Agripedia

माधवराव खंडेराव मोरे यांच्या भावूक आवाहनाने थरारली सभा

Updated on 27 March, 2022 4:27 PM IST

माधवराव खंडेराव मोरे यांच्या भावूक आवाहनाने थरारली सभा 

"इथं घराला आग लागलीय.अन तुम्ही चाललात कुठं..परिस्थितीचा रेटा इतका वाढलाय. की तुम्हाला आता बदलावं लागेल. तुमचं आता काहीही खरं नाही..शेतकरी आंदोलनाची इतिहास जगलेले शरद जोशींचे एकेकाळचे पक्के सहकारी माधवराव खंडेराव मोरे यांनी काल नाशिकला झालेल्या शेतकरी संप राज्य समन्वय समितीच्या बैठकीत कापऱ्या स्वरात..व्याकूळ आर्त होऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा सारी सभा थरारुन स्तब्ध झाली होती.ते म्हणाले पंधरा दिवस, महिनाभर संपाची तयारी केली. अन मग सगळे राजकीय पक्ष तुमच्या बाजूनं बोलायला लागले. कोणताही पक्ष तुमच्या विरोधात बोलत नव्हता. कारण त्यांना माहितीय. तुम्हाला गोंजारुन वेड्यात काढणं सोपंय. प्रत्येकानं तुमच्या नावानं ढोलकं पिटलं. त्यांनी तुम्हाला फसवलं नाही तर ते खातील तरी काय? 

पक्ष, धर्म जात हे सगळं बाजूला ठेवा. या नावानं होणाऱ्या बेरजा, वजाबाक्‍या बाजूला ठेवा. अन फक्त शेतकरी म्हणून एकत्र या. फक्त शेतीचा विषय डोक्‍यात घ्या. लाईटली घेऊ नका. हा 40 वर्षांचा इतिहास आहे. जे जे शेतकरी संघटनेच्या सभेला येत होते. 

त्यांच्या वैचारिक पातळीत आमुलाग्र बदल होऊन ते घरी जात होते. घामाच्या दामासाठी तुमचे आजे पंजे लढत होते. तेव्हा तुमच्या पैकी कुणी आईच्या पोटात असाल. कुणी शाळेत जात असाल. जे जे लढले त्यांच्यापैकी आतापर्यंत 60 टक्के देवाघरी गेलेत. एवढं सगळं सोसून जेव्हा तुम्हीच चोरांच्या मागं जावून शेतकऱ्यांचीच वाट लावीत होते.

 मागचे 25, 30 वर्षे मी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आमच्या शब्दावर हजारो शेतकऱ्यांनी लाठ्या काठ्या खाल्यात. हे शेट्टी, रामचंद्र बापू यांना विचारा की कशा गावागावातल्या म्हाताऱ्या बायाही जीवाची पर्वा न करताही लेकराबाळांसह रस्त्यावर उतरायच्या. रस्त्यावर उतरायची तुम्ही भाषा करता आहात. तर पूर्ण नेटानं उतरा एवढंच मला सांगायचंय.

मी तुमच्या हातात तराजू देतो. एका पारड्यात तुमचं आज शेतात उभं असलेलं पिक अन दुसऱ्या पारड्यात तुमच्या डोक्‍यावर असलेलं सोसायटी बॅंकांचा कर्ज ठेवा. विचार करा. इतकी वर्ष कोणतं पारडं जड जातं. तुमचं कर्ज कधीच का फिटत नाही? सगळं हातातून काढून घेतलं जात असतांना तुम्ही जागे होत नाहीय हे दुर्दैवं आहे. असंच जर चालू राहिलं तर जशी आतापर्यंत बाकीच्यांनी आत्महत्या केल्यात तसे तुम्हीही मरणार नाही. वेगळं काहीच होणार नाही. 

आतापर्यंत सगळेच तुमच्याशी चोंबडे बोलत आलेत. माझं कटू बोलणं ऐकून घ्या. आपलीही शेवटची सभा असेल. पण तुम्हाला आता "चॉईस' राहीला नाही. कुणीही यावं अन तुमच्या पाठीवर थाप मारावी अन तुमचा कान कापून घेऊन जावं. असंच जर तुमचं बेहिशेबी वागणं राहिलं तर मरण्याशिवाय तुमच्याकडं पर्याय उरणार नाही. हे नीट ध्यानात ठेवा. 
मला मोठी घमेंड होती. जगात भारत भारी. भारतात महाराष्ट्र..महाराष्ट्रात नाशिक जिल्हा अन नाशिक जिल्ह्यात माझा निफाड तालुका. सगळी लोक मरतील पण निफाड तालुक्‍यातील माणसं कधीच आत्महत्या करुन मरणार नाहीत. ही घमेंड तुमच्या भरवशावर होती. पण काय झालं. मागच्या तीस चाळीस वर्षात निफाड तालुका आता सर्वाधिक आत्महत्याचा तालुका म्हणून ओळखला जायला लागलाय. याचं एक कारण म्हणजे तुम्ही बदलायला तयार नाही. तुमच्या तीन पिढ्यांचा मी अभ्यास केलाय. पोळून निघालोय मी. 

आंदोलनात माझ्या जवळ लढणारे तीन सहकारी पोलिसांच्या गोळ्यात ठार झाले. मी डोक्‍यात एसआरपी चा मार खाला. रोज 24 औषधाच्या गोळ्या खाऊन जगतोय मी. मनातून कायम अस्वस्थ आहे. हा बी. जी. कोळसे पाटील माणूस तुमच्या साठी हाय कोर्टातली नोकरी सोडून रस्त्यावर उतरला. त्याला तुम्ही जोड्या जवळ उभे करीत नाही अन तुम्ही चोरांच्या मागे धावता. आता सहन करणं अन धावणं बंद करा. आणखी किती वाट लावून घ्यायची राहिलीय. 

तुमच्या पोरांची लग्नं सुध्दा होत नाहीत. पोरगी म्हणते एकवेळ मला विहिरीत ढकला. पण शेतकरी नवरा नको. तुमच्यावर ही वेळ कुणी आणलीय. आता तर शेतकऱ्यांच्या पोरींनी सुध्दा आत्महत्या करायला सुरवात केलीय. काळ्या कुट्ट अंधारातून वाटचाल चालू आहे. मिणमिणता दिवाही दिसत नाहीय. पुन्हा एकदा सांगतो जगायचं असेल तर ताठ मानेनं जगा. जात, धर्म, पक्ष बाजूला टाकून द्या. सहन करणं अनं चमचेगिरी करणं थांबवा. एकदातरी शेतकरी म्हणून एकत्र या. 

 

शब्दांकन : ज्ञानेश उगले 

नाशिक

English Summary: Wake up, change otherwise no one will come to save you!
Published on: 27 March 2022, 04:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)