Agripedia

शेतात पेरलेल्या प्रत्येक पिकावर निरनिराळ्या कीटकांचा, रोगजंतूंचा हमला होत असतो

Updated on 29 April, 2022 8:02 AM IST

शेतात पेरलेल्या प्रत्येक पिकावर निरनिराळ्या कीटकांचा, रोगजंतूंचा हमला होत असतो. कपाशीचे पीकही याला अपवाद नाही. बोंड अळी या कापसाच्या पिकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा फवारा करावा लागतो. एक तर ही कीटकनाशके महागडी असतात. शिवाय त्यांचा काही अंशही पिकांवर राहतो.

 बॅसिलस थुरीन्जेन्सिस हा जीवाणू नैसर्गिकरीत्याच एक विष तयार करतो. त्या विषापायी कीटकांचा नाश होत असतो. हे विष अलग करून त्यांचे स्फटिकही तयार करता येतात. त्यामुळे या जीवाणूनिर्मित विषाच्या स्फटिकांचा फवाराही कापसाचे बोंड अळीच्या उपसर्गापासून संरक्षण करू शकतो

परंतु जैवतंत्रज्ञानाचा उदय झाल्यावर वैज्ञानिकांच्या मनात एक वेगळीच कल्पना घोळु लागली. बॅसिलस थुरिन्जेन्सिसचे विष हाही एक सजीवनिर्मत पदार्थ आहे आणि कापूस ही वनस्पतीही एक सजीव आहे. मग या जीवाणूच्या अंगी असणाऱ्या या कीटकनाशक गुणधर्माची रुजवात कापसाचा अंगी नाही का करता येणार ? त्यासाठी प्रथम बॅसिलस थुरिन्जेन्सिस, छोटं नाव बीटी, यातल्या त्या विषाचं उत्पादन करण्यास कारणीभूत असणाऱ्या जनुकाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते जनुक त्या जीवाणूतून अलग करण्यातही वैज्ञानिकांनी यश मिळवले.

त्यानंतर त्या जनुकाची रुजवात कापसाच्या जनुकसंचयात करण्यात आली. त्यामुळे कापसाच्या वाढीसाठी लागणाऱ्या अनेक प्रथिनांची निर्मिती करताना हे बीटीपासून उसने घेतलेले जनुकही कार्यान्वित झाले. त्यामुळे कापसाकरवी नैसर्गिकरित्याच त्या कीटकनाशक विषाचे उत्पादन होऊ लागले. त्याच्या प्रभावापोटी मग बोंड अळीचा बंदोबस्तही होऊ लागला. बोंड अळीपासून स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकणारे कापसाचे एक नवीनच वाण तयार झाले. त्यालाच बीटी कापूस हे नाव देण्यात आले.

प्रयोगशाळेत त्या वाणाने दाखवलेला गुणधर्म प्रत्यक्ष शेतातही साकारण्यात ते वाण यशस्वी झाले. त्यामुळे त्याची लागवड जगभर मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. बोंड अळीचा असा बंदोबस्त झाल्यामुळे मग शेतकऱ्यांना कापसाचे बंपर पीक घेता येऊ लागले. केवळ दुसऱ्या एखाद्या वनस्पतीच्या अंगी असणाऱ्या गुणधर्माचेच रोपण वनस्पतींमध्ये करता येते, या समजाला मूठमाती मिळाली. कोणत्याही सजीवाच्या अंगच्या गुणधर्माचे रोपण दुसऱ्या कोणत्याही सजीवात करता येते आणि अशी जनुके त्या रोपण केलेल्या सजीवात यशस्वीरित्या कार्यान्वितही होतात हे दिसून आले. जनुकसुधारित बियाणी; एवढेच काय पण जनुकसुधारित सजीव निर्माण करणारे एक नवीन तंत्रज्ञान उदयाला आले. त्या तंत्रज्ञानाचा एक आघाडीचा अविष्कार म्हणजे बीटी कापूस.

English Summary: What is BT cotton you know about this
Published on: 29 April 2022, 07:59 IST