आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया करणे होय. यामुळे हळदीला चांगला भाव असूनही शेतकरी या पिकाची लागवड करण्यात धजावत नाहीत. परंतु सध्या हळद पिकामध्ये झालेल्या यांत्रिकीकरणामुळे हळदीखालील क्षेत्रात महाराष्ट्रात वाढ होत आहे.
हवामान:
हळदीचे पिकास साधारणपणे उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. वाढीच्या काळात ३० अंश सेंग्रे व समशितोष्ण हवामान मानवते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जास्त थंड हवामान असल्यास गड्डा चांगला पोसतो. परंतु ११ अंश सेंग्रे तापमान किंवा त्यापेक्षा कमी तापमानात पिकाची वाढ खुंटते. एप्रिल ते मे महिन्यातील ३० ते ३५ अंश सेंग्रे तापमान हळदीच्या उगवणीसाठी अनुकुल असेत तर पीकाच्या वाढीसाठी गरम व दमट हवामान अनुकुल असते. हळदीचे कंद भरण्यासाठी हिवाळी थंड हवा उपयुक्त ठरते. थंडीमुळे पिकाची होणारी कायीक वाढ किंवा पालेवाढ थांबते कंदाची वाढ सुरू होते. कोरडी व थंड हवा कंद पोसण्सास अनुकुल असते.
समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीपर्यंतच्या सर्व प्रदेशात हळद चांगली येवू शकते. महाराष्ट्रात साधारणपणे सर्व भागात हळदीचे पिक चांगले येवू शकते. ज्या भागात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे किंवा ओलीताखालील क्षेत्र जास्त आहे त्या भागात हवेतील दमटपणा थोडा वाढतो व दमटपणा हळद पिकास अनुकूल असाच असतो. हळदीची लागवड जेथे फारशी केली जात नाही तेथे कंदमाशी सारख्या कीडींचा प्रादुर्भाव फारसा आढळत नाही.
जमीन:
पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत किंवा कमी निचऱ्याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड व कमी निचऱ्याच्या व कडक होणाऱ्या जमिनीत हळद चांगली येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात. मध्यम काळी, भुसभुशीत, पीकाचे उत्तम पोषण होईल अशी कसदार गाळाची जमीन निवडावी. अशा जमिनीत हरळी, कुंदा, लव्हाळा यासारखी बहुवर्षिक तणे नसावीत.
हेही वाचा:तूर पिकात या रोगांचा प्रादुर्भाव होतोय का, मग असं करा व्यवस्थापन
रासायनिकदृष्ट्या विम्ल जमिनीत हळदीचे पीक येत नाही. मात्र जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ७ ते ८ असल्यास अशा जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. चुनखडीयुक्त जमिनीतही हळदीचे पीक वाढते परंतु पिकावर सतत पिवळसरपणा राहतो व सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत राहते. जास्त पावसाच्या भागातील तांबड्या जमिनी हळदीसाठी चांगल्या असतात. कारण त्या मऊ, भुसभुशीत व निचऱ्याच्या असतात. अशा जमिनीत पाणी व खत व्यवस्थापन चांगले होणे आवश्यक असते. भारी काळ्या जमिनीची पाणीधारणशक्ती जास्त असून निचराशक्ती अगदीच कमी असते. त्यामुळे हळदीचे पीक त्यामध्ये चांगले येत नाही.
पीकाची फेरपालट:
एकाच जमिनीत हळदीचे पिकानंतर त्यावर हळद लागवड टाळावी. कारण हळदीचे पीकावर पडलेल्या रोगांची बीजे व कीडींचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे दुस-या वर्षी तेथील हळद पिकावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. म्हणून हळदीच्या पिकानंतर कांदा, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ऊस यासारखी पिके घ्यावीत. टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा या पिकानंतर हळद लागवड करू नये. कारण या पीकांवर येणारे सर्व जमिनीतून उद्भवणारे रोग हळद पिकावर येतात.
पूर्व मशागत:
पुर्वीचे पीक काढल्यानंतर हळदीच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची १८ ते २२ सेंमी खोल नांगरणी करानी. पहिली नांगरणी मार्चच्या मध्यात किंवा त्या अगोदर करावी व त्यानंतर १५ दिवसांनी जमीन चांगली तापल्यानंतर दुसरी नांगरणी पहिल्या नांगरणीच्या आडवी करावी व वखराच्या पाळ्या देवून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी एकरी २० ते ३० बैलगाडी किंवा १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट टाकावे. जमिनीत बारमाही तणे जसे हरळी, लव्हाळा इ. असल्यास ती वखरणीसोबतच वेचून घ्यावीत.
लागवडीची वेळ:
साधारणपणे हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जून महिन्याचे मध्यापर्यंत केली जाते. मे-जून मध्ये लागवड केलेले हळदीचे पीक जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत काढणीस तयार होते. हळद लागवड १५ जून पेक्षा उशीरा झाल्यास उत्पादनात घट येते.
लागवड:
सरी वरंबा पद्धत: ही एक पारंपारिक लागवड पद्धत आहे. यामध्ये सर्वप्रथम ७५ ते ९० सेंमी अंतरावर स-या पाडाव्यात. त्यानंतर रानबांधणी करून ४.५ ते ६ मीटर लांब असे वाफे बांधून घ्यावेत. वरंब्यावर अर्ध्या उंचीवर दोन्ही बाजूस ३० सेंमी अंतरावर खुरप्याने ८ ते १० सेंमी खोल खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात एक जेठा गड्डा ठेवून मातीने झाकून घ्यावा. एकरी ९ ते १० क्विंटल बेणे लागवडीसाठी लागते.
गादीवाफे किंवा बेड पद्धत: गादीवाफे किंवा बेड पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते हे अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. यासाठी ९० सेंमीचा माथा असलेले व ३० सेंमी उंचीचे बेड किंवा गादीवाफे तयार करावेत. बेडचा पाया १२० सेंमी आणी मधली नाली ३० सेंमी ठेवल्यास १५० सेंमी अंतरावरील ड्रिपलाईनचा वापर करणे योग्य होईल. हे अंतर जास्तीत जास्त १८० सेंमीपर्यंत ठेवता येईल. यासाठी मधली नाली ६० सेंमी ठेवावी लागेल. गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत सेंद्रिय खते टाकणे आवश्यक आहे. बेड तयार करतांना सर्व सेंद्रिय खते आपोआप बेडवर येतील. बेडवर तिफणीच्या सहाय्याने दिलेली रासायनिक खतांची मात्रा पेरून द्यावी. खते पेरतांना आपोआप बेडवर ३ ते ४ इंच खोलीच्या नाल्या पडतील. दोन ओळींतील अंतर ३० ते ४५ सेंमीपेक्षा जास्त नसेल याची काळजी घ्यावी. पाडलेल्या दोन ओळींमध्ये ३० सेंमी अंतरावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस बेणे लावावे. यासाठी संपूर्ण रासायनिक खताची पेरणी पूर्ण होताच लॅटरल बेडवर आंथरून घ्यावी. प्रत्येक १० फूट अंतरावर “U” क्लिपच्या सहाय्याने लॅटरल एका ओळीत राहील व ती हालणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी संपूर्ण बेड भिजेल या पद्धतीने भरपूर पाणी द्यावे. वाफसा होताच लागवडीस सुरूवात करावी. बेणे जास्त उथळ लावू नये. त्यामुळे फक्त वरची कायीक वाढ होते व कंद लागण्यात अडचणी निर्माण होतात. कंद किंवा बेणे लागवड केल्यानंतर सुरूवातीचे १५ ते २० दिवस दररोज थोडे थोडे पाणी द्यावे म्हणजे उगवण लागली होण्यास मदत होईल.
लागवडीनंतर दुसरे दिवशी अट्रॅझीन किंवा आट्राटाफ २० ग्रॅम/१० लिटर पाणी घेवून संपूर्ण जमिनीवर फवारून घ्यावे. फवारतांना मागे मागे चालावे. फवारलेल्या क्षेत्रावर पाय देवू नये. एकरी कमीत कमी २०० लिटर पाणी फवारणीसाठी वापरावे. शेतात हरळी, लव्हाळा यासारखी तणे असल्यास लागवडीपासून १० ते १२ दिवसांनी ग्लायफोसेट १०० मिली/१० लिटर पाणी या प्रमाणात संपूर्ण क्षेत्रावर फवारावे. यावेळी हळदीची उगवण झालेली नसेल याची दक्षता घ्यावी.
हळदीचे प्रकार व जाती:
खाण्याची हळद: ही हळद बहुवार्षीक असून ६० ते ९० सेंमी वाढते. पानांना खमंग वास येतो. तुपाचा खवट वास घालवण्यासाठी ह्यांची पाने वापरतात. फळ तीनधारी बोंडे असते. कंद अखूड व जाड असतात. पाने पातळ व ६० ते ९० सेंमी लांब असतात. कंदापासून पोपटी हिरव्या रंगाची ६ ते १० पाने वाढतात. फुलांचा रंग पिवळसर पांढरा असतो. लागवडीच्या पीकात फळे धरत नाहीत कारण ती नंपुसक असतात. ह्या प्रकारची लागवड भारतात ९६.४ टक्के आहे.
कस्तुरी किंवा रान हळद: ह्या हळदीचे कंद वरून फिकट पिवळ्या रंगाचे व आतून नारिंगी लाल रंगाचे असून त्याचा कापरासारखा वास येतो. कंद मोठे व गोलाकार असतात. प्रक्रिया केलेल्या हळकुंडाला गोड वास येतो. त्यामध्ये ६ टक्के तेल असते. तेलास हिरवट तपकिरी रंग असतो व त्याचा कापरासारखा वास येतो. ही हळकुडे खाण्यास वापरत नाहीत. त्याचे इतर औद्योगीक उपयोग आहेत. ह्या हळदीचा उपयोग औषधासाठी करतात.
आंबे हळद: ह्या हळदीच्या कंदाचा वास कच्च्या अंब्यासारखा असतो. कंद बारीक असून आतील गर पांढरा असतो. ही हळद बहुवार्षिक असून पाने लंबवर्तुळाकार, अद्रकीसारखी असून पानाचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट पांढरी असतात. बोंडे तीनधारी असते. अंबेहळद अनेक उपयोगी आहे. चामडी मऊ होण्यासाठी अंगाला चोळतात, मुरगळल्यावर व सुजेवर उगाळून लावतात. चामडीची खाज घालवते. थंड, पाचक व रक्तवर्धक म्हणून याचा वापर होतो. ही जंतूनाशक म्हणूनही उपयुक्त आहे.
काळी हळद: बंगालमध्ये ह्या हळदीची लागवड करतात. ताजे कंद फिकट पिवळ्या रंगाचे असून ते सुवासिक असतात व त्याचा उपयोग सौंदर्य प्रसाधनासाठी करतात. कंदात ९.७६% तेल असते.
कचोरी हळद: कोकणात सर्वत्र आढळते. ही हळद वार्षीक पीक असून औषधीकरिता वापरतात. त्वचेचा कंड कमी करण्यासाठी कचोरी हळद वाटून अंगाला लावतात. ताजे मुळ व गड्डे रक्त शुद्धीकरिता वापरतात. घसा साफ करण्याकरिता गवई सुवासिक उत्तेजक मुळ तोंडात धरतात. पानाचा रस महारोगावर वापरतात.
हेही वाचा:हायड्रोपोनिक्स तंत्र नेमके काय आहे; करा पाण्याविना भाजीपाला शेती
खाण्याच्या हळदीच्या व्यापारीदृष्ट्या जाती व त्यांची वैशिष्ठ्ये:
सेलम: सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात ही जात घेण्यास सुरूवात झाली आहे. या हळदीची पाने रूंद असून हळकुंडाची कातडी पातळ व गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो. कच्च्या हळदीचे उत्पादन १४० ते १६० क्विंटल प्रती एकरी येते. वाळलेल्या हळकुंडाचे उत्पादन २५ ते ३५ क्विंटल येते. हळद पक्व होण्यास साडेआठ ते नऊ महिने लागतात. ही जात करपा रोगास बळी पडते. झाडांची उंची कडप्पा जातीपेक्षा कमी आहे.
कडाप्पा किंवा टेकुरपेटा: या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा फिकट पिवळा असतो. पानांचाही रंग फिकट असतो. पाने रूंद व सपाट असतात. एकुण १० ते १२ पाने असतात. या जातीस फुले क्वचीतच येतात. करपा रोगास ही जात कमी बळी पडते. या जातीचे कच्च्या हळदीचे एकरी १५० ते १६० क्विंटर व वाळलेल्या हळदीचे २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते.
राजापूरी: ह्या जातीची पाने रूंद, फिकट हिरवी व सपाट असतात. एकून १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंड व उपहळकुंड आखुड, जाड व रसरशीत असतात. हळकुंडाची कातडी पातळ असून गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. ही जात करपा रोगास बळी पडते. हळद पक्व होण्यास ८ ते ९ महिने लागतात.
वायगांव हळद: या जातीस ८ ते १० पाने येतात व ती गर्द हिरवी व चकाकणारी असतात. ही जात ७ ते ८ महिन्यांत तयार होते. या जातीवर जवळ जवळ ९०% झाडांना फुले येतात. पानांना तीव्र सुवास असतो. या जातीचा उतारा २० ते २२% असतो. हळकुंड रताळ्यासारखी लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा पिवळा असतो. जा जातीच्या कच्च्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे उत्पादन १२ ते १५ क्विंटल एकरी मिळते. ही जात करपा रोगास कमी बळी पडते.
कृष्णा: हळद संशोधन केंद्र, दिग्रस येथुन कडाप्पा जातीपासून निवड पद्धतीने कृष्णा ही जात शोधून काढली असून शेतक-यांना लागवडीसाठी प्रसारित केलेली आहे. या जातीचे सर्व गुणधर्म कडाप्पा जातीसारखेच असून वाळलेल्या हळदीचे उत्पन्न प्रती एकरी ३० ते ३५ क्विंटल येते. ही जात करपा रोगास कमी बळी पडते.
फुले स्वरूप: ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. या जातीचे जेठे गड्डे मध्यम आकाराचे असून वजनाचे ५० ते ५५ ग्रॅम असतात. हळकुंडे ३५ ते ४० ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात ७ ते ८ हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं./हे. दिल्याचे दिसून आले असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विं./हे. हिल्याची नोंद आहे. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.
पोट्यँगी: ओरिसा येथे हळदीची पीसीटी-१९ ही जात शोधली आहे. तामिळनाडू कृषी विद्यापीठाने हळदीच्या दोन जाती एसीसी-३६० या जातीपासून ताज्या गड्ड्याचे प्रती एकरी १४० क्विंटल उत्पन्न २०० दिवसात मिळते. वाळलेल्या हळकुंडाचा उतारा १९% आहे व कुरकुमीनचे प्रमाण ७.२% आहे.
एसीसी-३६१ या जातीपासून ताज्या गाठीचे प्रती एकरी उत्पन्न १४५ क्विंटल १९८ दिवसात मिळते. वाळलेल्या हळकुंडाचा उतारा १८% आहे व कुरकुमीनचे प्रमाण ७.०% आहे. हळदीच्या पीसीटी-१०, पीसीटी-१३ व पीसीटी-१४ या जाती गाठे सडणे या रोगाला प्रतिरोधक आहेत. या जातींपासून एकरी १२० क्विंटलपर्यंत कच्ची हळद मिळते.
प्रभा: ही हळदीची नवीन जात भारतीय मसाले संशोधन संस्था, कालिकत (केरळ) येथे निवड पद्धतीने शोधली आहे. या जातीचे १९५ दिवसांत एकरी १५० क्विंटल ताज्या हळदीचे उत्पादन मिळते. या जातीच्या गाठ्यांत ६.६२% कुरकुमीन, १५% ओलिओरझीन, ६.५% सुगंधी तेल आणि ताज्या गाठ्यांपासून १९.५% वाळलेली हळकुंड मिळतात.
प्रतिभा: या हळदीच्या जातीपासून १८८ दिवसांत १६० क्विंटल उत्पन्न मिळते. हळदीचे गाठ्यांत ६.२% कुरकुमीन, १६.२% ओलिओरझीन आणि ६.२% सुगंधी तेल असते.
बेणे निवड व हेक्टरी बेणे:
बेणे म्हणून निवड केलेल्या अंगठा किंवा जेठा गड्ड्याचे वजन ३० ते ३५ ग्रॅम असावे. याशिवाय लेकुरवाळ्या कंदाचासुद्धा एक डोळा काढून लावता येतो. सर्वसाधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी ९ ते १० क्विंटल अंगठा गड्डे लागवडीसाठी लागतात. एवढा मोठा खर्च होवू नये व कमी बेणे लागवडीसाठी घेता यावेत म्हणून हळदीचे कोणतेही डोळे असणाऱ्या कंदांची म्हणजे मातृकंद, जेठा गड्डा, अंगठा गड्डा, उपहळकुंड, लेकुरवाळे कंद इ.ची लागवड केल्यास उत्पादन मिळते.
हेही वाचा:वाचा ! पिकांमध्ये झिंकचे काय असतं कार्य
लेकुरवाळ्या कंदापासून लावलेल्या हळदीपासून आपल्या शेतात पुढीलवर्षाकरिता बेणे मिळविता येतात. लेकुरवाळ्या हळदीपासून सर्वसाधारण उत्पादन दर चौरस फुटास एक ते दीड किलो मिळते. हे उत्पन्न जरी कमी असले तरी बेणे जास्त वाढवून घेतल्याने बाहेरून बेणे विकत आणण्याची गरज पडत नाही. अंगठा गड्ड्यापासून दर चौरस फूटाप्रमाणे दोन त अडीच किलो ओले बेणे मिळते व याच कंदापासून आलेल्या लेकुरवाळ्या, उपहळकुंज, सोरा गड्डा इ. मजबुत व टणक भरलेले दिसून येतात. परंतु लेकुरवाळ्या कंदाच्या बेण्यापासून लावलेल्या हळदी पिकाला येणारे लेकुरवाळे कंद व इतर कंद पाहिजे तसे टणक बनत नाहीत. म्हणून हळद कंद चांगली भरावीत व पावडर करण्यास उपयोगी पडावीत म्हणून पूर्ण सुकून गेल्यानंतर एक महिन्यांनंतर हळद काढावी.
नविन लागवडीकरिता अंगठा गड्ड्यापेक्षा जेठा गड्डेच लावणे जास्त फायदेशिर असते. जेठे गड्डे तंतुमय असतात परंतु त्याची उगवण चांगली होते. हे गड्डे निरोगी, न सडलेले, मोठ्या आकाराचे व ज्यावर २-३ डोळे असलेले निवडावेत. लागवडीसाठी वापरलेल्या गड्ड्यांना मुळ्या नसतात. मोड किंवा कोंब असावेत व अशाच गड्ड्यांची उगवण चांगली होते.
बेणे निवडतांना चांगले वाढलेले व रोगमुक्त असे गड्डे, अंगठा गड्डे व लेकुरवाळे कंद इ. निवड करावी. लेकुरवाळे कंद सर्वसाधारणपणे ५ ते १० ग्रॅम वजनाचे घ्यावेत. मातृकंदाची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होते. ५ ते १० ग्रॅम वजनाचे लेकुरवाळ्या कंदास दोन ते तीनच फुटी येतात. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. तसेच लेकुरवाळ्या कंदास पहिले पान आल्यावर त्या ठिकाणावरून कंद व पाने वेगवेगळी करून जमिनीत लागवड केल्यास कंदापासून हळद मिळवता येते व बेणे खर्चही कमी लागतो.
हळदीच्या सुधारित जातीचे बेणे मिळण्याचे ठिकाण:
- ट्युबर क्रॉप रिसर्च स्टेशन, अंबाल नियाल, त्रिवेंद्रम, केरळ
- कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, कोईमतुर
- कॉलेज ऑफ अँग्रिकल्चर, त्रिवेंद्रम, केरळ
- दि डायरेक्टर, डायरेक्टोरेट ऑफ कोको, अरेकानट अँड स्पाईसेस डेव्हलपमेंट, कालिकत-६७३००५
- सीपीपीआर आयत्र रिजनल स्टेशन, कालिकत
- वायगाव हळदीचे उत्तम बियाणे वायगांव जि. चंद्रपुर व तासगांव जि. सांगली येथे मिळते.
चांगले बेणे फेब्रुवारी-मार्चमध्येच मिळते. यासाठी जवळचे हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांशी वेळेपूर्वी संपर्क साधावा.
हळदीचा जीवनक्रम:
हळदीची लागवड केल्यानंतर २५ ते ३० दिवसांपर्यंत उगवण होत राहते. बालपण दोन महिन्याचे असते. पहिले पान १० दिवसांनी निघते व दुसरे पान १० ते १५ दिवसांत पूर्ण होते. कंदातील अन्नघटकांवर सुरूवातीस हळदीचे रोप जगत असते. त्यानंतर जेंव्हा साल सुटते तेंव्हा हळदीच्या पीकास बाहेरून अन्नपुरवठा सुरू होतो. अशावेळी तीच्या पानांतील वाढ पटीत असणे अवश्यक आहे. म्हणून २ ते ४ पानांवरच हळदीचे बालपण संपते. कंदातून हळदीचे पिकास १० पाने तयार होईपर्यंत अन्नपुरवठा होत असतो. लावलेल्या कंदाच्या ठिकाणावरून जमिनीच्या खालच्या भागातून एक ते दीड महिन्यांनी फुटवे येण्यास सुरूवात होते. नंतर १० ते १२ दिवसांत दुसरी फूट येते. अशा १० ते १२ फूटी आल्याच पाहिजेत. त्यामुळे जमिनीतील वाढणाऱ्या कंदामध्ये वाढ होत जाते. सुरूवातीच्या काळात झाडांची उंची ३५ ते ३७.५ सेंमी पर्यंत असते व नंतर ९० ते १२० सेंमी पर्यंत वाढत जाते. सर्वसाधारण पानांची लांबी ५५ सेंमी व रूंदी १७ सेंमी असते व देठाची लांबी ३० सेंमी व घेर ४ सेंमी असतो. लागवडीनंतर ६ ते ७ महिन्यांनी हळदीला फूलांचे कोंब येवू लागतात. ८ ते ९ महिन्यात हळदीची पाने पिवळी पडल्यानंतर पीक काढणीस तयार होते.
खत व्यवस्थापन:
सेंद्रिय खतांमध्ये कोंबडीखत, गांडुळखत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लागवडीच्यावेळी आणि मोठ्या खांदणीचेवेळी ही खते द्यावीत. मोठ्या खांदणीचेवेळी कोंबडीखतांचा वापर केल्यास कंद पोसण्यास मदत होते व उत्पादन वाढते असे दिसून आलेले आहे. एकरी १० टन शेणखत किंवा २ टन गांडुळखत किंवा कोंबडीखतामध्ये २०० किलो सुपर फॉस्फेट मिसळून बेडच्या मातीत मिसळले जाईल हे पहावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडल्यास उत्तमच.
रासायनिक खतांमध्ये एकरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ६० किलो पालाशची शिफारस आहे. यामध्ये गंधक आणि सुक्ष्मअन्नद्रव्ये गरजेप्रमाणे देणे आवश्यक आहे. लागवडीपुर्वी बेडवर दुफणीच्या सहाय्याने एकरी १०० किलो डिएपी + १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश + १०० किलो निंबोळी पेंड + २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट + १० किलो बेनसल्फ (सल्फर) + १० किलो सुक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण एकत्र मिसळू पेरून द्यावीत. दुफणीने खत पेरतांना पडणा-या रेषा या खोल पडतील याची दक्षता घ्यावी. कारण याच नालीमध्ये कंदांची लागवड करावयाची आहे.
लागवडीनंतर ४५ दिवसांनी नर्मदा कॅन (कॅल्शियम अमोनियम नायट्रेट) एकरी १०० किलो द्यावे. मोठ्या बांधणीच्यावेळी एकरी ५० किलो डिएपी, ५० किलो अमोनियम सल्फेट, ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश, १०० किलो निंबोळी पेंड, २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट, १० किलो सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण दोन ओळींच्यामध्ये देवून ते मातीने झाकावे. पीकाचे वय १५० ते १६० दिवस असतांना मोठी बांधणी करावी. आवश्यकता वाटल्यास यानंतर खतांचा वापर हा फवारणीतून करावा.
ड्रिप किंवा ठिबक सिंचनातून खते देतांना बेसल डोस अगोदर द्यावा. लागवडीपासून २५ दिवसांनी फर्टिगेशनला सुरूवात करावी. ठिबकद्वारे खतांच्या मात्रा खालील प्रमाणे आहेत.
- उगवणीनंतर १०० दिवसांपर्यंत दररोजः- नत्र- ८०० ग्रॅम + स्फुरद ५० ग्रॅम + पालाश ८०० ग्रॅम. (लागवडीपासून २५ दिवस ते १०० दिवस).
- १०० दिवस ते १५० दिवसांपर्यंत दररोजः- नत्र- ८०० ग्रॅम + स्फुरद २५ ग्रॅम + पालाश १२०० ग्रॅम. या प्रमाणे १५० दिवसांत खते देणे पूर्ण करावे.
फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खते:
लागवडीपासून दिवस |
एकूण दिवस |
खताचे नाव |
लागणारे प्रमाण किलो/एकर |
एकूण खत किलो/एकर |
२५-४० |
१५ |
अमोनियम सल्फेट |
३.५०० |
५२.५० |
|
|
१२:६१:०/ फॉस्फोरिक अँसिड |
१.००० |
१५.०० |
|
|
म्युरेट ऑफ पोटॅश |
१.३०० |
१९.५० |
४०-१०० |
६० |
युरिया |
१.७५० |
१०५.०० |
|
|
१२:६१:०/ फॉस्फोरिक अँसिड |
१.००० |
६०.०० |
|
|
म्युरेट ऑफ पोटॅश |
१.३०० |
७८.०० |
१००-१५० |
५० |
युरिया |
१.७५० |
८७.५० |
|
|
१२:६१:०/ फॉस्फोरिक अँसिड |
०.५०० |
२५.०० |
|
|
म्युरेट ऑफ पोटॅश |
२.००० |
१००.०० |
दर आठवड्यातून एकदा ५ किलो मॅग्नेशियम सल्फेट १० आठवड्यांपर्यंत द्यावे. तसेच आठवड्यातून एकदा एकरी २ किलो सुक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण १० आठवड्यापर्यंत द्यावे. फक्त पांढरा पोटॅश ड्रिपमधून देण्यासाठी वापरावा.
बेणे प्रक्रिया:
बेणे निवडून स्वच्छ केल्यानंतर १०० लिटर पाण्यात २५० मिली डायमिथोएट + कार्बेन्डॅझीम १०० ग्रॅम मिसळून तयार केलेल्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावे. यानंतर ५० लिटर पाण्यात अझॅटोबॅक्टर जीवाणूखत २ किलो + पीएसबी जीवाणूखत २ किलो + ताजे शेण ५ किलो किंवा दुध १ लिटर एकत्र द्रावण तयार करून यामध्ये बेणे १५ ते २० मिनिटे बुडवून नंतरच बेणे लागवड करावी. काही कारणांनी बेणे लागवडीच्यावेळी जीवाणू खतांची उपलब्धता न झाल्यास ती पुढे शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून मुळांच्या कक्षेत द्यावीत. शक्यतो जीवाणू खते बियाणास लावणे योग्य असते.
हळदीच्या बियाणास जीवाणूखते लावतांना घ्यावयाची दक्षता:
- जीवाणूखते विकत आणल्यानंतर ती सर्व पाकिटे सावलीत व थंड ठिकाणी ठेवावीत. तसेच सूर्यप्रकाश व उष्णता यापासून संरक्षण करावे अन्यथा त्यातील जीवाणूं मरतात.
- जीवाणू खते ही रासायनिक खते नव्हेत हे लक्षात ठेवून इतर रासायनिक खतांसोबत किंवा रासायनिक कीटकनाशकांसोबत मिसळून वापरू नयेत.
- हळदीच्या बेण्यास कीटकनाशक/बुरशीनाशक लावावयाचे असल्यास प्रथम त्याची प्रक्रिया करावी व नंतरच जीवाणू खतांची प्रक्रिया करावी.
- ही खते वापरतांना त्यावर लिहिलेल्या अंतिम तारखेपूर्वीच वापरावीत.
- जीवाणू खतांची प्रक्रिया केलेले बियाणे वाळवू नये. प्रक्रिया होताच एका तासाचे आत ती लावून घ्यावीत.
आंतरमशागत:
हळदीचे कोंब उगवणीच्या काळात तणे वाढु देवू नयेत. अन्यथा हळदीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून तणे काढावीत. एक ते दीड महिन्यांनी रासायनिक खतांची दुसरी मात्रा देतानांच झाडाचे बाजूस हलकी कुदळणी करून पीकाला मातीची भर द्यावी. यालाच उटाळणी असेही म्हणतात. यामुळे तंतुमुळे तुटून नवीन फूट येण्यास मदत होते. तसेच गड्ड्यांच्या भोवतालची माती भुसभुशीत झाल्याने कंदाची वाढ चांगली होते. ज्या ठिकाणी कठीण किंवा कडक जमीन झाली असेल त्या ठिकाणी झाडांची वाढ होत नाही व कंद पोसत नाहीत.
आच्छादन:
वरील उद्देश साध्य करण्यासाठी हळदीचे पीकांत हिरव्या ओल्या पाल्याचे, गवताचे किंवा सागाच्या पानांचे आच्छादन करून घेतल्यास वरील उद्देश साध्य होतात व पुढे हाच पालापाचोळा कुजून सेंद्रिय खतासारखा फायदा होतो. या आच्छादनामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या उन्हात आजूबाजूचा भाग तापून कोवळ्या फूटव्यांना तडाखा बसत नाही व तणही वाढत नाही. म्हणून आच्छादन करणे आवश्यक आहे.
हळद फुले काढणे व आंतरपीक:
हळदीचे पीकास लागवडीपासून ६ ते ७ महिन्यांनी जातीनुसार फुले येतात. या फुलास पाकळ्या असतात पण बियाणे येत नाही. फुले आल्यानंतर ८ ते १० दिवसांनी ती फुले काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. या फुलांमुळे कंदाचे वजन कमी होते. हळदीचे पिकास सावली मानवते म्हणून महाराष्ट्रात व आंध्रप्रदेशात हळदीमध्ये अनेक आंतरपिके घेतात. हळदीचे पीक ८.५ ते ९ महिन्यांचे आहे व म्हणून सुरूवातील त्या पिकाची वाढ हळू हळू होते. त्याचा फायदा हळदीच्या पिकात मका, मिरची, भेंडी ही आंतरपीके घेण्यासाठी घेतात. तेलंगणात हळदीमध्ये मक्याचे आंतरपीक घेतल्याने जादा उत्पन्न तर मिळते पण चार महिन्यांपर्यंत मक्याच्या आंतरपीकामुळे हळदीच्या पीकावर पानावरील ठिपक्यांचा रोग येत असल्याचे आढळले आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हळद व मका ह्या दोन्ही पीकांची एकाच वेळी लागवड करतात. हळदीचे बेणे ३० सेंमी बाय १५ सेंमी अंतरावर लावतात व दुसऱ्या सरीमध्ये मक्याचे बी टोकून लावतात. मात्र दोन ओळीत दोन फूट ते तीन फूट अंतर ठेवतात. म्हणजेच हळदीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीत मक्याचे बी पेरतात. या दोन्ही पिकात स्पर्धा फारच कमी असते, त्यामुळे ही दोन्ही पीके चांगली येतात. हळद पिकामध्ये आंतरपीके घेतांना तीन पद्धतींचा अवलंब होतो.
- जोड ओळ पद्धत: या पद्धतीत हळदीच्या पीकाच्या दोन ओळींमधील नेहमीचे अंतर कमी करून पुढील दोन ओळींतील अंतर वाढवितात. हळदीच्या गड्ड्याना प्रत्यक्षात वाढीसाठी लागणा-या जागेपेक्षा पुष्कळ जागा शिल्लक राहू नये म्हणून पानांची फारशी दाटी होणार नाही अशी दक्षता घेवून हळदीच्या पीकांना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी पर्यंत कमी करता येईल.
- सोड ओळ पद्धत: या पद्धतीत मुख्य पीकाची पेरणी नेहमीच्या अंतरावर करतात. परंतु प्रत्येक दोन ओळींनंतर एक ओळ पेरत नाहीत व त्या कमी झालेल्या ओळीतील रोपे राहिलेल्या दोन ओळींच्या जागेमध्ये लावतात व सोडलेल्या ओळीत आंतरपीक घेतात.
- रूंद पेरा पद्धत: या पद्धतीत पीकाच्या दोन ओळीतील अंतर नेहमीच्या दुप्पट ठेवतात व कमी झालेल्या ओळीतील रोपे उरलेल्या ओळीमधील जागेत पेरतात.
काढणी :
हळदीचे पीक नऊ-साडेनऊ महिन्यांचे झाले म्हणजे पीक काढणीस तयार होते. त्यावेळी हळदीची पाने पिवळी पडून वाळण्यास सुरूवात होते व जमिनीवर पडू लागतात. त्याचवेळी वरचे पाणी देणे बंद करावे. नंतर मजूरांकडून पाने कापून घ्यावीत व कुदळीने खोदून किंवा नांगरून कंद काढणी केली जाते. गड्ड्यांना इजा दोणार नाही याची काळजी यावेळी घ्यावी. जेठे गड्डे वेगळे काढून पुढच्या हंगामासाठी लागवडीसाठी साठवून ठेवावे व इतर हळकुंडे पुढच्या शिजवण्याच्या प्रक्रियेत वापरावीत. हळदीचे प्रत्येक झाडास कमीत कमी १५ ते २० कन्याकंद असतात. मातृकंद व कन्याकंदाचे प्रमाण १:५ असते.
जेठे गड्डे साठविणे:
हळदीची काढणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान होते व हळद पिकाची नवीन लागवड एप्रिल, मे ते जून महिन्याचे दरम्यान होते. दरम्यानच्या काळात हळदीचे बेणे साठविणे आवश्यक असते. त्यासाठी हळद काढणीनंतर चांगले निघालेले, निरोगी जेठे गड्डे जमिनीतील खड्ड्यात साठविणे सोयीस्कर ठरते.
राहुरी कृषी विद्यापीठाने केलेल्या प्रयोगावरून असे आढळून आले आहे की, बेणे चर किंवा खड्डा खोदून त्यात साठविले असता त्यांची उगवणक्षमता चांगली राहते. सावलीत आवश्यक तेवढ्या लांबी-रूंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा खणावा. खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा किंवा वाळलेले गवत लावावे व वरील प्रमाणे प्रक्रिया केलेले बेणे अशा खड्ड्यात भरावे. त्यावर गवत अथवा पालापाचोळा टाकून खड्डा झाकावा. खड्ड्याचे तोंडावर फळीचे झाकण घालावे व हवेसाठी छिद्र ठेवावे. अशा प्रकारे साठविलेले बेण्याची उत्पादन क्षमता चांगली टिकून राहते व त्यापासून उत्पन्नही चांगले येते. कृषी विद्यापीठात हळदीचे बेणे साठविण्यासाठी केलेल्या प्रयोगात खड्ड्यात साठविलेल्या बेण्यापासून लागवड उशिरा केली तरी उत्पादन इतर पद्धतींपेक्षा अधिक मिळते असे आढळून आले आहे.
रोग आणि कीड व्यवस्थापन:
पानांवरील ठिपके: हा रोग दोन प्रकारच्या बुरशींमुळे होतो. १. कोलॅटोट्रीकम कॅपसीसी व २. टॅफरीन मॅक्युलन्स. पहिल्या प्रकारच्या बुरशीमुळे ठिपक्यांचे आकार लंब गोलाकार असून वेगवेगळ्या आकाराचे दिसून येतात. ठिपक्यांचा मध्यभाग पांढरट जांभळ्या रंगाचा असून कडेने विटकरी रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून वाढत जावून संपूर्ण पान वाळून जाते. दुस-या प्रकारात पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान, गोलाकार किंवा ता-यांसारखे लाल ठिपके तयार होतात. ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशीची काळी वर्तुळाकार फळे रचल्यासारखी दिसतात. नंतरच्या काळात ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी कडा तयार होते. असंख्य ठिपके तयार होत असल्यामुळे संपूर्ण पान लाल रंगाचे होवून वाळून जाते.
या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट पाने, फुले याद्वारे होत असल्यामुळे रोगट पाने व फुले नष्ट करावीत. लावणीपूर्वी व साठवणुकीपूर्वी डायथेन एम-४५ या बुरशीनाशकाचे ०.३% किंवा कार्बेन्डॅझीम ०.१% यांचे द्रावणात बेणे कमीत कमी २५ ते ३० मिनिटे बुडवावीत. पीकावर रोग आढळताच ०.२५% कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा १% बोर्डोमिश्रण फवारावे.
हळदीचे कंद नासणे: मुळकुजव्या व खोडकुजव्या ह्या नावांनी हा रोग ओळखला जातो. या रोगामुळे हळदीचे जमिनीतील कंद मऊ बनतात. त्यांना पाणी सुटून ते कुजतात व झाडांची पाने पिवळी पडून ती वाळू लागतात. शेवटी संपूर्ण झाड वाळून जाते. यासाठी हळदीचे कंद लागवडीपूर्वी कीटकनाशकांचे द्रावणांत व नंतर ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून नंतरच लागवड करावी. रोगट झाडे मुळांसकट उपटून जाळावीत. तसेच शेतात पाणी साचू देवू नये. खोडावर मातीची भर द्यावी व जमिनीत चांगली हवा खेळती ठेवावी. हा रोग ऑगष्ट-सप्टेंबर मध्ये हमखास दिसतो.
हळदीचे कंद नासणे हा रोग बुरशीजन्य असून बुरशीची बीजे जमिनीत राहतात व वाढतात. हा रोग प्रामुख्याने १. बुरशी पिथियम व फ्युजॅरियम, २. सुत्रकृमी, किंवा ३. कंदमाशी यांच्यामुळे होतो. कधी कधी प्रतिकुल परिस्थितीत वरील रोगांची कारणए जमिनीत किंवा बेण्यात सुप्तावस्थेत राहतात. या रोगात पानांचे शेंडे वरून व कडेने पिवळी पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडांचा जमिनीलगतचा बुंधा काळपट राखी रंगाचा पडतो. गड्डा व हळकुंडे काळी व निस्तेज पडतात. हाताने दाबल्यास त्यातून घाण पाणी बाहेर येते. झाडाचे खोड थोड्याशा झटक्याने चटकन हातात येते.
याचे नियंत्रणासाठी लागवडीचे बेणे निरोगी वापरावे. रोगट कीडग्रस्त बेणे काढून टाकावेत. जमीन शक्यतो हलकी ते मध्यम पण उत्तम निच-याची निवडावी. जरूर भासल्यास पावसाळ्यात ३५ ते ४० फूट अंतरावर ३० ते ४० सेंमी खोलीचे उतारास समांतर चर घ्यावेत म्हणजे पाणी साचणार नाही. लावणीपूर्वी बेण्यास प्रक्रिया करूनच लागवड करावी. यासाठी कंदमाळीच्या नियंत्रणासाठी सुचविल्याप्रमाणे कीटकनाशके व कंद कुजवणा-या रोगाचे नियंत्रणासाठी बुरशीनाशके वापरावीत. त्यासाठी क्विनॉलफॉस किंवा डायमिथोएट २० मिली + कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ हे बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून या द्रावणात बेणे १५ ते २० मिनिटे बुडवावे. हे द्रावण १५० ते २०० किलो बेण्यास पुरते. या प्रमाणे बेणे प्रक्रिया करूनच बेणे साठवावे. पीक फेरपालट केल्यानेही रोग कमी येतो.
कंदमाशी: कंदमाशीच्या आळ्या जमिनीतील हळदीच्या कंदात शिरून ते नासवतात. साधारणपणे पहिल्या अवस्थेतील लहान अळ्या ज्या ठिकाणी आभासमय खोड कंदास चिकटलेले असते अशा कोवळ्या भागातून हळदीच्या कंदात शिरतात. अशा कंदास नंतर फ्युजॅरियम, पिथियमसारखे बुरशीजन्य रोग तसेच मेलाडोगायनी, हेलीकॉटीलेकस इ. सुत्रकृमींचा शिरकाव होतो व त्यामुळे कंद मऊ पडतात. कंदाना पाणी सुटून ते कुजतात. पाने पिवळी पडतात व शेवटी पूर्ण झाड वाळून जाते. शेतात ज्या ठिकाणी कंदमाशीने अंडी घातली असतील अशाच वाफ्यांमध्ये साधारणपणे ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात ठिकठिकाणी प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे दिसून येतात. कंद कुजण्याचे प्रमाण पाण्याचा निचरा न होणा-या मध्यम ते भारी जमिनीत जास्त दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे या जीवाणूंची वाढ अशा ठिकाणी व या वातावरणात झपाट्याने होत असते. एका कुजक्या कंदात ५० पेक्षाही जास्त कंदमाशीच्या अळ्या आढळून येतात.
ह्या कीडीच्या नियंत्रणासाठी निरोगी व अत्यंत शुद्ध कंदाचाच वापर लागवडीसाठी करावा. ज्या शेतातील हळदीचे बेणे वापरावयाचे असेल त्या शेतातील पीक पक्व होण्या अगोदरच रोगमुक्त असल्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. रोगट झाडांची पाने कंद पक्व होण्या आधी पिवळी पडतात किंवा वाळतात. म्हणून शक्यतो संशोधन केंद्रावरील बेणे वापरावे. तेथे शक्यतो निरोगी बेणे मिळते. बेणे म्हणून कीडलेल्या कंदाचा लागवडीसाठी उपयोग करू नये व त्याचा लागवडीपूर्वी नाश करावा.
कंदमाशी व कंदकुजव्या रोग हळद पीकात होवू नये म्हणून बेण्याला कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. परंपरागत पद्धतीत शेतकरी शेणकाल्याच्या द्रावणात कंद बुडवून लावतात. त्यात ६% पारायुक्त औषध व कोणतेही एक कीटकनाशक पाण्यात मिसळून त्यात बेणे १० ते ३० मिनिटे बेणे बुडवून ठेवतात व नंतर सावलीत सुकवून लागवड करतात. काही शेतकरी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डॅझीम व २५० मिली मोनोक्रोटोफॉस टाकून द्रावण तयार करतात व त्यात ५ मिनिटे बेणे बुडवून बेण्याची लागवड करतात. कंदमाळीच्या आळ्या कंदामध्ये छिद्राकडून आत असतील तर बेणे प्रक्रियेमुळे कीटकनाशकाचे द्रावण छिद्रातून कंदाचे आत जाते व आतील अळी किंवा कोष मरतात. या प्रक्रियेनंतर बेणे सुकवून त्याला ट्रायकोडर्मा लावून ठेवल्यास कंद सडण्याची क्रिया करणा-या बुरशीचाही बंदोबस्त होतो.
अनेक कीडी, पतंग व कंदमाशी इ. चा एक नैसर्गिक स्वभाव आहे. रात्री ते पेटत्या दिव्यांकडे किंवा प्रकाशाकडे आकर्षित होतात व धाव घेवून त्यात उडी घेतात व मरतात. म्हणून त्यांच्या या गुणाचा उपयोग हळद पीकातील कंदमाशी मारण्यासाठी करता येतो. त्यासाठी एक पसरट भांड्यात पाणी घेवून त्यावर बल्ब लावून ठेवतात. ह्या प्रकाश सापळ्यात रात्री पिकांतील कीडी, कंदमाशा बल्बावर उड्या घेतात व पसरट भांड्यातील द्रावणात पडून मरतात.
रासायनिक पद्धतींमध्ये कार्बारील ४% किंवा क्विनॉलफॉस १०% किंवा फोरेट १०% एकरी १० किलो झाडांच्या बुंध्याजवळ टाकल्यास कंदमाशी कीडीचा प्रादुर्भव आढळून येत नाही. ही कीटकनाशके लागवडीनंतर दीड महिन्यांनंतर तीन वेळा प्रत्येक महिन्याचे अंतराने खोडाभोवती जमिनीत मातीत मिसळून देणे अत्यंत आवश्यक आहे. (जुलै, ऑगष्ट व सप्टेंबरचा पहिला आठवडा) ऑक्टोबर नंतर कंदमाशीचा प्रादुर्भाव आढळत नसल्यामुळे त्यानंतर कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज नाही.
इतर उपायांमध्ये पावसाळ्यात जुलै-ऑगष्ट ते ऑक्टोबर या काळात शेतातील निचरा न झालेले जास्तीचे पाणी निचरा करून लवकरात लवकर काढून द्यावे म्हणजे रोगाची वाढ करणा-या जंतूंची वाढ होणार नाही. मर आलेली हळदीची झाडे सुरूवातीलाच कंदासहीत लगेच काढून घ्यावीत व जाळून टाकावीत. त्यामुळे रोगाचा प्रसार होणार नाही. पीक काढल्यानंतर कुजलेले कंद शेतात फेकून देवू नयेत. ते जमा करून जाळावेत, तसेच शेताची नांगरणी व वखरणी करून जमीन तापू द्यावी. आंतरमशागत, खुरपणी, निंदणी इ. कामे करतेवेळी झाडांना व कंदाना दुखापत किंवा इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.
इतर कीडी व रोग :
- फुलकीडी: ही कीड पानांतील रस शोषण करणारी कीड असून त्यामुळे हळदीचे पानांवर पांढरे ठिपके पडून शेंडे तपकिरी पडतात व पाने निर्जीव होवून गळू लागतात. या कीडीचे नियंत्रणासाठी डायमिथोएट ४०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- मावा : हळदीची पाने पिवळ पडून वाळतात. वरीलप्रमाणेच उपाययोजना करावी.
- वाळवी: ही कीड हळदीचे मुळांवर जगते. त्यामुळे साल कुजते. झाड सुकते व मरते. खोल नांगरणी व रात्री वाळवीचा नाश करणे तसेच फोरेट ४ किलो प्रती एकरी लागवड करतांनाच जमिनीवर टाकावे.
- करपा: हळद पिकावरील करपा ह्या रोगात पानांवर काळपट ठिपके पडू लागतात. त्यामुळे पाने करपल्यासारखी दिसतात. काही वेळा या रोगामुळे खोडाला चिरा किंवा फाटणे आणि त्यामधुन घट्ट असा मधासारखा द्राव बाहेर येतांना दिसतो. त्यामुळे पुन्हा बुरशी वाढते किंवा कीडींचा उपद्रव होतो. त्यामुळे कदाचीत संपूर्ण झाडच दगावण्याची शक्यता असते.
- निमॅटोड किंवा सुत्रकृमी: सुत्रकृमींमुळे हळदीचे पिकावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे हळदीच्या पीकाची वाढ खुंटते व परिणामी उत्पादन घटते व कंद कुजणे हा रोगही होवू शकतो. हळदीवर आतापर्यंत एकूण सहा प्रकारच्या सुत्रकृमी आढळून आलेल्या असून त्यापैकी मुळगाठी सुत्रकृमी (रूट नॉट निमॅटोड) हे सर्वात अगोदर आढळून आले. त्यानंतर प्रेटीलेंचस, मेलायडोगायनी, रोटीलेंचस्, होप्लोलेमस या सुत्रकृमींची नोंद झाली. या सर्व प्रकारांमध्ये मेलायडोगायनी इन्कॉग्रीटी या सुत्रकृमींमुळे सर्वात जास्त नुकसान झालेले आढळून आले आहे. सुत्रकृमींमुळे हळदीची झाडे खुजी, बुटकी व निस्तेज होतात. त्यामुळे हळदीच्या गड्ड्यांची वाढ होत नाही. रोटीलेंचसअ सुत्रकृमींमुळे हळदीच्या मुळाची शाखीय वाढ तसेच गड्ड्याची वाढ तसेच गड्ड्याचे वजन, पानांची रूंदी व हळकुंडाची संख्या घटते व त्याचा परिणाम एकूण उत्पादन घटण्यात होतो. सुत्रकृमीचा प्रसार प्रामुख्याने सुत्रकृमींमुळे ग्रासीत झालेल्या बेण्यापासून केवळ १० सुत्रकृमीमुळे पहिल्या चार महिन्यांत ३५ तर पुढील आठ महिन्यांत ४५% उत्पादन घटते. जर दहा हजारांपेक्षा जास्त सुत्रकृमींचा प्रादुर्भाव झालेला असल्यास हेच प्रमाण जवळ जवळ ६५% चार महिन्यात, ७५% आठ महिन्यांत होवू शकते. याचे नियंत्रणासाठी रोगग्रस्त व कीडग्रस्त बेणे टाळणे हा योग्य उपाय आहे. बेणे ५० अंश सेंग्रे तापमानाच्या गरम पाण्यात १० मिनिटे बुडवून नंतर वापरल्यास सुत्रकृमीचा बंदोबस्त होतो. पीक शेतात उभे असतांना प्रती एकरी ३० ते ४० किलो फ्युरॅडॉन झाडाजवळ रिंग घेवून त्यात टाकावे.
हळद बाजारपेठ: महाराष्ट्रात हळदीकरिता सांगली ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे येथे वर्षभर येथे हळदीची खरेदी विक्री होते.
हळदीचे औषधी गुणधर्म:
१) आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.
२) हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.
३) पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.
४) डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.
५) डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.
महत्त्व: धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदीपासूनचे कुंकू, हळद, लग्नकार्य, पूजा, भंडारा, सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात.
श्री.रामेश्वर रामप्रताप चांडक
(कृषी अधिकारी, बीड)
9423691336
Published on: 12 July 2018, 12:59 IST