मूग हे खरीप हंगामातील महत्वाचे पीक आहे परंतु गेल्या काही वर्षात मुगाचे बाजारभाव वाढल्यामुळे उन्हाळी मुगही फायद्याचा ठरतो आहे. त्याची लागवड मुख्य पिक किंवा आंतरपीक म्हणुन केली जाते. बहुविध पिकपद्धतीत मूग पिक हे अतिशय उपयुक्त ठरते. सिंचनाची सुविधा असल्यास रब्बी हंगामातील पिकांनंतर मूग हे कमी कालावधीत येणारे फायदेशीर पीक ठरते. भरपूर सुर्यप्रकाश व ऊष्ण हवामानामुळे उन्हाळ्यात मुगाचे चांगले उत्पादन मिळते. त्याचबरोबर उन्हाळ्यात किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते व उत्पादन खर्च कमी होतो.
मूग हे डाळवर्गीय पिक असल्यामुळे त्याच्या मुळांवर लावगडीनंतर १० ते १२ दिवसानी गाठी येतात. या गाठींमध्ये 'रायझोबियम' जीवाणू वातावरणातील नत्र शोषूण स्थिर करतात यालाच नत्र स्थिरीकरण म्हणतात. हे जीवाणू प्रति हेक्टर ४५-६५ किलो नत्र जमीनीत ऊपलब्ध करून देतात व जमीनीचा कस वाढवतात.
मूग हे कमी कालावधीत येणारे पिक असल्यामुळे कमी पाण्यात येते. जमीनीचा पोत सुधारण्यासाठी शेंगा तोडल्यानंतर पीक जमीनीत गाडून हिरवळीच्या पिकांसारखा ऊपयोग करता येतो. तसेच काढणीनंतर खरीप पिकांच्या जमीन मशागतीसाठी योग्य कालावधी भेटतो.
जमीन :
मध्यम ते भारी पण उत्तम निचऱ्याच्या सुपीक जमिनीची निवड करावी. उतारावरील निकस, क्षारयुक्त व पाणथळ जमिनीत मुगाची लागवड करू नये.
हेही वाचा : रब्बी हंगामातील ज्वारी काढणी करताना घ्यावयाची विशेष काळजी; 'या' पद्धतीने काळजी घेणार तर वाढेल उत्पादन
हवामान :
मूग हे पिक उष्ण हवामानात पोषक असते. साधारणपणे २१ ते ३५ अंश से. तापमान असल्यास वाढ जोमदार होते, यापेक्षा जास्त तापमानात ही वाढ चांगली होते. परंतु कडाक्याची थंडी पिकाच्या वाढीसाठी अपायकारक ठरते.
पूर्वमशागत :
रब्बी हंगामातील पिक काढणीनंतर हलकी नांगरणी करून २ वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून पेरणी साठी तयार करावी.
वाण :
पुसा वैशाखी, वैभव, फुले एम. २, एस. ८, बी. एम. २००२- १, बी. एम. २००३- २, बी. एम. ४, पी.डी.एम. १, पुसा ९५३१ आणि उत्कर्षा.
पेरणीची वेळ :
वैशाखी मूगाची पेरणी ही थंडी कमी झाल्यावर करावी. फार उशिरा पेरणी केल्यास पक्वतेच्या वेळी वळवाच्या पाऊसाने नुकसान होऊ शकते. तसेच फुलोरा अवस्थेत जास्त तापमान असल्यास शेंगा लागण्यावर व शेंगा भरण्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून फेब्रुवारी अखेर ते मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान वैशाखी मूगाची पेरणी करावी.
बियाण्याचे प्रमाण व पेरणी अंतर :
हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असेल तरच अपेक्षित उत्पादन मिळते त्यासाठी पेरणीचे अंतर व बियाण्याचे प्रमाण शिफारस केलेल्या प्रमाणातच वापरावे. दोन ओळीमध्ये ३० सें.मी. व दोन रोपामध्ये १० सें.मी. अंतर ठेवून ३ ते ४ सें.मी. खोलीवर ओलाव्यात बी पडेल अश्या पद्धतीने प्रती हेक्टर १२ ते १५ किलो बियाणे वापरून पेरणी करावी.
बीजप्रक्रिया :
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी परणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किंवा थायरम किंवा बावीस्टीन किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या थंड द्रावणात मिसळवून चोळावे व बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणीस वापरावे.
आंतरमशागत :
पिकाच्या जोमदार वाढीसाठी व पिक वाढीसाठी पोषक वातावरणासाठी पेरणीपासून ३० ते ३५ दिवसापर्यंत पिक तणविरहीत ठेवावे त्यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी डवरणी करावी. त्यानंतर गरजेनुसार १० ते १२ दिवसांनी खुरपणी करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन :
कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ५ टन प्रति हेक्टर या प्रमाणात शेत तयार करण्या अगोदर शेतात पसरून द्यावे. पेरणी करताना प्रति हेक्टरी २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे. पिक फुलोऱ्यात असताना २% युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणाची व शेंगा भरण्याच्या अवस्थेत २% डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणाची फवारणी फायदेशीर ठरते.
पाणी व्यवस्थापन :
जमीन ओलवून वाफसा स्थिति आल्यावर पेरणी करावी. वैशाखी मुगास वेळेवर पाणी देणे पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी अतिशय महत्वाचे असते त्यासाठी जमिनीची रानबांधणी व्यवस्थित करून आडवे पाट बनवून घ्यावे. मुग उगवून आल्यानंतर, फूल धारण्याच्या वेळी आणि शेंगा भरण्याच्या वेळी जमिनीत ओलावा असणे फार महत्वाचे असते. जमिनीच्या मगदुराप्रमाने ८ ते १० दिवसांच्या अंतराने चार ते पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचन : पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी तसेच कमी पाण्यात चांगले पिक येण्यासाठी तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचनाद्वारे आवश्यक वेळेला पाहिजे तेव्हडे पाणी पिकाला देता येते. प्रमाणात पाणी दिल्यामुळे मुळकुज सारख्या रोगामुळे होणारे नुकसान टाळून उत्पादनात वाढ होते.
कीड व रोग नियंत्रण :
किडी : वैशाखी मुगावर किडींचा प्रादुर्भाव कमी असाला, तरी तुडतुडे, मावा, पाने खाणारी व शेंगा पोखरणारी अळी दिसून आल्यास नियंत्रणासाठी व्किनॉलफॉस २५ ईसी २ मिली किंवा डायमेथोएट ३० ईसी २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिवळा विषाणू किंवा केवडा : वैशाखी मुगावर मुख्यत: पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगाला केवडा असेही म्हणतात. विषाणूमुळे पानांवर अनियमित आकाराचे पिवळसर चट्टे दिसतात. काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळे होतात त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावून झाडाची वाढ खुंटते. विषाणू शेंगावरही प्रादुर्भाव करतात त्यामुळे शेंगा लहान राहतात आणि पिवळ्या होऊन सुरकुतल्या सारख्या होतात. पांढरी माशी या विषणूचा प्रसार करते. अशी रोगग्रस्त झाडे आढळल्यास लगेच उपटून शेताबाहेर नेऊन जाळून नष्ट करावी. या रोगाच्या नियंत्रणासाठी लक्षणे दिसल्यावर ३०% प्रवाही डायमेथोएट ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टर फवारणी करावी.
भुरी : भुरी हा मुगावरचा महत्वाचा रोग आहे. या रोगामुळे सुरुवातीला झाडाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास सर्व झाड पांढरे होते आणि पाने व फुले गळतात त्यामुळे उत्पन्नात घट होते. लक्षणे दिसताच नियंत्रणासाठी ५०० ग्रॅम कार्बेन्डेझिम किंवा १२५० ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक ५०० लिटर पाण्याची फवारणी करावी.
मुळकुज : मुळकुज या रोगामुळे झाडे पिवळी पडतात, मुळांचा भाग कुजतो आणि झाडे वाळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा थायरम किंवा बावीस्टीन किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाड दिसल्यास झाड उपटून शेताबाहेर नेऊन जाळून नष्ट करावी.
काढणी व मळणी :
वैशाखी मुग ६० ते ६५ दिवसात काढणीस तयार होतो. शेंगा ७० ते ७५% वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या शेंगा तोडाव्या व शेंगा वाळवल्यानंतर मळणी करून घ्यावी. त्यानंतर उफणणी करून धान्य ५ ते ६ दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवून पोत्यात साठवावे. धान्य ओलसर जागेत साठवल्यास किडींचा प्रादुर्भाव होतो.
उत्पादन :
वैशाखी मुगाचे सुधारित पिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी ४ ते ५ व्किंटल उत्पादन मिळते.
लेखक -
शरद जाधव आणि प्रदीप काकडे ( कृषि पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी, व.ना.म.कृ.वि. परभणी )
Published on: 03 February 2022, 10:59 IST