पाण्याशिवाय शेती शक्यच नाही. दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष ही शेती पुढील सगळ्यात मोठी समस्या आहे. आपल्याला माहित आहेच की पेरणीयोग्य पाऊस आला नाही तर पेरणी करता येत नाही.
कधीकधी अगदी कमी पाऊस झाल्यावर सुद्धा धाडसाने काही शेतकरी पेरणी करतात परंतु येणाऱ्या काळात जर पाऊस पडला नाही तर पिकांची वाढ न होता नुकसानच होते व एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रोगांना व किडींना पीक बळी पडते.
त्यामुळे चांगल्या उत्पादन वाढीसाठी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात आणि वेळेवर असणे पिकांसाठी खूप महत्त्वाचे असते. परंतु जर अवर्षण परिस्थितीमध्ये पिकांना पाण्याचा ताण पडला तर विपरीत परिणाम पिकावर होऊ नये यासाठी बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
या सगळ्या उपाययोजनांमध्ये पोटॅशियमचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे. या लेखात आपण पोटॅशियम पिकावरील पाण्याचा ताण निवारण्याचे कार्य कसे करते याबद्दल माहिती घेणार आहोत.
पोटॅशियमचे ताण निवारण्याचे कार्य
1-नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्या जोडीला पोटॅशियमची थोडी वाढीव मात्रा दिली तर पिकाच्या मुळांची वाढ चांगली होते व पाणी शोषण चांगले होते. तसेच पर्णछिद्रे नियंत्रित होतात. त्यामुळे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन शरीरात पाण्याचे संधारण होते.
2- वनस्पती पेशींच्या रिक्तीकेमध्ये पोटॅशियमचे आयन विरघळतात. रिक्तीकेतील पाणी बाहेर जाऊ देत नाहीत. त्यामुळे पेशी फुगलेल्या राहतात व त्यांचे विभाजन व वाढ होत राहते याला ओस्मोरेगुलेशन म्हणतात.
3- पेशीमधील पटल, तंतूकणिका, हरितलवके, रायबोझोम यामध्ये असलेले पटल यावर अनेक एन्झाइम्स कार्यरत असतात. पाण्याचा ताण पडला तर हे पटल फाटतात व एन्झाइम्स नष्ट होतात.
त्यामुळे वनस्पतीमध्ये चयापचय होत नाही परिणामी वाढ खुंटते. परंतु पोट्याशियम च्या वापरामुळे असे सर्व पटल तणाव निर्माण झाला तरी अबाधित राहतात.
पोट्याशियम मुळे साठपेक्षा जास्त एन्झाइम्स कार्यान्वित होतात. चयापचय क्रिया चालू राहते आणि पिकांच्या वाढीची क्रिया देखील चालू राहते.
4- वनस्पतीच्या पानांमध्ये क्लोरोफिल नावाच्या हरितद्रव्य असते. त्यामाध्यमातून वनस्पती सूर्याचा प्रकाश शोषून त्या माध्यमातून लागणारे साखर व अन्न तयार करण्याची अद्भुत शक्ती या क्लोरोफिल मध्ये असते. पोट्याशियम च्या वापरामुळे क्लोरोफिलचे तणावापासून संरक्षण होते.
शरीरातील पाणी बाहेर फेकण्याच्या क्रियेला विरोध झाल्यामुळे कार्बन-डाय-ऑक्साईड सामावून घेऊन प्रकाशसंश्लेषण वाढते व साखर तयार होते.
याचा उपयोग वनस्पतीची खोड, मुळे, फुले आणि पाने तयार करण्यासाठी होतो. पाण्याचा ताण जरी पडला तरी तो एवढा जाणवत नाही व वनस्पतीची वाढ होत राहते.ओस्मो रेगुलेशन मुळे पेशी फुगीर राहतात. पेशींचे विभाजन होऊन पानांची निर्मिती होत राहते.
पाने चांगले लांब व रुंद होतात व पानांच्या माध्यमातून सूर्यप्रकाश व्यवस्थितपणे ग्रहण केला जातो आणि प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते. या सगळ्या क्रियेचा वापर हा अन्नाच्या वाढीसाठी केला जातो.
पानात तयार झालेले अन्न, प्रथिने आणि जमिनीतले शोषण केलेले अन्नद्रव्य वनस्पतीमध्ये सगळीकडे जलद वाहून नेले जाते व याचा परिणाम पाण्याचा ताण जरी पडला तरी वनस्पतीची वाढ चांगली होऊन उत्पादन हाती येते.
त्यामुळे…
पेरणीपूर्वी पिकाला पोटॅशियम युक्त खते आणि पिकांची उगवण झाल्यानंतर वाढीच्या अवस्थेत पोट्याशियम च्या फवारण्या दिल्या तर पिकाची पाणी वापरण्याची कार्यक्षमता वाढीस लागते आणि पाण्याच्या ताणापासून पिकाचे रक्षण होते.
नक्की वाचा:Cotton management: कपाशीवरील लाल्या रोग, जाणून घ्या कारणे आणि त्यावरील सर्वोत्तम उपाय
Published on: 01 July 2022, 02:51 IST