Agripedia

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजारातील भाजीपाल्यांची आवक कमी होत आहे. यामुळे दर गगनाला भिडत आहेत. जर आपण भाजीपाल्याची शेती करत नसाल तर आपण दररोजचा येणारा पैसा गमावत आहात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला भाजीपाला लागवडीच्या पद्धतीविषयी सांगणार आहोत.

Updated on 23 October, 2020 5:14 PM IST


राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजारातील भाजीपाल्यांची आवक कमी होत आहे. यामुळे दर गगनाला भिडत आहेत. जर आपण भाजीपाल्याची शेती करत नसाल तर आपण दररोजचा येणारा पैसा गमावत आहात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला भाजीपाला लागवडीच्या पद्धतीविषयी सांगणार आहोत. भाजीपाला लागवडीच्या विविध पद्धती आहेत. त्यासाठी लागणारे हवामान, माती, पाणी, खते इत्यादी बाबी आणि शेतीचे विविध प्रकार असे अनेक प्रश्‍न सामान्य जणांच्या मनात उद्भवत असतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे सरळ सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळाल्यास प्रश्‍नकर्त्यांच्या मनाचे समाधान होते. या लेखात सरळ आणि सोप्या भाषेत या पद्धतींविषयी माहिती देणार आहोत. शेती वा भाजीपाला पिकवण्यासाठी हे लक्षात घेऊन भाजीपाल्याची शेती दोन प्रकारात येते.

  1. पल्या वैयक्‍तिक गरजेसाठी किचन गार्डनमध्ये पिकवला जाणारा भाजीपाला.
  2. रोजगार व कमाईसाठी व्यावसायिक शेती.

या शिवायही शेतीसंबंधाने अनेक जोडधंदे असतात. त्याचा सखोल विचार करून नियोजनपूर्वक आपण पैसा मिळवू शकतो. अर्थात त्यासाठी बाजारपेठांची/ मंडईची माहिती, भाजीपाल्याचे दर, मालाची साठवणूक करता येण्यासारखी जागा, याकडे लक्ष दिल्यास व तशी व्यवस्था असल्यास आपण पैसा कमावू शकतो. आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या जमिनीचा व इतर बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

  1. शेततळे, तलाव उपलब्ध असेल तर त्यातही भाजीपाल्याचे पीक आपण घेऊ शकतो.
  2. काहीजण भाजीपाला न विकता भाजीपाल्यापासून उच्च प्रतीचे बी-बियाणे तयार करून ते पॅकिंग करून बाजारात विक्रीस आणतात.
  3. काहीजण केवळ आपल्या घराच्या, शेताच्या कुंपणासाठी व खाण्यासाठी भाजीपाला लावतात.
  4. योग्य ऋतू/हवामान पाहून बहुतेकजण भाजीपाल्याचे उत्पादन घेतात, पण जे ऋतू नसताना बेमोसमी पीक घेतात ते भरपूर आर्थिक कमाई करतात.
  • किचन गार्डन (गृहवाटिका) भाजीपाला पिकवणे :-

 

तुमच्या घराच्या अंगणात वा परसदाराशी थोडी जमीन असेल आणि तुम्हाला भाजीपाला पिकवण्याची आवड असेल तर थोड्या कष्टात, आवडीनुसार वेळ देऊन तुम्ही भाजीपाला पिकवू शकता. स्वतः पिकवलेल्या भाजीचे सेवन करताना मनाला आनंद तर मिळतोच, शिवाय आपल्याला स्वास्थ्य लाभही होतो.

  • रोज ताजी भाजी मिळते. अशा भाजीची गुणवत्ता श्रेष्ठ असते.ताज्या भाजीपालातून स्वास्थासाठी लाभकारक असतो. घरातील सर्वांनीच या गृहवाटिकेच्या कार्यात लक्ष घातल्यास विविध प्रकारचा भाजीपाला लावता येईल.
  • हल्‍ली अनेक परिवार गृहवाटिकेच्या कामात रुची घेऊ लागले आहेत. तसेच अधिकाधिक माहिती जमा करून गृहवाटिकेची उपयुक्‍तता वाढवू लागले आहेत.
  • फावल्या वेळेत गृहिणी आपल्या किचनगार्डनची काळजी घेताना दिसताहेत. त्यांना घरच्याघरी भाजी पिकवण्याचे कार्य आनंददायी वाटू लागले आहे. काहीजणी त्यातून आर्थिक लाभ घेत आहेत.

 


किचन गार्डनसाठी जागा
:- घरगुती बागेत, उपलब्ध जागेत, भाजी लावण्याची माहिती सर्वांना आहे, असे गृहीत धरू. मोकळी जागा नसेल तर पत्र्याच्या डब्यात, घमेल्यात, कुंडीत किंवा घराच्या छतावरही भाजीपाल्याची लागवड करता येते.

  • भरपूर जागा असल्यास :-
  • घराच्या मागे किंवा पुढे, घराच्या डाव्या वा उजव्या बाजूस कोठेही भाजीपाला लावता येतो. भरपूर जागा असेल तर प्रत्येक मोसमात भाजीपाल्याची विविध पिके घेता येतील. त्यामुळे रोज मंडईत जायला नको तसेच आर्थिक बचतही होईल.
  • जागा मर्यादित असल्यास :-
  • किचन गार्डन अर्थात गृहवाटिकेसाठी मर्यादित जागा असल्यास फक्‍त मोसमी पालेभाज्या घेता येतात.
  • कमी जागा असल्यास :-
  • काही घराभोवती फारच कमी जागा असते, त्यांनी कमी प्रमाणात कुंडीत वा पत्र्याच्या घमेल्यात, डब्यात अल्प प्रमाणात भाजीपाला लावावा. काही फळभाज्यांच्या वेली घरावर वा भिंतीवर चढवून आपली हौस पूर्ण करता येईल.
  • अनेक मजली इमारतीत :- आपण जर शहरात फ्लॅटमध्ये राहात असाल तर भाजीपाला लावण्यास जमीन नसणार. तरीसुद्धा आपल्या आवडीला मुरड घालू नका. कुंड्या, डबे, मोकळे ड्रम, छतावर वा बाल्कनीत ठेवून काही निवडक भाजीपाला लावू शकतात. यासाठी मिरची, ढब्बू मिरची, भेंडी, पुदिना, कोथिंबीर, कांदे यांची लागवड योग्य होईल.

किचन गार्डन करताना घेतली जाणारी  सावधानी :-

डबे, कुंड्या यात भाजी लावण्यापूर्वी काही सावधानता ठेवावी लागते.

  1. जिथे कुंड्या ठेवणार असाल तिथे वॉटरप्रुफ रंग द्यावा, यामुळे सिमेंट उखडले जाणार नाही व चिखलमातीचे ओघळ सहज धुता/पुसता येतील.
  2. कुंड्या उन्हात काही तास तरी राहतील याची खबरदारी घ्या.
  3. कुंड्यांना धूर वा गॅस यांचा उपद्रव होता कामा नये.

काय आहेत गृहवाटिकेचे फायदे :-

  1. गृहवाटिकेत काम केल्याने शरीराला थोडाफार व्यायाम होतो. हा व्यायाम सार्थकी लागतो. त्यामुळे शरीर स्वस्थ राहते.
  2. अशा कामामुळे मनोरंजनही होते आणि आपण लावलेल्या रोपट्यांची कशी वाढ होते याकडे लक्ष लागल्याने मनाला आनंद होतो.
  3. हा फावल्या वेळेचा शौक मानायला हरकत नाही. गृहिणी व लहान मोठ्या व्यक्‍तीसुद्धा गृहवाटिकेत काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. यातून आर्थिक लाभही घेता येतो.
  4. हा केवळ शारीरिक व्यायाम नव्हे तर मेंदूलाही स्वस्थ ठेवण्याचा व मन गुंतवण्याचा उपाय आहे. घरात वा भोवताली हरित वनस्पती असल्यास बुद्धी अधिक प्रभावी होते.
  5. घरच्याघरी आनंद देणारे हे काम आहे. यासाठी कपडे बदलण्याची, नटूनथटून कोठे जाण्याची गरज नाही. दिवसातला तास, अर्धा तास या किचन गार्डनसाठी खर्च केलात तरी पुरे.
  6. घरातली कोणीही व्यक्‍ती आपल्या आवडी व सवडीनुसार हे काम करू शकते.
  7. ज्याला वनस्पतीच्या रोपट्यांची व मातीकामाची आवड आहे त्याला हे काम चांगले करता येते.
  8. घरच्याघरी पिकवलेली भाजी स्वतः काढून वापरण्यात जो आनंद आहे, त्याला सीमा नाही.
  9. आपल्या किचन गार्डनची भाजी भरपूर, पौष्टिक स्वादपूर्ण आणि गुणवत्तेत अग्रणी असते.
  10. शाळेला जाणार्‍या मुलांनी जर किचन गार्डनमध्ये लक्ष घातले तर त्यांची सर्जनशक्‍ती वाढते. निसर्गाच्या जवळ जाण्याचा व निसर्ग समजून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
  11. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या पत्रिकेतील बुध अनिष्ट आहे अशा व्यक्‍तींनी रोपट्यांना दररोज पाणी द्यावे म्हणजे बुध सौम्य होतो व बुद्धी वाढते.

 

 


भाजीपाला लागवडीसंबंधी विशेष बाबी

गृहवाटिकेत भाजीपाला लावण्यासंबंधाने काही विशेष बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व काम नियोजनपूर्वक करण्याची सवय असावी लागते. नियोजन नसेल तर यश येत नाही. नियोजनामुळे कमी श्रम, खर्च कमी व अधिक लाभ होतो. याकरिता पुढील बाबी लक्षात ठेवा.

  1. गृहवाटिकेसाठी माती चांगलीच हवी असे नाही. माती कोणतीही असो तिला शेतीयोग्य बनवावे.
  2. तुमच्या मातीत लहान-मोठे खडे असतील तर अशीमाती खडकाळ समजावी. यात रेतीचे प्रमाण कमी असते किंवा ती चिकणमाती असते. अशा मातीत जैविक पदार्थ घालून किंवा रेती मिसळून तिची उगवण शक्‍ती वाढवता येते.
  3. आपली गृहवाटिका घराच्या जवळ आहे की थोडी दूर हे लक्षात घ्या. गृहवाटिकेभोवती कुंपण असणे आवश्यक असते. कारण पशू-पक्षी, जनावरे, लहान मुले वा वाटसरुंनी गृहवाटिकेत प्रवेश करता कामा नये. गृहवाटिकेतील भाजीपाला सहजपणे घरात आणता येईल अशी व्यवस्था असावी.
  4. कुंड्यात, घमेल्यात वा मातीच्या आळ्यात कधीही बादलीने पाणी ओतू नका, माती वाहून जाण्याची शक्यता असते. घराच्या वापरातील खरकटे पाणी गृहवाटिकेच्या रोपट्यांना देऊ शकता, पण त्यात साबण वा केमिकल नसावे. प्लास्टिक पाईप, स्प्रे, झारीने हलक्या हाताने पाणी द्यावे.
  5. गृहवाटिका सावलीत नसावी. सावली असेल तर मेहनतीच्या प्रमाणात यश येत नाही रोपांची वाढ खुंडते. रोपट्यांवर सूर्यप्रकाश राहील अशी जागा असावी.
  6. जी पिके लवकर काढणीला वा उपयोगाला येतात ती दाट न लावता अंतराने असावीत. अशा पिकांच्या बिया पेरतानाच अंतर ठेवावे.

गृहवाटिकेसाठी खत :-

  1. गृहवाटिका आपण आपल्या परिवारासाठी तयार करतो. यासाठी शेणखत वापरले तर योग्य होईल. तसेच कम्पोस्ट खत गादीवाफ्यांना उपयुक्‍त ठरेल. शेणखत कुजलेले असावे.
  2. कोणतेही खत एकदम शेतात,वाफ्यात टाकू नये. तर ते फोडून मातीसारखे करावे ते मातीत मिळसून शेतात, वाफ्यांत व कुंड्यात टाकावे.
  3. रोपटी उगवल्यानंतर रासायनिक खते योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून रोपांच्या मुळांशी झारीने द्यावीत. हा खुराक रोपवाढीस योग्य होय.

भाजीपाल्याचे बीजारोपण :-

  1. बी-बियाणे उच्च दर्जाचे वा नामवंत कंपन्यांचे असावे. हलक्या जातीचे बीजारोपण केल्यास श्रम वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळ व पैसा व्यर्थ जातो.
  2. बीजोरोपणाची वेळ/काळ योग्य असावी. चुकीच्या वेळी जर पेरणी केली तर गृहवाटिकेचे नुकसान होते. काहीही प्राप्ती होत नाही.
  3. मातीचा प्रकार कोणता हे बीजारोपण करताना लक्षात घ्यावे. अ) माती दाट, वजनदार असेल तर बियाणे वरच्यावर पेरावे. ब) माती हलकी व भुसभुशीत असेल तर बियाणे जरा खोलवर पेरावे.
  4. आपण तयार रोपटी आणून लावा किंवा बी पेरा, ते ओलसर मातीने झाकले गेले पाहिजे.
  5. बियाणे खोलवर पेरल्यास व अधिक बिया एकाच जागी टाकल्यास पीक किंवा भाजीपाला चांगल्या प्रमाणात घेता येत नाही. कारण त्या बियाणांना त्यांच्या वाटणीचा खताचा खुराक योग्य मात्रेत मिळत नाही. सबब उगवलेले रोपटे स्वस्थ व तंदुरुस्त नसते.

 

जेव्हा अंकुर जमिनीवर दिसू लागतील तेव्हा योग्य वाढ झालेले अंकुर तेवढेच ठेवावेत. निर्बल व अशक्‍त अंकुर काढून टाकावेत. या कृतीला विरळणी म्हणतात. गृहवाटिकेत बी-बियाणे पेरतानाच जागेचे योग्य नियोजन करा म्हणजे सर्वत्र दाट भाजीपाला उगवलेला दिसावा. जागा मोकळी राहता कामा नये. भरपूर रोपटी/वेली म्हणजेच उत्पादनही भरपूर.

  • निगराणी :-

  1. पालेभाज्यांच्या शेत जमिनीची नांगरणी फार खोलवर न करता वरचेवर निरंतर झाली पाहिजे.
  2. या वरवरच्या नांगरणीने आपण जमीन भुसभुशीत व थंड ठेवू शकतो.
  3. पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये म्हणून योग्य अशी बांधबंदिस्ती करावा.
  4. आगंतुक तण वाढू देऊ नये. वाळलेले गवत व केरकचरा काढावा.\
  5. चिमण्या कोवळ्या अंकुराचे शेंडे तोडतात, यामुळे रोपांची वाढ खुंटते. याकरिता रोपटी सशक्‍त होईपर्यंत देखभाल महत्त्वाची असते.

छत व कुंड्यातून भाजीपाला लागवड :-

भाजीपाला लावण्यासाठी जागा जमीन नसल्याने कोणीही व्यक्‍ती कुंड्यातून फुलझाडे वा शोभेची झाडे निवडुंग वगैरे लावतात. त्याऐवजी भाजीपाला लावून आपण आपली गरज काही प्रमाणात भागवू शकतो. छतावरही प्लास्टिकचे कापड अंथरून त्यावर माती पसरवून आपण गादी वाफे तयार करू शकतो. अशा वाफ्यातूनही भाजीपाला घेता येतो.

  1. कुंड्या बादलीच्या किंवा वेगवेगळ्या आकारात मिळतात. त्या सहज उचलता येतील व हलवता येतील अशा असाव्यात. मातीच्या कुंड्या यासाठी चांगल्या असतात.
  2. सिमेंटच्या कुंड्याही बाजारात मिळतात.परंतु त्या फार जड नसाव्यात.
  3. मिरची, टोमॅटो, वांगी, वाल, भेंडी यांची रोपटी दीर्षकाळ उत्पादन देत राहतात. यासाठी कुंड्यांचा वापर करावा.
  4. कोथिंबीर, मेथी, पुदिना, शेपू, करडई, पालक यांची लागवड आपण छतावर पसरलेल्या मातीत करू शकतो. यामुळे ताजा भाजीपाला मिळेल. गरज असेल तेव्हा व गरजेपुरताच तो काढता येतो.
  5. छत, सज्जा, कुंड्या यातून भाजीपाला लावता येतो. परंतु ओल होता कामा नये. त्यासाठी

अ) कुंड्यांना वॉर्निश लावा.

ब) पेट्या, पत्र्याचे डबे, प्लॅस्टिकची खोकी यांना हँडल बसवून घ्यावेत म्हणजे सहजपणे उचलता व इकडे-तिकडे नेता/ठेवता येतील.

क) पाणी गरजेपुरतेच वापरा, माती वाहून जाईल असे पाणी देऊ नका.

 

लेखक :-

प्रा. शुभम विजय खंडेझोड

(सहायक प्राध्यापक) उद्यानविद्या विभाग,

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव.

. मेल. shubhamkhandezod4@gmail.com

 

श्री. गजानन शिवाजी मुंडे,

कृषी सहाय्यक, (उद्यानविद्या विभाग)

कृषी महाविद्यालय नागपूर. (डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला)

 ई.मेल.munde007@rediffmail.com

 

प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे

सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती. 

English Summary: Various methods of vegetable cultivation; Learn the benefits of kitchen garden
Published on: 23 October 2020, 05:13 IST