Agripedia

जास्त पीक उत्पादनाच्या हव्यासापोटी मानवाने अतिरेकी रासायनिक खतांचा वापर जमिनीमध्ये केल्यामुळे जमिनीचे आरोग्य हे धोक्यात आले आहे.

Updated on 19 January, 2022 9:41 AM IST

जास्त पीक उत्पादनाच्या हव्यासापोटी मानवाने अतिरेकी रासायनिक खतांचा वापर जमिनीमध्ये केल्यामुळे जमिनीचे आरोग्य हे धोक्यात आले आहे. जमिनीच्या आरोग्या विषयी विविध समस्या आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामध्ये जमिनीचा पृष्ठभाग टणक आणि कठीण बनने ,काही अन्नद्रव्यांचा विषारीपणा , तर काहींची टंचाई, सूक्ष्मजीवांची न होणारी वाढ, पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, पर हेक्टरी कमी उत्पादन यासारख्या समस्या कमी करण्यासाठी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे सध्यः स्थितीत फार गरजेचे आहे, तर जाणून घेऊया काय आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन !

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय? 

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्वप्रकारच्या स्त्रोतांपासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .उदा. रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीकपद्धती व द्विदल पिकांचा अंतर्भाव इ. यांचा अवलंब करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून व जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ करणे होय. 

किंवा वातावरणाची सुरक्षितता अबाधित राखून सेंद्रीय, रासायनिक, जैविक खते तसेच हिरवळीचे पीक, पीक फेरपालट, आंतर पिक पद्धती, पीक अवशेष आदींचा एकत्रित वापर करून जमिनीची आणि पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या पध्दतीस एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात.

 अन्नद्रव्याच्या प्रत्येक स्रोताचा गुणधर्म किंवा उपयुक्तता वेगवेगळी आहे. उदा. सेंद्रिय खते जमिनीचे नैसर्गिक गुणधर्म सुधरवतात. जैविक खते जमिनीत वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवितात तर रासायनिक खतांद्वारे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. म्हणूनच त्यांचा एकात्मिक वापर महत्त्वाचा आहे. सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण, पीक फेरपालट आणि योग्य पीक पद्धतीचा अवलंब करून पिकास अन्नद्रव्ये पुरविण्याच्या पद्धतीस एकात्मिक व्यवस्थापन म्हणतात.

   एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबरच सेंद्रीय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा, इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून पीक अन्नद्रव्य पुरवठ्याचा समतोल साधला जातो.

या पद्धतीत द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपिकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना ही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता कायमस्वरुपी टिकविणे ही आहे. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाचा विचार करून जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवून ती शाश्वत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यासाठी उपलब्ध सर्व स्रोतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. या पध्दतीत अन्नद्रव्यांचे नियोजन विविध स्रोतांतून करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षता वाढविली जाऊन उत्पादनात वाढ होते. तसेच जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याकरिता सर्वसाधारणपणे सेंद्रिय स्वरूपातून पुरविणाऱ्या अन्नद्रव्यांचा सहभाग २५ ते ३०% असावा, जैविक स्वरूपातील २० ते २५% आणि रासायनिक स्वरूपातील सहभाग ५०% असावा. 

 

 एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व

रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविता येते.संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्यक आहे.जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्मात सुधारणा करण्यासाठी याची गरज आहे.जमिनीतील व पिकांमधील जैव रासायनिक प्रक्रियांचा समतोल यामुळे राखला जातो.अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रुपांतर करता येते.तसेच जमिनीतील सर्व पीक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे वाढविता येते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे फायदे 

अविद्राव्य अन्नद्रव्यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते व स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता वाढविता येते, तर नत्राची उपलब्धता आवश्यक तेवढीच ठेवता येते. जमिनीतील कर्ब नत्र यांच्या प्रमाणात समतोल राखला जातो. पिकांना संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करता येतो.पीक अवशेषाचा जमिनीत प्रथम आच्छादन आणि नंतर सेंद्रिय खत म्हणून वापर केल्यास जल व मृदसंधारण तसेच अन्नद्रव्ये संधारणही करता येते.संतुलित खतांमुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक उत्पादनात वाढ होते. सेंद्रिय व जैविक खतांमुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपरोगिता वाढते. 4.पीकपद्धतीत पहिल्या पिकास वापरलेल्या सेंद्रिय खतांचा वापर पुढील पिकासही उपयुक्त ठरतो. योग्य पीक फेरपालटीचा व आंतरपीक पद्धतीचा पुढील पिकांस अन्नद्रव्यांची उपलब्धता विशेषतः नत्राची उपलब्धता वाढविण्यास मदत होते.

जमिनीच्या भौतिक गुणधर्मात (उदा. पाणी धरून ठेवणे, हवा खेळती ठेवणे,जमीन भुसभुशीत करणे इत्यादी)रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.जमिनीची जलधारणा शक्ती, जैवरासायनिक प्रकियांचा समतोल राखला जातो. उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. 

 

लेखक

अजय एस. सोळंकी

( सहाय्यक प्राध्यापक) कृषी महाविद्यालय कोंघारा, जि. यवतमाळ.

अजय डी. शेळके

( सहाय्यक प्राध्यापक) डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा.

तेजश्री ए. शिरोळकर

( सहाय्यक प्राध्यापिका) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय ,सांगली

रेश्मा जी. पोंदकुले

(सहाय्यक प्राध्यापिका ) कृषी महाविद्यालय , बारामती

English Summary: What is Integrated nutrients management
Published on: 19 January 2022, 09:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)