हळद एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते . जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी फक्त १५ ते २० टक्के फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर उडिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यासाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे. या पिकाला लागणाऱ्या कीड व वेगवेगळया रोग व त्यांचे नियंत्रणाचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण या लेखातून आपण हळदीवरील कीड आणि रोगांची माहिती घेणार आहोत.
कंदमाशी :-
या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असून माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात . दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. तर अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात .
नियंत्रण :-
कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी क्विनॉलफॉस २५ % प्रवाही २० मी.ली. १० लीटर किंवा डायमेथोएट (३० % प्रवाही) १ मि.ली. प्रती लीटर पाण्यामध्ये मिसळून १ ते २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. अर्धवट कुजले , सडके बियाणे लागवडीस वापरू नये व शेतात उघडे पडलेले गड्ढे मातीने झाकून घ्यावेत. हेक्टरी मातीची अथवा प्लॅस्टिकच्या पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक व १.५ लीटर पाणी मिसळून शेतात ठेवावे . ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.
पाने गुंडाळणारी अळी :-
हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गंडाळून घेते व आत राहुन पाने खाते.
नियंत्रण :-
- किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत.
- कॅर्बोफुरोन ३ % सी.जी. ४० ग्रॅम प्रती १० लीटर किंवा डायमेथोएकट ३० % ई. सी. १५ मि.ली. प्रती लीटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
- गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.
४) खोडकिडा :-
खोडकिडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असून दोन्ही पंखांवर काळ्या रंगांचे ठिपके असतात. अळी लालसर रंगाची असून, अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते. खोडाला छिद्र करुन आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. पानांवर एका ओळीत छिद्र पडलेली दिसतात.
नियंत्रण :-
- प्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत.
- निंबोळी ५ मि.लि. प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
- प्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षित होतात, त्यांना नष्ट करावे .
हुमणी :-
या कीडीची अळी नुकसानकारक असून सुरुवातीचे काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीवीका करते. पुढे मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडल्याचे दिसून येते. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते. रोपे वाळू लागतात. उपटल्यास ती सहज उपटून येतात .
नियंत्रण :-
- हळद लागवडीनंतर हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरपायरीफॉस ४ मि.ली. प्रती लीटर पाणी याप्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.
- आळवणी शक्य नसल्यास जमिनीमध्ये शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
- जैविक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम अनासोप्ली ही परोपजीवी बुरशी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.
रोग नियंत्रण :-
कंदकूज (गड्डे कुजव्या) :-
हळद तसेच कंद वर्गातील पिकांवरील हा एक प्रमुख रोग आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५०% पर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालीपर्यंत वाळले जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी, आंतरमशागत , कंदास ईजा झाल्यास त्यातून पिथियम किंवा फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.
नियंत्रण :-
- या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करताना निरोगी बियाण्यांचा वापर करावा.
- जमीन हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याची निवडावी .
- पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करून घ्यावा.
- मेटॅलॅक्सिल ८ % + मॅकोझेब ६४ % हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रती लीटर किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी .) १ ग्रॅम प्रती लीटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ ग्रॅम प्रती लीटर यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
- शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस पाच किलो प्रती हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावा.
पानावरील ठिपके (लीफ ब्लॉच) :-
हा रोग कोलेटोट्रिकम कॅप्सिसी या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये पानावरती लांब गोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सूर्याकडे धरून पाहल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पुर्णतः वळतो व तांबूस राखी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिसून येते.
नियंत्रण :-
- हवामानाच्या परिस्तिथिनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
- मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा कार्बेनडीझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ३० मिनिटांसाठी बियाणे भिजवून लावावे.
- मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बेनडिझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात काप्पर ऑक्सिक्लोराईड पंधरवड्याच्या अंतरावर २ ते ३ वेळा फवारणी करणे प्रभावी ठरते.
पानावरील ठिपके (टिक्का) :- हा बुरशीजन्य रोग असून टाँफ्रिन मॅक्यूलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आर्द्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानावर होऊन तो वरील पानावर पसरतो. या रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. त्यासाठी लिफ ब्लॉच या रोगासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो.
नियंत्रण :-
- हवामानाच्या परिस्तिथिनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
- मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा कार्बेनडीझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ३० मिनिटांसाठी बियाणे भिजवून लावावे.
- मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कार्बेनडिझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात काप्पर ऑक्सिक्लोराईड पंधरवड्याच्या अंतरावर २ ते ३ वेळा फवारणी करणे प्रभावी ठरते.
लेखक -
1) सहा. प्रा. श्री. रुपेशकुमार ज. चौधरी
(वनस्पती रोगशास्त्र विभाग)
केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय, चामोर्शी, गडचिरोली.
2) श्री. आशिष विजय बिसेन
(वरिष्ठ संशोधन साहाय्यक, कीटकशास्त्र विभाग मो. ९४२३६२८०६४)
भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.
Published on: 02 October 2020, 07:05 IST