रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा पिकावर जमिनीद्वारे व बियांमार्फत पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.( मर, खोडकूज, मुळ कूज, अस्कोकायटा करपा ई.)या रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो.परंतु रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही.त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजिवांचा ऱ्हास होतो.आपल्याकडे बऱ्याच भागामध्ये शेतकरी पिकांची फेरपालट करणे टाळतात व एकच पीक पद्धतीचा अवलंब करतात.परिणामी त्या भागातील जमिनीत आणि पिकांवर उपजीविका करणाऱ्या रोगकारक बुरशींचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढते. उपयुक्त बुरशींचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. परिणामी जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या रोगकारक बुरशींचा प्रादुर्भावात वाढ झालेली दिसून येत आहे. या स्थितीमध्ये रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सारख्या जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या उपयुक्त बुरशीचा वापर करणे गरजेचे झाले आहे.
ट्रायकोडर्मा बुरशीची कार्यपध्दती :-
ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून तीचा उपयोग हरभरा पिकांवरील रोग नियंत्रणकरिता होत आहे. या बुरशीच्या ८९ च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी ट्रायकोडर्मा अस्पेरीलम, ट्रायकोडर्मा हरजीयानम या प्रजाती मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. ही बुरशी जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या रोगकारक बुरशी जसे फ्युसारीयम, रायझोकटोनिया, स्क्लेरोशिंअम, पिथीयम, फायटोपथोरा इत्यादी बुरशींचा नायनाट मोठ्या प्रमाणात करते. सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या तंतुमध्ये विळखा घालून त्याभोवती आपल्या तंतुमय वाढीचे आवरण तयार करते तसेच ही बुरशी ग्लायोटोक्झीन सारखे प्रतीजैविके निर्माण करून हानिकारक बुर्शींची वाढ थांबवते. तसेच ट्रायकोडर्माने पिकांच्या मुळांवर तयार केलेल्या वेष्टणामुळे पिकांमध्ये सिस्टिमिक एक्वायर्ड रेसिस्टंस निर्माण होते व जमिनीतील हानीकारक मर व इ. रोगांपासुन पिकांचे रक्षण होते.
(ट्रायकोडर्मा ची तुन्तुमय वाढ)(ट्रायकोडर्मा ने रोगकारक बुरशीभोवती घातलेला विळखा)
ट्रायकोडर्मा ने जमिनेचे संस्करण व बिजप्रक्रियेचे फायदे :-
- हरभरा पिकावरील जमिनीतून अथवा बियाण्यांव्दारे पसरणार्या मर रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. (खोडकुज, मुळकुज, मर ई.)
- हरभरा बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
- प्रती हेक्टरी पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- ट्रायकोडर्मा वापरणे कमी खर्चिक व सोपे आहे, त्यामुळे मर रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.
ट्रायकोडर्मा वापरण्याची पध्दत :-
१)जमिनीचे संस्करण :-
(ट्रायकोडर्मा ने मातीचे संस्करण)
ट्रायकोडर्माने मातीचे संस्करण पीक लागवडीच्या आठवडाभर आधी करावे. जमिनीत थोडा ओलावा असल्यास अधिक फायदेशीर ठरते.एक हेक्टर क्षेत्रफळासाठी २.०० ते ३.०० किलो ट्रायकोडर्मा भुकटी ४० ते ५० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रित करून घ्यावी.हे मिश्रण थोड ओलसर करून काही वेळ सावलीत ठेवावे. नंतर हे मिश्रण संध्यकाळच्या वेळी एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावे.
२) बीज प्रक्रिया :-
(ट्रायकोडर्मा पावडरची बीजप्रक्रिया)
ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पध्दत म्हणजे, बीज प्रक्रिया पेरणीचे वेळी ५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
हेही वाचा : शेतीत ट्रायकोडर्माचे काय आहे महत्त्व; वाचा सविस्तर माहिती
3) द्रावणात रोपे बुडविणे :- गादी वाफ्यावर रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा या बुरशीचे ५०० ग्राम द्रावण ५ लिटर पाण्यात मिसळून एकजीव द्रावण तयार करावे व त्यात रोपांची मुळे ५ मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
लेखक :-
- प्रा. हरिष अ. फरकाडे (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
श्री शिवाजी उध्यानविध्या महाविध्यालय, अमरावती.
मो. 8928363638 इ.मेल. agriharish27@gmail.com
प्रा. राधिका ग. देशमुख
सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)
स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद.
इ. मेल. radhikadeshmukh1994@gmail.com
Published on: 24 October 2020, 01:14 IST