रायझोबियम, अॅझोस्पिरिलम, अॅझोटोबॅक्टर, निळे-हिरवे शेवाळ, अझोला, स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पी. एस. बी.) इत्यादी जीवाणू खतांचा समावेश होतो. यांच्या वापरामुळे सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन जमिनीचा पोत सुधारतो. तसेच मातीमधील सुक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. यामुळे बियाणांची उगवण लवकर व चांगली होते.
रायझोबियम
रायझोबियम जीवाणूंना सहयोगी नत्र स्थिर करणारे जीवाणू म्हणतात. हे जीवन द्विदल वनस्पतीच्या मुळांवर गाठी तयार करून त्यामध्ये राहतात. हे जीवाणू वनस्पतीकडून त्यांना लागणारे अन्न मिळवितात व हवेतील नत्र अमोनियाच्या स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात.
हे नत्र तयार करण्यासाठी कडधान्यांच्या मुळावरील गाठीतून उपयुक्त कार्यक्षम जीवाणू अलग करून विशिष्ट प्रकारच्या माध्यमातून त्यांची मोठय़ा प्रमाणावर वाढ करून र्निजतुक केलेल्या लिग्नाईट पावडरमध्ये मिसळून होणा-या खताला रायझोबियम जीवाणू असे म्हणतात.
अॅझोटॉबॅक्टर
सर्व एकदल वर्गीय पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी अॅझोटॉबॅक्टर जीवाणू खतांचा फायदा होतो. उदा. कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, गहू, तृणधान्ये व भाजीपाला इ. जीवाणूखत बनविण्यासाठी अॅझोटॉबॅक्टर जीवणूची द्रव माध्यमामध्ये वाढ करण्यात येते व लिग्नाईट नावाच्या पावडरमध्येही जीवाणूची वाढ म्हणजेच संवर्धक मिसळले जातात.
याच्या वापरामुळे पिकाला नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपाची वाढ जोमदार होते. तसेच जमिनीतील कर्ब, नत्राचे प्रमाण योग्य राखून जमिनीचा कस सुधारतो.
अॅझोस्पिरिलस
अॅझोस्पिरिलम अणुजीव गवत वर्गातील पिके उदा. मका, गहू, बाजरी, ज्वारी, भात, ऊस व चा-याचे गवत यांच्या मुळांमध्ये व मुळांभोवतालच्या भागात प्रामुख्याने आढळतात. या अणुजीवाचे अॅझोस्पिरिलम लिपोफेरम व अॅझोस्पिरिलम ब्रासिलन्स असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकारच्या अपुजीवांना अॅझोस्पिरिलम असे म्हणतात. हे जीवाणू अॅझोटॉबॅक्टर जीवाणूपेक्षा दीड ते दुपटीपेक्षा जास्त हवेतील नत्र स्थिर करतात.
अझोला
अझोला ही नेचेवर्गातील पाणवनस्पती आहे. या वनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिर करणारी अॅनाबिना अझोली नावाची नील हरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असते. सहजीवीपणे जगणा-या या वनस्पतीमध्ये ४ ते ५ टक्के नत्र असते. त्याचा भातशेतीस चांगला उपयोग होतो. अझोला वनस्पतीत नत्र व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते लवकर कुजते व उत्तम सेंद्रिय खत मिळते.
निळे-हिरवे शेवाळ
ही एक सूक्ष्मदर्शी एकपेशीय, तंतुमय शरीररचना असलेली गोडय़ा पाण्यातील स्वयंपोशी पानवनस्पती आहे. हे पाण्यात राहून हवेतील मुक्त स्थितीत असलेला नत्र. हेटरोसीस्ट या विशिष्ट प्रकारच्या शरीररचनेद्वारे स्थिर करतात. योग्य परिस्थितीत निळे-हिरवे शेवाळ प्रतिवर्षी प्रती हेक्टरी ३० किलो नत्र स्थिर करू शकते. तसेच या शेवाळाची वाढ होत असताना तयार झालेली वृद्धिसंप्रेरके व जीवनसत्त्वाचा पिकाच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
मायकोरायझा
मायकोरायझा ही वनस्पतींच्या मुळांवर वाढणारी एक प्रकारची बुरशी आहे. ती वनस्पतीला जमिनीतील स्फुरद उपलब्ध करून देण्याचे कार्य करते व त्या मोबदल्यात वनस्पतीकडून खाद्य मिळविते. ही बुरशी वनस्पतीला जमिनीतील मुळांमध्ये व मुळांबरोबर तंतुमय धाग्यासारखे अनेक दोरे बाहेर तयार करते. हे दोरे मुळांच्या आतील पेशीपासून मुळांबाहेर मातीमध्ये खोलवर दूरवर पसरलेले असतात.
त्याच्या माध्यमातून निरनिराळे आम्लधर्मीय पदार्थ तसेच विकरे जमिनीत सोडली जातात. त्यामुळे जमिनीतील अविद्राव्य स्फुदराचे विद्राव्य स्फुरदान रूपांतर होते व तो पिकाला पुरवला जातो. याचबरोबर पीकवाढीसाठी उपयुक्त असलेली वाढवर्धक द्रव्ये उदा. हार्मोन्स, ऑक्झिन्स, सायलेकायनिन्स इत्यादी तयार केली जावून ती पिकांना उपलब्ध होतात.
जीवाणू खतांचा वापर शेतीमध्ये नक्की करावा
बियाण्याभोवती लेप देणे
पेरणीपूर्वी जीवाणू खत १ टक्का गुळाच्या द्रावणात मिसळून ते बियाणास चोळून सावलीत सुकवावे. तृणधान्य पिकांसाठी १५ किलो बियाण्यामागे २५० ग्रॅम व द्विदल बियाण्याकरिता १० किलो मागे २५० ग्रॅम जीवाणू खत वापरावे.
मातीतून देणे
पेरणी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी जीवाणू खते २० किलो मातीत किंवा चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतात मिसळून शेतात फेकून द्यावे व त्यानंतर पाणी द्यावे.
खतांतून देणे
फळपिकांसाठी २० ते २५ ग्रॅम जैविक संवर्धन ५ किलो कंपोस्ट किंवा शेणखतात मिसळून बांगडी पद्धतीने द्यावे व त्यानंतर पाणी द्यावे.
अशा प्रकारे जीवाणू खतांचा वापर केल्यास बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते. पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारतो. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि महत्त्वाचे म्हणजे रासायनिक नत्र खताची २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत होते. तसेच पीक उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.
अशा प्रकारच्या सर्व उपाययोजनांचा अवलंब करून सेंद्रिय शेती किफायतशीर बनवता येते. आज एकाच प्रकारच्या किंवा रासायनिक शेतीपद्धतीमधील तोटे निदर्शनास येऊ लागले आहेत. हे तोटे कमी करण्यासाठी व जमिनीचे आरोग्य चिरकाल उत्तम राहण्यासाठी शेती हा एक चांगला पर्याय पुढे येत आहे. सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीतील सुपीकता व उत्पादकता कायमस्वरूपी टिकवणे शक्य होत आहे. त्यामुळेच आपण या सेंद्रिय गोष्टींचा वापर करून शेतीला शाश्वत शेती बनवू शकतो.
milindgode111@gmail.com
मिलिंद जि गोदे
Published on: 19 December 2021, 07:59 IST