अश्या पद्धतीचा अवलंब करताना किडींना आपल्याकडे आकर्षित करणारे पीक सापळा पीक होय. अशा पिकाचा मुख्य पिकाआधी किंवा त्यावर सातत्याने बारीक लक्ष ठेवून त्यावरील किडींचा नायनाट वेळीच करता येते.आता पाहू
कपाशीचे पीक घेताना त्यासोबत काही भेंडीची रोपे घेऊन त्याकडे ठिपक्यांची बोंडअळी, तसेच तुडतुडे आकर्षून घेता येतात.मात्र पुढे ही कीड भेंडीकडून कपाशीकडे स्थलांतरित होण्यापूर्वी भेंडी नष्ट करावी. कपाशीत तूर हे मिश्रपीक घेतल्याने कपाशीवर करडे सोंडे कमी होतात.
सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा लिट्युरा, केसाळ अळी, विविध उंटअळ्या, नागअळी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी सोयाबीन पेरणीपूर्व शेताच्या चारी बाजूने एरंडीचा सर वाढवणे लाभदायक असते. एरंडीवरील कीटक रासायनिक फवारणीद्वारे नियंत्रित करता येतात.
कोबी, फ्लॉवर इत्यादी पिकांत दर 17 ओळींनंतर एक ओळ मोहरीची घेऊन आपण या पिकातील डायमंड बॅक मॉथ या किडीची तीव्रता कमी करू शकतो. मोहरी मात्र मुख्य पिकापूर्वी तीन आठवडे आधी पेरावी, त्यावरील कीटक शिफारशीत कीटकनाशकाच्या फवारणीने नियंत्रित करावेत.
स्पोडोप्टेरा व केसाळ अळीच्या किडींना आकर्षित करण्यासाठी सापळा पीक म्हणून एरंड, जट्रोफा, ज्वारी यांची बांधावर व शेताच्या कडेने लागवड करावी. सापळा पिकावरील अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
मुख्य पिकात काही ठिकाणी ताग, भुईमूग घेतल्यास हुमणीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. त्या पिकांखालील हुमणीच्या अळ्या मारता येतात. कापसात भेंडी, अंबाडी ही पिके घेतल्यास ठिपक्याची बोंड अळी कमी होते.
धैंचासारखे मिश्र पीक घेतल्यास बी खाणारे पोपट शेतात कमी येतात.
कोबीच्या शेतात मोहरीचे मिश्र पीक घेतल्यास चौकोनी ठिपक्याच्या पतंगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
उसात द्विदल चवळी पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास द्विदल पिकातील भक्षक उसावरील लोकरी मावा कमी करण्यास मदत करतात.
उसात कांदा, लसूण, कोथिंबीर घेतल्यास खोड कीड कमी होते.
कापसात तूर अथवा चवळी आंतरपीक घ्यावे, मावा कमी येतो.
टोमॅटोभोवती चार ओळी मका लावल्यास हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा फळ पोखरणारी अळी किडीपासून संरक्षण होते.
कपाशीभोवती चवळी पीक घेतल्यास कपाशीचे मावा किडीपासून संरक्षण होते.
तुरीच्या पिकात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पक्षी शेतात येऊन मोठ्या अळ्या वेचून खातात. पक्ष्यांना बसण्यासाठी थांबे करावेत. यासाठी तुरीच्या शेंड्यापासून 1.5 फूट उंचीवर लाकडी अँटिना एकरी चार ते पाच बसवावेत किंवा तार बांधावी.
झेंडूची सापळापीक म्हणून तुरीच्या शेताच्या चारही बाजूंनी लागवड करावी.
सापळा पिकाची लागवड करताना त्यांची वाढ कशी होते? त्यांना जागा किती लागते? त्यांचा जीवनक्रम, मुख्य पिकाबरोबर पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश याबाबतीत त्यांची होणारी स्पर्धा या गोष्टींचा अभ्यास करावा.
सापळा पिकांची लागवड ही मुख्य पिकांच्या सभोवताली करतात, याला "पेरीमीटर ट्रॅप क्रॉपिंग' किंवा "पी.टी.सी.' असे म्हणतात. एखाद्या किल्ल्याच्या सभोवताली जशी संरक्षक भिंत असते, तशीच ही पद्धत असते. सापळा पिकाच्या एक किंवा दोन ओळींनी ही भिंत तयार होते. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादीवरून सापळा पिकाचे क्षेत्र अथवा त्याची प्रति चौरस मीटर संख्या (घनता) ठरविता येते.
कापसाच्या पिकात ठराविक ओळींनंतर भेंडी लावली, तर बोंडअळीपासून कापसाचे संरक्षण होते.
भुईमुगात पाने खाणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिकाच्या सभोवताली एरंड किंवा सूर्यफुलाची लागवड महत्त्वाची ठरत असते
लेखक - मिलींद जि गोदे
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 04 October 2021, 09:41 IST