जाणून घ्या मह्त्त्व

KJ Maharashtra
KJ Maharashtra
लोह (फेरस)चे कार्य

लोह (फेरस)चे कार्य

भारतीय जमिनीमध्ये एकूण लोहद्रव्याचे प्रमाण 20,000 ते 1,00,000 मिलिग्रॅम प्रति किलो माती इतके आहे. मात्र, उपलब्ध लोहाचे प्रमाण अतिशय कमी आहे. उपलब्ध लोहाचे प्रमाण हे जमिनीच्या मूलभूत गुणधर्मांवर अवलंबून असते.

फेरोमॅग्नेशिअम खनिजे म्हणजे लोहाचे मूलस्रोत होय. चिकणमातीयुक्त जमिनीत ही खनिजे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. परिणामी एकूण लोहसाठा अधिक दिसून येतो. मात्र, हे लोह पिकांना उपलब्ध स्वरूपामध्ये नसते. लोहाची गरज चुनखडीयुक्त जमिनी भागवू शकत नाहीत. म्हणून पिकांसाठी लोहयुक्त खतांचा वापर करावा लागतो.

वनस्पतीतील कार्य

पिकांच्या हिरव्या पानांचा लोह हा घटक नसला तरी अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण क्रियेत उत्तेजकाचे कार्य करतो. हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात लोह गरजेचे असते.
 पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी लोह अन्नद्रव्य गरजेचे असते.
 लोह अनेक विकरांचा (एन्झायम्स) व प्रथिनांचा (प्रोटिन्स) घटक असून, इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव-रासायानिक क्रियेत भाग घेतो. पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत लोह गरजेचे आहे.
नत्र स्थिरीकरण प्रक्रियेत लोह मदत करतो.

 

लोह उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक 

जमिनीचा सामू -* जास्त सामु असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखिल लोहाची उपलब्धता कमी होते.
फेरस स्फुरद संबंध -* जास्त प्रमाणातील स्फुरदमुळे लोहाची उपलब्धता कमी होते.
नायट्रेट नत्राच्या वापारामुळे पिकातील धन-ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होवुन फेरसची उपलब्धता कमी होते.
फेरस मँगनीज संबंध -* दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुस-याची उपलब्धता कमी करते.
फेरस मॉल्बडेनियम -* जास्त प्रमाणातील मॉल्बडेनियम मुळे पिकाच्या मुळांवर आयर्न मॉल्बडेटचा थर तयार होतो.

कमतरतेची लक्षणे

लोहद्रव्याच्या कमतरतेमुळे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण घटते. लोहाचे चलनवलन अगदीच कमी असल्यामुळे मुळ्यामधून वरच्या अवयवापर्यंत द्रव पोचण्यासाठी उशीर लागतो. म्हणून लोह द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन कोवळी पाने, उमललेल्या कळ्या यावर लवकर दिसतात. पिकांची कोवळी पाने पिवळी पडतात. पानातील नसांच्या आतील भाग पिवळा होतो. अधिक कमतरता असल्यास पाने पांढरी आणि जर्जर होतात. पाने, कळ्या व वाढबिंदू गळून पडतात. फुले कमी लागतात. वांझ निर्मिती होते.

लोहयुक्त खते

विविध स्रोत / प्रकार -- लोहाचे प्रमाण*_
फेरस सल्फेट -- 20%
फेरस अमोनियम सल्फेट -- 14%
अमोनिया पॉली सल्फेट -- 22%
आयर्न डीटीपीए चिलेट -- 10%
आयर्न एचईडीटीए चिलेट -- 5-12%

लोहयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देणारी पिके -

संत्रावर्गीय फळझाडे, द्राक्षे, फुलझाडे आणि अन्य फळझाडे.
लोहयुक्त खते चुनखडीयुक्त जमिनीत वापरल्यास पिकांना लागू होत नाहीत. अशा परिस्थितीत लोहयुक्त खते पिकांना फावारणीतून द्यावीत. जमिनीतून हेक्टरी 25 ते 50 किलो लोह सल्फेटच्या रूपाने देता येते. फळझाडे आणि पिकांना 0.5 ते 1 टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन 2-3 वेळा करावी. ही फवारणी जमिनीतून दिलेल्या मात्रेपेक्षा सरस ठरते.

लेखक - विनोद भोयर (मालेगाव)
प्रतिनिधी - गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters