Agripedia

कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. असे आहे तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणाचाच ध्यास का धरावा?

Updated on 25 January, 2022 5:32 PM IST

कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. असे आहे तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणाचाच ध्यास का धरावा? वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे असा एक पायाभूत नियम यातून तयार झाला.

पूर्वी माझ्या पुढे असा प्रश्‍न पडायचा शेणाचे कुजून खत होते हे ठीक, पण पाळापाचोळ्याचे खत कसे काय होते. म्हणजे निसर्गात काही सजीवांना हे काम दिलेले आहे.

कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे सजीव तो पदार्थ खातात. त्यांची विष्ठा व मृत शरीरे म्हणजे तपकिरी रंगाची भुकटीसारखा दिसणारा पदार्थ ज्याला आपण शेणखत किंवा कंपोस्ट असे म्हणतो. शेतकरी वर्गाची पालापाचोळ्यापेक्षा शेणखतावर जास्त भक्ती आहे.

शुद्ध शेणापासून तयार झालेले खत म्हणजे सर्वांत उत्तम खत. पालापाचोळ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत म्हणजे दुय्यम दर्जाचे अशी एक मानसिकता तयार झाली आहे. शेणाचा मूळ स्रोत वनस्पतीच आहे. कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. असे आहे तर सेंद्रिय कर्बवाढीसाठी फक्त शेणाचाच ध्यास का धरावा? वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे, असा एक पायाभूत नियम यातून तयार झाला. या पुढील वाटचालीत शेण व गदाळा या मर्यादा निघून गेल्यामुळे वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेल्या प्रत्येक पदार्थाकडे खत असे पाहण्याची सवय लागली.

खतासाठी कच्चा पदार्थांची यादी इतकी व्यापक झाली की आज वर सेंद्रिय खताची टंचाई हा शेतीपुढील ज्वलंत प्रश्‍न संपूनच गेला. याचे एक उदाहरण वाचकापुढे ठेवितो. आजवर शेताच्या बांधावरील झाडांच्या फांद्या जळणासाठी तोडल्या जात. मोठ्या आकाराचे लाकूड जळणासाठी बाजूला काढून शेंड्याच्या लहान आकाराच्या फांद्या व पाने वाहनात भरून शेतातील एखाद्या पडिक कोपऱ्यात फेकून दिली जात. पुढे ती तेथेच कुजून संपून जात परंतु त्यापासून खत होऊ शकेल, असे बरेच दिवस लक्षात आले नाही. वरील अभ्यास झाल्यानंतर अशा लहान फांद्या घराकडे न आणता उसाच्या सरीत विसकटून टाकून देणे सुरू झाले. पुढे पावसाळ्यात त्याचे खत होऊन ते अवशेष संपून गेले. पायाभूत विज्ञानाने एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, याचे हे एक उदाहरण.
आजवर शेणखताच्या ढिगात चुकून एखादे उसाचे खोडके गेले तर बाकीचे खत तयार झाले तरी हे खोडके जसेच्या तसेच फक्त थोडेसे काळसर झाल्याचे आढळले. इथे आपली मानसिकता अशी तयार होते की हे खोडवे हा खत करण्याचा पदार्थ नाही. रानात खत भरून नेताना हे खोडवे बाजूला फेकून देऊन बाकी खत रानात नेऊन शेतकरी टाकेल.
दुसऱ्या बाजूला हे खोडके चुलीत घातले तर उत्तम जळतात, मग हा पदार्थ खत करण्यासाठी नसून हे जळण आहे, असाच समज सर्वत्र रूढ आहे. जळगाव अगर खानदेशात रस्त्याकडेला सर्वच केळीचे अवशेष फेकून दिलेले पाहावयास मिळतील. उत्तर महाराष्ट्रात कापूस तूर पिकविणाऱ्या भागात या पिकाचे अवशेष तुराट्या पराट्या घराच्या परड्यात आणून जळणासाठी रचून ठेवलेल्या सर्वत्र आढळतील.

नांगरणी अगर पूर्वमशागतीच्या शेवटी धसकटे म्हणजे पूर्वीच्या पिकाचे बुडखे, मुळे अगर कुळवाच्या फासात अडकून आलेले मुळांचे जाळे हा सर्व कचराच! पेरणीपूर्वी हा सर्व कचरा वेचून बाहेर फेकून देणे, अगर लहान लहान ढीग करून जाळून टाकणे, हे काम उन्हाळ्याच्या शेवटी सर्वत्र चालू असते. यात आपण खत करण्याचा पदार्थ पदरचे पैसे खर्च करून व्यर्थ घालवतोय, असा विचार कोणत्याही शेतकऱ्याच्या मनात येणे शक्‍य नाही. या उलट सर्व काडीकचरा बाहेर टाकून तयार झालेले काळेभोर शेत पाहणे यात नेत्रसुख मानणारा व उत्तम पूर्वमशागत पार पाडल्याच्या समाधानातच शेतकरी समाज दिसेल.

   आता यात आणखी थोडी सुधारणा झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात शेतीतील टाकाऊ पदार्थापासून वीजनिर्मिती करण्याचे कारखाने उभे राहत आहेत.

शेतकरी ट्रक भरभरून टनाने हा कचरा कारखान्याकडे नेऊन घालून या कचऱ्यापासून पैसे करताहेत. ऊस कारखानदारीत बगॅसपासून वीजनिर्मिती हा एक उत्तम जोडधंदा होत आहे, हे ठीक. यापुढे ऊस तुटून गेल्यानंतर उपलब्ध होणारे पाचट गोळा करून त्यांचे गठ्ठे बांधून ते जळणासाठी विकण्याचा नवीन धंदा उदयाला येत आहे. उसाची जमीन नांगरल्यानंतर बायका जळणाला खोडकी गोळा करून रान रिकामे करून देतात. असा फुकटात कचरा बाहेर जाऊन रान स्वच्छ करून मिळाल्याने शेतकऱ्यांना आनंद होतो. एके काळी असा आनंद मीपण उपभोगलाय.

 

2005 च्या पावसाळ्यापूर्वी मी असा विचार करीत होतो की आता आपण उसाचे पाचट रानातच कुजवतो; पण ही खोडकी बाहेर जातात. हा आणखी एक पदार्थ रानातच कुजविता आला तर थोडा सेंद्रिय कर्ब वाढविता येईल. यावर खूप विचार केल्यावर असे दिसले की जमीन नांगरली तर ही खोडकी रानात विखरून पडतात. व पुढील कामात अडथळा करतात.

मग खोडक्‍यांचे खत करावयाचे असल्यास ते जसे आहे, तसेच जागेला ठेवून कोणतीही मशागत न करता पुढील पीक घेता आले तरच हे खोडके जागेवर कुजविणे शक्‍य आहे. यातील दुसरा मुद्दा असा आहे की हे खोडवे मरणे गरजेचे आहे. ग्लायसेल या तणनाशकाने खोडवे मारता येणे शक्‍य असल्याचे तोपर्यंत ज्ञात झाले होते. 2005चे भाताचे पीक शून्य मशागतीवर घेण्याचे पक्के केले. त्या साली एप्रिल-मे महिन्यात सलग वळीव पाऊस चालू होता.

अनेकांना मशागत करण्यास वावच मिळाला नाही. काही जणांना पेरणीही करता आली नाही. मी निश्‍चितच होतो. मशागत नसल्याने आता कुरीने (पेरणी यंत्र) पेरणी करणे शक्‍य नव्हते. अशा परिस्थितीत ओल्या रानात हाताने टोकण करून पेरणे हा पर्याय अवलंबला. भात पीक उत्तम आले. भाताची कापणी झाली. सरी वरंबे जुने तसेच होते. आता उसासाठी नांगरणी, सऱ्या सोडणे, नाके करणे, वगैरे पेरणीपूर्व कामे बंद करून जुन्या सऱ्यांचे तळात एक बळिराम नांगराचे तास मारले व नेहमीप्रमाणे उसाची लावण केली.

कांडी पेरणी पुरती मशागत झाली असल्याने लावण, उगवण, फुटीची व वाढीची अवस्था यात कोणतीच अडचण आली नाही. आजपर्यंत परंपरागत पद्धतीने मशागत करून ऊस पिकविण्यात 25-30 वर्षे गेली होती. बिनानांगरणी पद्धतीच्या शेतातील उसाची वाढ पूर्वीपेक्षा किती तरी उजवी दिसत होती. पुढे ऊस तुटून कारखान्याला गेला आणि लक्षात आले उत्पादनाचा आलेख परत वरच्या दिशेने निघाला आहे. याला कारण जमिनीची सुपीकता व उत्पादकता परत वाढू लागली आहे. मला बाह्य बाजारी उपाय करून उत्पादकता वाढवायची नव्हती. 25-30 वर्षांपूर्वी मूळ जमिनी सुपीक असल्यामुळे जे चांगले उत्पादन मिळत होते. तशी सुपीक जमीन करून उत्पादन वाढवायचे होते.

वरील तंत्रातून त्यासाठीचा मार्ग सापडला आहे. याची खात्री पटत चालली होती. दरम्यान याच काळात उसानंतर बिनानांगरणी पद्धतीने भुईमुगाचे पीक घेतले तेही चांगले आले. यातून कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी नांगरणीची पूर्वमशागतीची आवश्‍यकता नाही, असा निष्कर्ष निघाला. चांगली पूर्वमशागत झाली पाहिजे या परंपरागत विचाराच्या हा विचार पूर्ण विरुद्ध दिशेचा असल्याने या मागील अनेक पायाभूत शास्त्रीय संदर्भांचा अभ्यास करणे गरजेचे होते.

जगात नांगरणी प्रथम का चालू झाली. ती आजवर टिकून का राहिली? आपण बैलाकडून ट्रॅक्‍टरकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांचा मशागत जास्त करणेकडे कल वाढत चालला आहे. मुळात नांगरणीचा उद्देश काय असावा, यांचा शोध घेणे गरजेचे होते. शेतीशास्त्राच्या पुस्तकात नांगरणी चांगली कशी करावी याची माहिती मिळेल, मूळ उद्देश सापडणार नाही. चिंतन केल्यानंतर मला सापडलेले मूळ उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

1) आपल्याला बी पेरता आले पाहिजे. 

2) ओळीत करावयाचे असेल तर रानबांधणीसाठी नांगरणी 

दुय्यम उद्देश 

1) तण मारणे 

2) सेंद्रिय खत मातीत मिसळणे

या उद्देशासाठी आपण जमिनीची मशागत करीत असतो. शेतकऱ्यांना विचारल्यास शेतकरी सांगतील की पुढील पिकाच्या मुळांच्या चांगल्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे. जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था मारणेसाठी नांगरणी गरजेची आहे. परंतु यात फारसा अर्थ नाही. वरील चार कामे आपण बिना नांगरता करू शकत असलो, तर आपल्याला नांगरणी पूर्वमशागत करण्याची कोणतीच गरज नाही.

बी माती आड करणेसाठी सुरवातीला भाताचे बाबत टोकण व पुढे टोकणीसाठीचे मनुष्यबळ वाचविणेसाठी विसकटून भातपेरणीचे तंत्र विकसित केले आहे. उसासाठी सुरवातीला सरीचे तळात कांडी पुरणे पुरती मशागत करीत होतो. आता तीही बंद केली कांडी लावणीसाठी एक डोळ्याची कांडी सरीत पहारीने भोक पाडून उभी घालणे अगर बाहेर रोपे तयार करून कुदळीने लहान खड्डा पाडून त्यात रोप लावले जाते.

पाणी पाजण्यासाठी जुन्या सरी-वरंबे तसेच वापरले जातात. तण मारण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. चांगले कुजलेले खत आता वापरणे बंद केले आहे. शक्‍य झाल्यास जनावरांचे शेण विसकटून आच्छादनात टाकले जाते. सेंद्रिय खताची गरज प्रामुख्याने मागील पिकाचे अवशेष व तणांचे अवशेष जागेलाच कुजवून भागविली जाते. इथे सेंद्रिय खत मुद्दाम औजाराने मातीत कालविण्याचे कामच करावे लागत नाही. ही चार मुख्य कामे बिना नांगरता होऊ शकल्याने मागील नऊ वर्षांपासून माझी शेती 100 टक्के नांगरणी अगर पूर्वमशागतीशिवाय उत्तम प्रकारे चालू आहे. उत्तम प्रकारे म्हणण्याला एक शास्त्रीय आधार आहे.

        जर नांगरणी ची फार अशी आवश्यकता नसेल तर प्रत्येक शेतकरी वेळ पैसा आणि मेहनत वाचवू शकतो त्याचबरोबर जमिनीचा पोत व उत्पादन ही वाढेल या पद्धती बाबत जनजागृती फारशी दिसत नाही

 

शेतकरी मित्र

विजय भुतेकर सवणा

9689331988

English Summary: Today's need is increasing the organic carbon
Published on: 25 January 2022, 05:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)