ठिबक सिंचन हे एक प्रभावी तंत्रज्ञान म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. कारण ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा वापर कमी होऊन जास्त फायदा होतो.
१) पाण्याची बचत व पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर –
ठिबक सिंचन पद्धतीत पिकाच्या मुळाना बंद नळ्यामार्फत ( लॅटरल्स ) पाणी दिले जाते. त्यामुळे पाणी वहन अपव्यय टळतो. पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ठराविक मर्यादित क्षेत्रास पाणी दिले जाते. पाणी मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तसेच पाण्याचा कार्यक्षम मुळांच्या खाली जाऊन होणारा नाश टाळला जातो. इत्यादी कारणांमुळे पाण्याची ४० ते ६० टक्के बचत होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.
२) पिकाची उत्पादकता व गुणवत्तेत वाढ –
पिकास वारंवार गरजेनुसार पाणी दिल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात नेहमी ओलावा राहत असल्याने पिकास पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. यामुळे पिकाची जलद व जोमाने वाढ होते, पर्यायाने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. तसेच पिकाच्या उत्पादनाची परत सुधारते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळून आर्थिक फायदा होतो.
३) खतांचा कार्यक्षमरित्या वापर –
ठिबक सिंचनाद्वारे पिकांना योग्य पाण्याची मात्रा व त्यातून योग्य खतांचा पुरवठामुळांच्या कार्यक्षेत्रातच केला जात असल्याने निचऱ्याद्वारे होणारा खतांचा अपव्यय टाळला जातो. पिकांना समप्रमाणात खते देता येतात. त्यामुळे खतांचा वापर कार्यक्षमरित्या व परिणामकारक होतो. पर्यायाने खताच्या मात्रेत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
४) आंतरमशागतीवरील खर्च कमी –
एकूण क्षेत्रापैकी ठराविक क्षेत्र ओळीत केल्याने व इतर भाग कोरडा राहत असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव अतिशय कमी आढळतो. परिणामी आंतरमशागतीवरील खर्चात ३० ते ४० टक्के बचत होऊ शकते.
५) क्षारयुक्त पाण्याचा वापर –
पिसातत्याने योग्य प्रमाणात ओलावा रहात असल्याने मचूळ पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केला असता त्याचा विपरीत परिणाम पिकांवर न होता जमिनीतील असलेले क्षार हे कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रापासून दूर लोटले जातात आणि त्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
६) पिक पक्वतेच्या कालावधीत घट –
ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे आणि खताचे पिकास योग्य नियोजन केल्यास पिके लवकर फुलावर येतात आणि लवकर काढणीस तयार होतात. त्यामुळे पिक पक्वतेचा कालावधी कमी होतो. विशेषतः केळीसारखे पिक पारंपारिक पद्धतीपेक्षा ३० ते ६० दिवस आणि ऊसासारखे पिक ३० ते ४० दिवसांनी लवकर तयार होते.
याव्यतिरिक्त विजेची बचत, जमिनीची कमी धूप, पिकांवरील रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव, मजूर खर्चात बचत इत्यादी फायदे मिळू शकतात.
ठिंबक सिंचन पद्धतीच्या मर्यादा
१) संचावरील मुलभूत खर्च अधिक –
ठिबक संचात विविध घटकांचा उदा : इलेक्ट्रिक मोटार, नियंत्रण यंत्रणा, पाणी वाहून नेणारे पी.व्ही.सी. पाईप्सचे जाळे, उपनळ्या, तोट्या, खत संयंत्र इत्यादी. चा समावेश होतो. त्यामुळे प्रति हेक्टरी एकूण भांडवली खर्च प्रारंभी अधिक असतो.
२) संचाची निगा –
अनेकवेळा मुख्य व उपवाहिनी तसेच उपनळ्या ज्या ठिकाणी जोडल्या जातात तेथे पाण्याच्या जास्त दाबामुळे गळती होते. त्याचप्रमाणे गाळण यंत्रणा सक्षम नसेल तर वारंवार तोट्या बंद पडतात. पाणी क्षारयुक्त असेल, तर उपनळ्या व तोट्या कार्यक्षमतेने कार्य करीत नाहीत. यासाठी संचाची वारंवार निगा ठेवणे आवश्यक असते.
३) उंदीर / खारींचा उपद्रव –
काही भागात उंदरांमुळे अथवा खारींमुळे उपनळ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
४) आधुनिक यंत्राच्या माहितीचा अभाव –
ठिबक सिंचन संच बसविल्यानंतर पिकास तोट्या किती बसवाव्यात, पाण्याची एकूण मात्र किती द्यावी, संच किती वेळ चालवावा, खते कशी द्यावीत, संचाची निगा कशी राखावी याबाबतीत बर्याच वेळा माहिती उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात.
Published on: 19 April 2022, 12:31 IST